नाटक: अल्पविराम
लेखक: इरफान मुजावर
दिग्दर्शक: डॉ. सायली सुर्वे
संस्था: शोध, कुर्डुवाडी, सोलापूर
संथ आणि निवांत : अल्पविराम
Lokmat Epaper Link : Click on it..
'आई' आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय. आपली आई हॉस्पिटलमध्ये दाखल असताना दोन भाऊ आईविषयी, तिच्या संस्कारांविषयी चर्चा करत असतात. वडील त्यात आईच्या अनुषंगाने समाविष्ट असतात. अनाथ मुलगा यांच्यासोबत वाढतो. या सर्वांचा आई सोबत असणारा अनुबंध अल्पविराम या नाटकात इरफान मुजावर यांनी मांडला आहे.
आई हा विषय सर्वांसाठी प्रिय असला तरी त्याची दोन तास विविध पद्धतीने केलेली चर्चा सुसह्य होतेच असे नाही. हॉस्पिटल वेटिंग रूम मध्ये मोठा भाऊ माधव (डॉ. संतोष सुर्वे) आणि लहान भाऊ मिहीर ( विनय दहीवाळ) नुकताच अमेरिकेहून परत आला आहे, यांचे ताणले गेलेले नातेसंबंध. अनाथ परंतु आईची सेवा करणारा लकी (ज्ञानेश्वर गायकवाड). या तिन्ही भावांची आई, आई वडिलांनी लकीवर केलेले उपकार, लहान भाऊ मिहीर कसा व्यवहारी आहे, मोठा भाऊ केवळ भावनिक, आईच्या भावना ओळखणारा लकी यावर फक्त चर्चा. आयुष्याची शेवटची घटका मोजणारी आई, तिची लाईफ सपोर्ट सिस्टीम काढायची की नाही यावर ती झालेली शेवटच्या प्रवेशातील चर्चा नाटकास "पूर्णविराम" देते.
दोनही अंकात ही चर्चा अत्यंत संथ गतीने सादर करण्यात आली. इरफान मुजावर यांच्याच "पूर्णविराम" नाटकाची ही दुसरी रंगआवृत्ती वाटावी अशी ही नाट्यकृती. दिग्दर्शक डॉ. सायली सुर्वे यांनी प्रयोगाची गती, एकाच कुटुंबातील दोन भावांची भाषा यातील तफावत, संवादापेक्षा मोठ्या आवाजात त्रासदायक ठरणारा व सतत पडणारा, गडगडणारा पाऊस या तांत्रिक बाबी कडे लक्ष देणें गरजेचे होते.
बाळकृष्ण निमसूडकर यांचे नेपथ्य मोजकेच पण नेटके. सूर्यकांत जाधव यांची प्रकाश योजना पूरक.
"ठेहराव के साथ" अपेक्षित असणारा प्रयोग संथ व निवांत सादर झाला अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी नोंदवली.
प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर
संगमेश्वर कॉलेज, सोलापूर
Share
💐💐💐
ReplyDelete