*अध्यक्षीय भाषण
बालाजी सुतार*
नमस्कार!
अंबाजोगाई साहित्य संमेलनाच्या अध्यक्षस्थानावरून काही बोलण्याची संधी मिळते आहे, त्याबद्दल मराठवाडा साहित्य परिषदेच्या इथल्या शाखेचे अध्यक्ष श्री दगडू लोमटे, मसापचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि सदस्य, मसापच्या कामात आणि एकंदरीतच अंबाजोगाईच्या सार्वजनिक जीवनात सदैव पथदर्शी असलेले श्री अमर हबीब, या संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री सुदर्शन रापतवार, स्वागत-समितीचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य, आणि इतरही सर्व संबंधितांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
माझ्या आधीचे संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. दासू वैद्य यांचे मला स्वतंत्रपणे आभार व्यक्त करावे लागतील, याचं कारण, इथे अंबाजोगाईत आल्यावर ज्यांच्याकडे बघून आपणही काही लिहून पाहावं अशी मनात इच्छा उमटायला लागली, त्यातलं एक मोठं नाव ‘दासू वैद्य’ हेच होतं. मला याक्षणी प्रा. रंगनाथ तिवारी आणि प्रा. शैला लोहिया यांचीही आठवण येते आहे. या सगळ्यांच्या ‘अक्षरांचं’ माझ्यावर अतोनात ऋण आहे.
याआधी अतिशय महनीय आणि श्रेष्ठ साहित्यिकांनी अंबाजोगाई साहित्य संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलेलं आहे. मी त्या सगळ्यांच्या तुलनेत अतिशयच छोटा लेखक आहे, या गोष्टीची मला परखड जाणीव आहे. आताही, माझ्याशिवाय खूप सारे लिहिते लोक या आसनावर बसण्यासाठी योग्य आहेत, याचीही मला नम्र जाणीव आहे.
‘साहित्य संमेलन’ या आयोजनाबद्दल मला, मी काहीही लिहित नव्हतो, तेव्हापासून ओढ वाटते. अनेकदा संमेलनांबद्दल लोक चांगलं बोलत नाहीत, हे मला ठाऊक आहे. काहीही लिहित नव्हतो, आणि फक्त वाचत असायचो, त्या काळापासून मी पदरमोड करून संमेलनांना जात आलेलो आहे. निव्वळ ‘श्रोता’ म्हणून! अतुल आकुसकर आणि शेखर आडसकर या दोन मित्रांसोबत अतुलच्या बजाज मोटरसायकलवर ट्रिपलसीट बसून गावापासून शे-दीडशे किलोमीटरच्या त्रिज्येतल्या अनेक संमेलनांना आम्ही तिघेजण त्यावेळी निव्वळ ऐकण्यासाठी आणि कवी-लेखकांना ‘पाहण्यासाठी’ जायचो. त्यावेळी, आणि नंतरही कधी, स्वत:हून 'कवीकट्टा' वगैरेची पायरी चढलेलो नसलो, तरी, पुढे थोडाफार गंभीरपणे लिहायला लागल्यानंतर या अंबाजोगाई साहित्य संमेलनापासून, मराठवाडा साहित्य संमेलन आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांपर्यंतचे सोहळे मी ‘निमंत्रित’ म्हणून मंचावरून अनुभवलेले आहेत.
या सगळ्यात, मला छोट्या संमेलनांबद्दल नेहमीच प्रेम वाटत आलेलं आहे. छोट्या म्हणजे भौगोलिक व्याप्तीच्या अर्थाने छोट्या. जिल्ह्या-तालुक्यापुरती, किंवा आपल्यासारखी गावापुरती होणारी संमेलने.
'आम्ही नामवंत लेखक (किंवा आयोजक) आहोत', असं कसलंही अभिनिवेशी ओझं न मिरवणारी आणि साहित्याबद्दल मनापासून प्रेम असलेली मंडळी अशा संमेलनांमध्ये अधिक असतात. पदरमोड करून संमेलन बघायला, ऐकायला येणारी, तिथे स्टॉलवर जमेल तशी पुस्तकं चाळणारी, विकतही घेणारी, गावा-खेड्यातली साधीसुधी उत्सुक वाचक-माणसं अशाच संमेलनांमधून पाहायला मिळतात. ही पुस्तकांवर जीव लावणारी, कुतूहलाने पुस्तकं हाताळणारी, निरखणारी माणसं बघायला मला आवडतं.
