धर्माच्यापुढेही जाऊन जिंकते ती 'इनसानियत'.
नाटक : रुधीरम
लेखक: डॉ चंद्रकांत शिंदे
दिग्दर्शक: .डॉ चंद्रकांत शिंदे
प्रकाश योजना: वैभव देशमुख, ऋषीकेश भागवतकर
नेपथ्य: प्रशांत देशपांडे
संस्था: कामगार कल्याण केंद्र, बडनेरा, अमरावती
महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित 67 राज्यस्तरीय अंतिम नाट्य स्पर्धा 2019-2020 यास सुरुवात झाली. रसिक प्रेक्षकांसाठी एकूण 18 नाटकांची नाटय पर्वणी अनुभवता येणार आहे.
'रुधिरंम मूलम....' या संस्कृत श्लोकाचा भावार्थ असा शरीराचे मूळ (मुख्य) धातू रक्त आहे त्यामुळे त्याचे प्रयत्नपूर्वक रक्षण करावे कारण रक्त असेल तरच जीवन अव्याहतपणे चालू राहील. हाच मूळ धागा पकडून रुधीरम या दोन अंकी नाटयाची गुंफण करण्यात आली आहे.
या स्पर्धेतील हे पहिले नाटक काल सादर करण्यात आले.
समीर (समीर पंत) आणि सुमन (श्रद्धा पाटेकर) यांचा मध्यमवर्गीय संसार. राघव(चंद्रकांत शिंदे) हा त्यांचा एकुलता एक मुलगा. आई, वडील आणि राघव यांच्या मध्ये नेहमी विविध 'मुस्लिम आक्रमणे' ,मुघल राज्यात झालेले हिंदूंवर अत्याचार यावरून शाब्दिक चकमक उडत असते. राघवची मुस्लिम समाजाबद्दल टोकाची भूमिका व मतं सुमन आणि समीर यांना कायम अस्वस्थ करत असतात. यातच समीर हा एका दुर्धर आजाराने ग्रस्त आहे व काही दिवसांचाच सोबती आहे. त्यामुळे आईवडिलांची होणारी घालमेल वेगळीच.
हे सर्व घडत असताना अचानक एक मुस्लिम मुलगी सकीना (मधुरा राजनेकर)
राघव कडे अचानक आश्रयासाठी येते. राघव आपल्याच पक्या आणि मन्या या मित्रांपासून तिचे संरक्षण करतो. परंतु सकिनास जाणीव करून देतो की केवळ आई वडीलांच्या आग्रहाखातर मी तुला मदत केली.
यातच सकिनाचे वडील सुलेमान (चंद्रशेखर बरणे) आणि तिचे रशीद, उस्मान व अब्दुल हे तीन भाऊ तिच्या सुटकेसाठी येतात. सकिनास राघव आणि कुटुंबीयांनी त्रास दिला असे वाटून सुलेमान आपल्या मुलांसह राघववरती जीवघेणा हल्ला करतो. परंतु सकिना तो गैरसमज दूर करते. पण यामुळे निर्माण झालेला 'हिंदु- मुस्लिम' संघर्ष टिपेस पोहोचतो. सकिना हे सर्व घडत असताना चक्कर येऊन पडते. काही वर्षांपासून ती ब्रेन ट्युमर ने आजारी आहे. यातच सकिनाचे ऑपरेशन ठरते. तिचा ए बी निगेटिव्ह रक्तगट असणारी व्यक्ती उपलब्ध होत नाही. 'रुधीरम' हा संघर्ष खऱ्या अर्थाने इथून सुरू होतो.
राघवचा रक्तगट हा ए बी निगेटिव्ह आहे परंतू तो रक्त देण्यास नकार देतो. सुलेमान स्वतः मुलीसाठी राघवकडे रक्तदान करण्याची याचना करतो. राघव सुलेमान यास त्याच्या खाटीक या व्यवसायाची,त्यांनी सर्वप्रथम निर्माण केलेल्या दहशतीची, हल्ल्याची आठवण करून देतो. सुलेमान वचन देतो, यापुढे एकही निष्पाप जीवाचे रक्त सांडणार नाही.
