बाप.

 

आला आहेस स्वप्नामध्ये

तर काही हिशोब मांडून जा...

तुझ्या विना जगलेल्या

प्रत्येक क्षणाचा सहवास देऊन जा...

 

फार काही मागणार नाही 

फक्त हळुवार पाठीवर हात फिरवून जा..

जाताना काही बोलला नाहीस 

आज दोन शब्द तरी बोलून जा..

 

तुला सांगायच्या आहेत 

चार सुखदुःखाच्या गोष्टी..

प्रपंच नेटका होतोच रे

आपल्या इच्छांचं काय केलंस...

ते तेवढं सांगून जा...

 

अबोल वेदनांचा सागर होतास म्हणे तू

वेदनेचे अश्रू होऊ द्यायचा नाहीस..

तेवढं दुःखाचं बाजार न मांडण्याचं...

कौशल्य मात्र शिकवून जा...

 

तस लेकाच आणि बापाचं 

असतं तरी काय रे...

मी बोलूनही मला न समजलेलं आणि तू न बोलता मी उलगडलेलं..

... तेवढं कोडं मात्र सोडवून जा...

 

एकदा झालच शक्य तर..

प्रत्यक्ष भेटून बोलावं म्हणतो..

बोलण राहू दे..रे..

फक्त एकदा घट्ट मिठी मारून जा..!!

 

© . गणेश मुडेगांवकर 

२४.०८.२४





Share