साहित्याच्या अनेक व्याख्या करता येतात, मात्र ‘संमेलन’ ही गोष्ट व्याख्येत बसवता येणं जरासं कठीण आहे. सुगीच्या हंगामात भरघोस पीक यावं त्याप्रमाणे दिवाळीपासून पुढे पाडव्यापर्यंत वेगवेगळ्या संमेलनांची रेलचेल महाराष्ट्रात असते. काही शहरांत लिट-फेस्टही होतात. ‘दर्जा’ मात्र मोजक्याच ठिकाणी राखला जाताना दिसतो, कारण मुळात विचार करणारी आणि संवेदनशील माणसेच कमी संख्येने असतात. सध्याच्या कोलाहलाच्या काळात अशा लोकांचं विखरून जाणं, भ्रष्ट होणं किंवा त्यांचा विवेकी आवाज विरत जाणं ही एक मोठीच समस्या आहे. त्यामुळेच – ‘माझ्यासोबत किंवा माझ्याविरुद्ध’ अशी काळी-पांढरी विभागणी सरसकटपणे करून टाकण्याच्या काळात ‘माणसासाठी आणि माणुसकीच्याविरुद्ध’ या मूलभूत व समजूतदार ओळखी विसरून जाऊ नये म्हणून लिहिणे - ही एक मोठी जबाबदार कृती ठरते. साहित्य संमेलनांच्या माध्यमातून अशा प्रकारचा जागर अपेक्षित असतो. किमान तो जागर घडून येण्याच्या दिशेने काही हालचाली अशा संमेलनांच्या माध्यमातून निश्चितपणे घडून येतात, असं मला वाटतं.
साधारण एकोणीसशे ब्याण्णव-त्र्याण्णव या वर्षी इथे स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात शिक्षणासाठी आलो, तेव्हापासून या गावाबद्दल मनात जे प्रेम निर्माण झालं, ते आज तीन दशकांनंतरही किंचितसुद्धा कमी झालेले नाही. याचं मुख्य कारण हे, की, हे गाव मुळातच तितका जीव जडण्यालायक, तितका आदर करण्यालायक आहे. ‘गाव’ म्हणजे नुसती गावातली देखणी घरं, आखीव लांबरुंद रस्ते, विजेचे प्रकाशमान खांब, दुकानांच्या लखलखत्या पाट्या आणि नगर परिषदेतला गावाचा नकाशा, वगैरे नसतं. ‘गाव’ म्हणजे गावातली माणसं असतात. नदीसारखी जिवंत खळाळती, हळवी किंवा उग्र, ठाम आणि तरल, स्वत:चा संसार नेटका करून गावाचं भलं चिंतिणारी कणखर आणि सज्जन माणसं. कला-साहित्यात रमणारी रसिक आणि समाजकारणात नीतिमत्ता जोपासणारी माणसं. काही भली, काही वाईटही. अशा सगळ्या माणसांनी गावाला ‘गावपण’ दिलेलं असतं. माणसांनी, माणसांच्या वैयक्तिक-सार्वजनिक वर्तन-व्यवहारांनी, चरित्र-चारित्र्याने गावाचं एक ठळकपणे जाणवेल असं व्यक्तिमत्व निर्माण झालेलं असतं. अंबाजोगाईपुरता विचार केला, तर इथे अशी विराट उंचीची माणसं होऊन गेली, आजही आहेत, ही गोष्ट या गावाबद्दल प्रेम निर्माण करायला पुरेशी आहे. आद्यकवी मुकुंदराजांपासून, ‘पासोडी’कार दासोपंतांपासून, प्रखर स्वातंत्र्यसेनानी स्वामी रामानंद तीर्थांपासून, विराट ताकदीचे कादंबरीकार प्रा. रंगनाथ तिवारी आणि सुस्मृत रामकाका मुकद्दम, एकनाथराव गुरुजी, प्रा. शैला लोहिया; उर्दूतले कवी वफा साहेब, कवितेसोबत वैचारिक लेखनही मागे ठेवून गेलेले शाकेर अहमदपुरी; रा. द. अरगडे, त्र्यंबक