नाटक : पूर्णविराम
लेखक: इरफान मुजावर
दिग्दर्शक: प्रताप सोनाळे
प्रकाश योजना: ओंकार मोटे
नेपथ्य: प्रताप सोनाळे
संगीत: विशाल वांगेकर
संस्था: कामगार कल्याण केंद्र, मांजर्डे.
मेरे उजडे इस गुलशन की
अब तक न मिली बहार मुझे |
मैने लाखोंके बोल सहे
सांवरीया तेरे लिये ||
पूर्णविराम या प्रयोगाची अनुभूती या चार ओळींमधून आपल्या पर्यंत पोहोचते. कलावंत हा नेहमी मनस्वी असतो कलावंताची नेहमी कला पहावी, त्याच्या आयुष्यामध्ये डोकावून पाहू नये असे म्हणतात. कलावंताचं कलंदर जगणं सर्वसामान्य व्यक्तीस सहन होणार नाही असच असतं. कलावंत नेहमी पूर्णत्वाच्या शोधात असतो. या शोधामध्ये त्याच्या सोबत असणाऱ्या व्यक्तींची वाटचाल कधी सुखावह ठरते तर कधी त्यांचीही फरफट होते. पुरुष कलावंताची पत्नी होणं हे तर एक दिव्यच. कलावंत कधी विक्षिप्तपणे वागतो तर कधी अट्टाहासाने आपलेच म्हणणे खरे करतो व बहुतांश वेळा यासोबत येते व्यसनाधीनता. कलंदर आयुष्य जगताना जगरहाटीची, समाजनियमांची तमा हे बाळगत नाहीत. यामुळेच कलावंत काळाच्या पुढे जाऊन या जगाची कल्पना मांडत असतात. जगण्याचे नवे आयाम शोधत असतात. कळत नकळत याचा परिणाम मात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वच व्यक्तींवर होतो. बहुतांश वेळा कलाकाराचं आयुष्य हे फक्त कलेला न्याय देऊ शकतं, त्याच्या आयुष्यातील व्यक्तींना नाही. हे विदारक सत्य स्वीकारताना कलावंताला आणि त्याच्या आयुष्यातील व्यक्तींना चिरंतन वेदनेच्या दाहास सामोरे जावे लागते.
मनोहर (इरफान मुजावर) चित्रकार आपल्या कलेला समर्पित असणारा कलावंत. चित्रांच्या व चित्रकलेच्या माध्यमातून नावीन्याचा शोध घेणे हे त्याचे वैशिष्ट्य. अनिता (धनश्री गाडगीळ) त्याची सहचारिणी. सर्वसामान्य स्त्री लग्न झाल्यानंतर नवऱ्याकडून ज्या अपेक्षा ठेवत असते त्या अपेक्षा पूर्ण न झालेली...पण मनोहरती निस्सीम प्रेम करणारी. अनिताची चित्रकलेमधील समज खूप कमी आहे हे तिचे अपूर्णत्व मनोहरला सलत असते. माधवी मनोहरची मैत्रीण. अनिता मधील अपूर्णत्व तो माधवी मध्ये शोधण्याचा प्रयत्न करतो. माधवी (शब्दा कुंभार) प्रतिथयश लेखिका व मनोहरच्या कला प्रवासाची सोबती. मनोहरच्या कलंदरपणाची, बेदरकार जगण्याची आणि त्याच्या कलाविश्वातील जगण्याशी एकरूप झालेली. माधवीने सर्वार्थाने मनोहरला स्वीकारलेले असते.
व्यसनाधीनतेमुळे मनोहर आजारी पडतो. त्याला कॅन्सर होतो. या आजारपणात त्याची काळजी घेते त्याची पत्नी अनिता. हॉस्पिटलमध्ये माधवी देखील मनोहरच्या उपचारासाठी पूर्णवेळ थांबलेली असते. लकी हा मनोहरचा शिष्य. मनोहरच्या जगण्याचा अविभाज्य घटक. तो हॉस्पिटल मध्ये काम करत असतो. मनोहरच्या कलासक्त जीवनामध्ये हे तिघे ही त्याचे सहप्रवासी. पत्नी म्हणून अनिताची वैवाहिक आयुष्यात झालेली ओढाताण, सर्वस्व अर्पण करून देखील अपूर्ण राहिलेली माधवी आणि आपले गुरू मरणासन्न अवस्थेत असून आपण त्यांची मदत करू शकत नाही हे अपूर्णत्व घेऊन जगणारा लकी. अनिता मनोहर च्या आयुष्यामधून बाहेर पडून माधवीस मनोहरच्या आयुष्यास पूर्णविराम देण्याची आर्जव करते. पूर्णविराम मिळतो तो मनोहरच्या रूपाने..तो ही त्याच्या आयुष्यास. काही नात्यांना नाव न देता ती अपूर्ण राहिली तरचं ती नाती पूर्णत्वापर्यंत पोहचतात.
