वर्ग संघर्षावर भाष्य करणारे: बेवारस
नाटक : बेवारस
लेखक: विलास पात्रीकर
दिग्दर्शक: मुकुंद पात्रीकर
प्रकाश योजना: किशोर बत्तासे 
नेपथ्य: सतीश काळबांडे

राजकारणाच्या व समाजकारणाच्या माध्यमातून प्रचलित समाजव्यवस्थेमधून नाकारला गेलेला पीडित, शोषित वर्ग मुख्य प्रवाहात आणण्याचे एक प्रभावी माध्यम आहे.।तळागाळातील घटक जेंव्हा मुख्य प्रवाहात येईल तेंव्हाच वर्ग संघर्ष संपून खऱ्या अर्थाने सामाजिक बदल व सर्वांगीण प्रगती होईल.
परंतू जर याच घटकाचा वापर जेंव्हा केवळ 'मतांसाठी' होतो तेंव्हा सुरू होतो 'आहेरे' आणि 'नाहीरे' यातील संघर्ष. याच वर्ग संघर्षावर भाष्य करणारे 'बेवारस' हे नाटक.

आमदार सुभेदार (यशवंत चोपडे) हे शहरातील मोठे प्रस्थ. शहरातील सर्वच अवैध धंद्यांवर यांची पकड. हे सर्व धंदे यशस्वीरित्या चालवण्यासाठी असणारी एक नवतरुणांची टोळी देखील आमदारांच्या दिमतीला आहे. निवडणुकीत सुभेदार यांचा  झोपडपट्टी सारखाच 'वस्ती' हा हक्काचा मतदारसंघ. निवडणुकीच्या अगोदर काही दिवस थोडी फार 'अर्थपूर्ण' देवाणघेवाण केली की आमदार सुभेदार यांचा निवडून येण्याचा मार्ग सुकर. 
याच वस्तीची, वस्तीच्या संघर्षाची आणि अन्याया विरुद्ध दिलेल्या लढ्याची ही कहाणी. 

शंकर ( प्रशांत मंगदे) आणि पार्वती (मंजूषा बोन्द्रे) यांचा छोटासा संसार. दिवाकर (अमित कुबडे) हा त्यांचा मुलगा. याच वस्ती मध्ये अस्लम ( अरुण सेलूकर) हा अनाथ तरुण राहत असतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतं मागण्यासाठी आणि पुढील बोलणी करण्यासाठी सुभेदार त्यांच्या सहकाऱ्यांना वस्तीवर पाठवतात. अस्लम , शंकर व पार्वती यास विरोध करतात. मागील पाच वर्षाचा हिशोब मागतात. या सर्वाचा राग म्हणून सुभेदार वस्ती पेटवून देतो. यात वस्तीचे अतोनात नुकसान होते. अस्लम याचा बदला म्हणून राजच्या (भगवान पवार) मदतीने आमदार सुभेदाराचा हात तोडतो. 

सुडाने पेटलेला आमदार सुभेदार संपूर्ण वस्ती संपवण्याची शपथ घेतो. सुभेदार यासाठी दिवाकरची निवड करतो. त्याला गाडी, मोबाईल, घर यासाठी पैसे देऊन वस्ती पासून हळूहळू दूर करतो. याच काळात बारीकराव (विलास कुबडे) यांच्या मुलीवर रूपावर (रोशनी सेलोकर) हात टाकतो. परंतु ती आपली सुटका करून घेते. 

राज आणि व्यवसायाने  नर्तकी असणारी केसर ( सायली आदमाने) हे दोघे लग्न करणार असतात.राज आमदार सुभेदाराच्या सर्व कारस्थानांना कायम विरोध करत असतो. त्याच्या सोबत आता अस्लम देखील आहे.

माधवी (भावना चौधरी) आमदार सुभेदार यांची पत्नी. ती या सर्व वास्तवापासून अनभिज्ञ असते . माधवीस जेंव्हा वास्तव परिस्थिती कळते तेव्हा ती या सर्व बाबींचा विरोध करते. परंतु सुभेदार यांना ही गोष्ट मान्य नसते . यातच माधवी सुभेदाराने रुपावर हात टाकलेला आहे ही गोष्ट समजते.  ती सरळ ते घर सोडून वस्ती मध्ये राहण्यासाठी जाते. वस्तीमध्ये गेल्यानंतर माधवी, अस्लम, राज, शंकर पार्वती,  रूपा, गोपी व बारीकराव या सर्व लोकांची साथ मिळते. दिवाकर आता पूर्णवेळ सुभेदार साठी काम करत असतो. पद, पैसा आणि खोटी प्रतिष्ठा याने तो हुरळून गेलेला असतो. वस्तीतील एकही व्यक्ती आपलं ऐकत नाही ही बाब सुभेदारास खूप सलु लागते.दिवाकरच्या मदतीने सुभेदार परत एकदा वस्ती पेटवून देतो.

दिवाकरला रुपाची लग्न करायचे असते. रूपाला मात्र गोपीसोबत लग्न करावयाचे असते. त्यामुळे रूपा या लग्नास तयार नसते. सुभेदार वस्तीतील प्रत्येक व्यक्तीच्या परिस्थितिचा गैरफायदा घेतो आणि टप्प्याटप्प्याने आपल्या कुटील राजकारणी पद्धतीने दिवाकर, त्याचा मित्र गोपी, शंकर असे सर्व आवाज उठवणारे लोक संपवतो. 

निवडणुकीच्या तोंडावर दहशत पसरविण्यासाठी सुभेदार रुपावरती अतिप्रसंग करतो. वस्तीमधे यामुळे प्रचंड असंतोष निर्माण होतो. माधवी, पार्वती व केसर मिळून सुभेदाराचे वस्तीमध्ये हातपाय तोडतात व बेवारस जगण्यासाठी सोडतात.  आणि राजकारणाचे पुढील सूत्रे माधवी स्वीकारते.

पहिल्या प्रवेशातील पाठीवर आग लागणे, रंगमंचाचा पूर्ण वापर, आग लागल्या नंतर बदललेले मास्किंग या सतीश कालबंडे यांनी केलेल्या नेपथ्याच्या जमेच्या बाजू . किशोर बत्तासे यांची प्रसंग उठावदार करणारी प्रकाशयोजना, वीरेंद्र लाटकर यांचे पार्श्वसंगीत प्रयोगासाठी उत्तम. 

आमदार सुभेदार यांनी आपल्या भूमिकेत समरस होऊन काम केले.  माधवी, शंकर यांनी आपल्या भूमिका योग्य रित्या पार पाडल्या. दिवाकर, रूपा नवखेपणा जाणवत होता. 

अन्यायाविरुद्ध जेव्हा आवाज उठवला जातो तेव्हा प्रस्थापित समाजव्यवस्था आवाज दडपून टाकण्याचा प्रयत्न करते. या दुष्टचक्रातून बाहेर पडण्यासाठी एखादी व्यक्ती प्रयत्न करते, त्याच व्यक्तीचा व्यवस्थेमध्ये बळी दिला जातो. हाच प्रत्यय आपणास या कलाकृतीमधून येतो. सामाजिक अभिसरणामध्ये जास्त काळ जर  हक्क नाकारला गेला तर त्याचे रूपांतर क्रांती मध्ये होते हाच संदेश यामधून आपणास मिळतो.
© प्रा डॉ गणेश मुडेगावकर
Dr Ganesh Mudegaonkar

Share