आसरडोहकर, सूर्यकांत गरुड, प्राचार्य संतोष मुळावकर, मंदाताई देशमुख, डॉ. ए. बी. देशपांडे आणि नंतरच्या काळातल्या बलभीम तरकसे, डॉ. श्रीहरी नागरगोजे, गणपत व्यास, प्रा. कमलाकर कांबळे, दगडू लोमटे, दिनकर जोशी, प्रा. मुकुंद राजपंखे, सुधीर धावडकर, विश्वंभर वराट गुरुजी, प्रा. अरुंधती पाटील, डॉ. शुभदा लोहिया, प्रतिभा देशमुख, प्रा. शैलजा बरूरे, प्रा. वैशाली गोस्वामी, प्रा. अलका तडकलकर, अनुपमा मोटेगावकर, निशा चौसाळकर, प्रा. भगवान शिंदे, प्रा. विष्णू कावळे, विद्याधर पांडे, गोरख शेंद्रे, अमृत महाजन, नामदेव गुंडाळे, ते अगदी अलीकडच्या पिढीतले अतिशय विचक्षण असे लेखन करणारे गोपाल तिवारी आणि उर्दू साहित्य अकादमीचा पुरस्कार लाभलेले अलीम अजीम; आणि संध्या सोळंके-शिंदे, तिलोत्तमा पतकराव यांच्यापर्यंतच्या अनेकानेक सशक्त कवी-लेखकांपर्यंतची, सुस्मृत माणिकराव संघई यांच्यासारख्या गायक आणि शंकरराव पांडे यांच्यासारख्या कमाल तबलावादक असलेल्या गायक-संगीतकारांची, सौ. ललिता मुकद्दम किंवा डॉ. दिलीप घारे, संजय सुगावकर, प्रा. संपदा कुलकर्णी यांच्यासारखे अप्रतिम नाट्यकलावंत, राजकारणात उच्चतम नैतिकतेचे मानदंड स्थापित केलेले माजी खासदार बाबासाहेब परांजपे आणि माजी खासदार कॉम्रेड गंगाधरअप्पा बुरांडे, नितांत तळमळीने समष्टीविषयक मूलभूत काम उभे करणा-या डॉ. द्वारकादासजी लोहियांसारख्या, अमर हबीब यांच्यासारख्या कृतीशील साहित्यिक-सामाजिक कार्यकर्त्यांपर्यंतची ही मांदियाळी या गावाला एक कमालीचा नैतिक, सांस्कृतिक आणि अत्यंत आदरणीय असा चेहरा बहाल करत आलेली आहे.
अशा माणसांनी भारलेलं कुठलंही गाव सुंदरच असणार अतोनात!
वर्षभर घडवून आणले जाणारे कार्यक्रम, अनेक संस्था आयोजित करत असलेली व्याख्याने, संगीतसभा, कवी-संमेलने, हे आपल्या गावाचं विशेष सांस्कृतिक धन आहे. आणखी कुठल्या गावात इतक्या मोठ्या संख्येने सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन होत असल्याचं निदान माझ्या ऐकिवात नाही. या संदर्भात मुद्दाम उल्लेख करावाच लागेल असा इथला यशवंतराव चव्हाण स्मृती समारोह! सुजन राजकारणी असलेल्या सुस्मृत भगवानराव लोमटे यांच्या पुढाकारातून चालू झालेल्या आणि मागच्या तीन दशकांपासून दगडू लोमटे यांनी महाराष्ट्रभर एकहाती नावारूपाला आणलेल्या या समारोहाने या सबंध शहरावर, इथल्या पुढच्या-पुढच्या पिढ्यांवर कला-साहित्य-संगीताचे अक्षरश: संस्कार केलेले आहेत. महाराष्ट्रातल्याच नव्हे, तर भारतीय पातळीवरच्या कित्येक ख्यातकीर्त साहित्यिकांना, विचारवंतांना, पत्रकारांना, शास्त्रीय गायकांना, वादकांना मी इथे ऐकलं. व्यक्तिश: माझ्या सांस्कृतिक घडणीमध्ये या समारोहाचाही खूप मोठा वाटा आहे, हे मला आवर्जून सांगावेच लागेल.