प्रताप सोनाळे यांचे दिग्दर्शन कौशल्य पूर्णविराम या प्रयोगांमधून वेगळेपण सिद्ध करते. नेपथ्यामधील कल्पक रचना, संगीतामध्ये निवडलेली ठुमरी, गीते भावस्पर्शी होती. विविध भूमिकांचा संयमित व नैसर्गिक अभिनय, संहितेमधील प्रत्येक प्रवेशावरती, प्रकाश योजनेमधील रंगसंगतीवरती स्वतंत्र रीत्या केलेले काम आपणास दिसून येते.
धनश्री गाडगीळ यांचा सहज सुंदर अभिनय अनिता या भूमिकेशी एकरूप झाला होता. कलावंतांची पत्नी म्हणून होणारी घुसमट, मनोहर सारख्या कलंदर कलावंताची काळजी घेणारी, सामान्यजीवन जगण्यास प्रवृत्त करणारी,पतीची मैत्रिण स्वीकारणारी असे या भूमिकेचे कंगोरे...अत्यंत संयमित रित्या धनश्री गाडगीळ यांनी साकारले. शब्दा कुंभार यांची माधवी ही भूमिका देखील छान झाली. गुणदोषांसह इतर व्यक्तीला स्वीकारणारी, कलावंतांचा मनस्वी आदर करणारी आणि मनोहर वरती जिवापाड प्रेम करणारी माधवी अत्यंत उत्तमरित्या अभिनीत झाली.
माधवी आणि अनिता यांच्यामधील वैवाहिक आणि वैचारिक द्वंद्व अत्यंत सुरेख रित्या धनश्री गाडगीळ आणि शब्दा कुंभार यांनी साकारले. इरफान मुजावर यांनी रंगवलेला वेदनादायी चित्रकार दीर्घकाळ स्मरणात राहील असा होता. गुरू-शिष्याच्या नात्यातील लकी अर्थात मयूर पाटील देखील आपल्या लक्षात राहतो. धन्वंतरीचीच मूर्ती, एक खिडकी, ट्राय पॉड, माधवीचे सुंदर पेंटींग, कालदर्शक टेपरेकॉर्डर या नेमक्या वस्तूंच्या आधारे, लेव्हलच्या उत्तम मांडणीमधून उभे केलेले मनोहरच घर, तसेच पेंटींग, फिश टॅन्क यामधून साकारणारे माधवीचे घर या बाबी सिम्बॉलीक पद्धतीने मांडून, अर्थपूर्ण रित्या रंगमंच व्यापून टाकत होत्या.
ओंकार मोटे यांनी विविध रंगांच्या आधारे केलेली प्रकाशयोजना ही जमेची बाजू. प्रयोगातील प्रत्येक भावना, मूड आपणास खिडकीवर येणाऱ्या रंगसंगतीमधून जाणवत होता.'याद पिया की आये' , 'मैने लाखोंके बोल सहे' रचनामधून विशाल वांगेकर यांनी संहितेचा नेमका सूर पकडला होता. गडगडणारा, बरसणारा व शेवटी ओसरलेला पाऊस हा या नाटकाचा श्वास. संगीतामधून तो सुरू होतो..थेंबावर् येऊन विसावतो. वैष्णवी शेटे यांनी माधव,अनिता, यांच्या वेशभूषा भूमिकेस अनुसरून केल्या होत्या.
एखादी गझल तुम्ही ऐकण्यासाठी वारंवार प्रवृत्त होता, ठरवता की शब्दांमध्ये गुंतून जायचं नाही पण होत उलटच, शब्दांमध्ये गुंतून जाता व गझल केव्हा संपते कळत देखील नाही....उत्तम रचनेच, कलाकृतीच हे सर्वात मोठं वैशिष्ठ. एखाद्या नाट्यप्रयोगामधून ही अनुभूती देणें हे अवघड काम असते. पूर्णविराम नाटकाचा प्रयोग याची अनुभूती देतो.कलासक्त कलावंतांचे आयुष्य चिरंतन वेदनेसह...साभिनय रंगमंचीय आविष्कारमध्ये पूर्णविरामच्या माध्यमातून रूपांतरित होताना आपण अनुभवतो....आणि हा अनुभव दीर्घकाळ स्मरणात राहतो.
© प्रा.डॉ. गणेश मुडेगावकर
9421440940
Dr. Ganesh Mudegaonkar
Share
No comments:
Post a Comment