राघवचे रक्त स्वीकारण्यास सकिना नकार देते. राघवच्या उपकाराची जाणीव आयष्यभर मला व माझ्या कुटूंबियांना त्रास देत राहील. त्यामुळे मी हे रक्त स्वीकारणार नाही ही तिची भूमिका असते.
परंतु सकिनाचे ऑपरेशन अयशस्वी झाल्यामुळे ती ब्रेन डेड होते. डॉ पाठक (अक्षय पवार) यांच्या सल्ल्यानुसार राघवचे ह्रदय बदलणे गरजेचे असते, सकिनाचे ह्रदय राघवला देण्याचे ठरवतात. सुलेमान यास मौलवी ( विराग जाखड) सकिनाचे ह्रदय दान करण्यास विरोध दर्शवतात.
शेवटी राघवला सकिनाचे हृदय ट्रान्सप्लांट करण्यात येते.
हिंदू - मुस्लिम संघर्षामध्ये धर्माच्यापुढेही जाऊन जिंकते ती 'इनसानियत'. 'तू न हिंदू हुवा, ना मुसलमान हुवा....तू तो बस्स इन्सान हुवा..सारा जहाँ हुवा..!! हा संदेश या प्रयोगातून आपणास मिळतो. काळाच्या कसोटीवर धर्म हा पारखून पहावा लागतो. रक्त कधीही आपला रंग बदलत नाही, रंग बदलतो तो माणूस आपल्या स्वार्थासाठी. 'रुधीरम' नेमकेपणाने हेच 'मुलतत्व' विविध प्रसंगामधून व संघर्षातून आपणा समोर मांडते.
लेखक, दिग्दर्शक आणि 'राघव' या मुख्य तिहेरी भूमिका चंद्रकांत शिंदे यांनी अगदी लीलया सिद्ध केल्या आहेत.
लेखनामध्ये ऐतिहासिक संदर्भ त्यांचा समकालीन घटनांशी समन्वय, दिगदर्शनामध्ये प्रत्येक प्रवेशातील संघर्ष, पात्रांची निवड, भाषा या सर्व बाजूंचा व्यवस्थित वापर देखील चांगला होता. सकिना ने आपली भूमिका अत्यंत समजूतदारपणे पार पाडली. समीर, सुमन सुलेमान, त्याची तीन मुले , पक्या , मन्या, डॉ. पाठक आणि मौलवी यासर्व पात्रांनी आपापल्या भूमिकांना योग्य न्याय दिला.
प्रशांत देशपांडे यांनी नेपथ्यामध्ये मध्यमवर्गीय फ्लॅट नेमकेपणाने उभा केला होता. देवघर, किचन, डायनिंग टेबल, सोफा आणि यांचा योग्य वापर दिसून आला. दुसऱ्या अंकात हॉस्पिटलची रचना सुसंगत होती. फक्त राघव आणि त्याच्या आई वडिलांना ये जा करत असताना अडचण निर्माण होते आहे असे वाटले.
वैभव देशमुख व ऋषीकेश भागवतकर यांनी प्रकाशयोजनेमधून या नाटकाचे संपूर्ण भावविश्व , त्यातील रंगसंगती अत्यंत सुरेखरित्या सांभाळली.
अक्षय वैद्य यांचे संगीत, अभिजित देशमुख यांची रंगभूषा आणि प्रकाश चितलंगे यांची वेशभूषा प्रयोगासाठी साजेशी होती.
स्पर्धेतील पहिलाच प्रयोग चांगला सादर झाल्यामुळे रसिकांची पुढील प्रयोगासाठीची उत्सुकता आणखी वाढली आहे.
प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर
Share
Excellent, sir..
ReplyDeleteThank you so much.
Delete