या गावात, इथल्या स्वाराती महाविद्यालयात शिकायला आल्यावर मला सगळ्यात जास्त भारी काय वाटलं असेल, तर ते तिथलं ग्रंथालय! वाचनालयांचं, ग्रंथालयांचं, पुस्तकांचं जग ही मला नेहमीच अद्भुत गोष्ट वाटत आलेली आहे. इथे येण्यापूर्वी माझ्या गावातल्या एकुलत्या ग्रंथालयाचाही मी सदस्य असायचो. पण ते फारच छोटं ग्रंथालय होतं. पुस्तकांची दोनतीन कपाटे होती फक्त. साम्यवादी कार्यकर्त्यांनी स्थापन केलेलं असल्यामुळे त्यात अर्धंअधिक अनुवादित रशियन साहित्य असे. आणि बाकीची गोष्टीची पुस्तकं! कथा, कादंबरी वगैरे सगळीच पुस्तकं त्याकाळी माझ्या लेखी ‘गोष्टी’चीच पुस्तकं असत. (ते बरोबरही होतंच. ‘गोष्ट सांगणं’ हीच काहीही लिहिण्यामागची मुख्य उर्मी असते.) ही पुस्तकं सहसा बाबा कदम, सुहास शिरवळकर, व.पु.काळे अशा लोकप्रिय लेखकांची असत. अर्थात तिथेच मी काही फार ‘क्लासिक’सुद्धा वाचलंच होतं. त्या चिमुकल्या ग्रंथालयाने माझ्यातला ‘वाचक’ तयार करण्यात फारच मोठा वाटा उचललेला आहे.
या सगळ्या पार्श्वभूमीवर इथे स्वाराती महाविद्यालयात आल्यावर आणि महाविद्यालयातल्या ग्रंथालयाचा जबरदस्त आवाका लक्षात आल्यावर मी हरखून गेलो नसतो, तरच नवल होतं. मला हवं ते पुस्तक तिथे मिळायचंच. मी तिथे वाट्टेल ते वाचलं. कथा, कविता, कादंबरी यातलं जे मिळेल ते! कुणाला अतिशयोक्ती वाटू शकेल, पण त्या काळात मी जवळजवळ रोज एक पुस्तक वाचून काढायचो. ‘भाषा’ आणि ‘साहित्य’ या काय ‘कमाल’ गोष्टी असतात, याची मला त्याच काळात प्रकर्षाने जाणीव व्हायला लागली होती.
‘अनुभव घेणं’ हा ‘शहाणं’ होण्याचा एकमेव मार्ग असतो. आणि ‘वाचन करणं’ हा अनुभव घेण्यासाठीचा एक अतिशय महत्वाचा मार्ग! आपल्या जगण्यापलीकडचे, आपल्या परिघाबाहेरचे, कल्पनातीत अनुभव आपण केवळ वाचनातूनच मिळवू शकतो.
महाविद्यालयीन शिक्षण संपल्यावर तिथल्या ग्रंथालयाचा संबंध संपला आणि वाचनाच्या बाबतीत मला एकदम उपासमारीसारखी जाणीव व्हायला लागली. मग मी नगर परिषदेच्या ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर ग्रंथालया’चा सदस्य झालो. काही वर्षांनी ‘साहित्य निकेतन’ या ग्रंथालयाचा सदस्य झालो. ‘वाचक’ म्हणून, ‘लेखक’ म्हणून मी आजवर जो काही थोडाफार घडलो असेन, त्यात या तिन्ही ग्रंथालयांचा सिंहाचा वाटा आहे.
आपण वाचायला लागतो, आणि काहीएक काळ उलटल्यावर आपणही काही लिहून पाहावं, असं आपल्याला वाटायला लागतं. वाचना-लेखनातला हा एक अपरिहार्य असा सहसंबंधच आहे. ‘चांगला वाचक हा संभाव्य लेखक असतो’, असं नेहमीच म्हटलं जातं. त्याच न्यायाने कधीतरी मीही लिहायला लागलो असेन.
मागे एकदा, एका नियतकालिकासाठी, ‘मी का लिहितो?’ अशा शीर्षकाचा लेख लिहायचा असताना या प्रश्नांच्या उत्तरात आपण काय-काय सांगू शकू, असा विचार करायला लागलो, तेव्हा आधी मला वाटलं, हा काय प्रश्न होऊ शकतो काय? एखादा माणूस एसटीत कंडक्टर होऊन निव्वळ चिल्लर पैशांपायी प्रवाशांशी वाद घालत आयुष्यभर हिंडत राहतो तो कशासाठी? किंवा कुणी एमेसीबीमध्ये लाईनमन हौसेनं झालेला असतो का? नसतो. त्याला ते-ते तसं-तसं करत राहावं लागतं, कारण ते करण्याशिवाय त्याच्याजवळ दुसरा काही उपाय उरलेला नसतो. ‘लिहावंसं का वाटलं?’ या प्रश्नाचंही हेच उत्तर असू शकतं. लिहिण्यापलीकडे आपल्याजवळ दुसरा काही उपायच उरलेला नाही, म्हणूनच केवळ मी लिहितो, असंच तो विचार करताना अखेरीस माझ्या लक्षात आलं.
अखेरीस म्हणजे अगदी अलीकडच्या काळात. या पंधरा-वीस वर्षांत. त्यापूर्वीही आठ-दहा वर्षे मी लिहित होतोच, पण ते खरोखर ‘लिहिणं’ होतं असं मला आता वाटत नाही.
म्हणजे खूप वर्षांपूर्वी मी एक कविता लिहिलेली मला आठवते. तिच्यात कुणा अनामिकेला उद्देशून ‘तू आयुष्यात येशील, तर जन्माच्या उन्हाचं लख्ख चांदणं होईल..’ अशा दोन ओळी होत्या. आता हे ‘जन्माचं उन्ह’ वगैरे मी लिहिलं, पण या उन्हाचा मला तेव्हा कसलाही अनुभव नव्हता. विशीच्या आतबाहेर माझं वय असेल, तेव्हा मी हे लिहिलं होतं. त्या वयात ‘वयाची’ अशी काहीएक मागणी असते, त्यातून या असल्या कविता लिहिल्या जातात. अख्ख्या जन्माचं उन्ह व्हावं असलं काहीच माझ्या आयुष्यात तेव्हा घडलेलं नव्हतं. ना माझा प्रेमभंग झालेला होता, ना कुणाच्या नादात माझं आयुष्य दिवाळखोर झालेलं होतं. मग हे ‘जन्माचं उन्ह’ माझ्या लिहिण्यात आलं कुठून?
बहुधा कुणाच्या तरी आवडलेल्या प्रेमकवितेच्या अनुकरणातून ते आलेलं असणार.
ही कविता, यातली तरल भावना, शब्दकळा, मला आजही आवडणारी असली तरी आज मी या लेखनाकडे पाहतो तेव्हा मला ते कमालीचं कृतक वाटतं. अशा प्रकारच्या शे-शंभर कविता मी तेव्हा आणि त्यानंतरच्या काही वर्षांत लिहिल्या असतील. ‘आपण कवी आहोत’, असं मला त्यावेळी वाटायचं.
आज विचार करतो तेव्हा मला उमगतं, की, मी तेव्हा ‘कवी’ नव्हतो. त्या कविता लिहिणं हे निव्वळ काही वयसुलभ संवेदनांना शब्दांत बांधणं होतं. कविता लिहिण्यातला सुरुवातीचा अनुकरणाचा, स्व-सुखावणारा, त्या वयातल्या मानसिक, शारीरिक आणि अर्थातच सुप्त लैंगिकही भावनांना वाट करून देणा-या त्या काल्पनिक प्रेमकविता आणि अनेक निसर्गपर वगैरे असलेल्या रम्य कविता लिहिण्याचा असा काही काळ गेल्यानंतर, हळूहळू माझ्या असं लक्षात येऊ लागलं की माझ्या दुष्काळी भोवतालात ज्याला ‘निसर्ग’ म्हणतात तसलं काहीही नाही आणि ज्याला ‘प्रेम’ म्हणावं असंही काही नाही. माझ्याभोवती विदीर्ण करून टाकणारं दारिद्र्य आहे, नेमाने येणारा दुष्काळ आहे, कोरडा ओढा आहे, आटलेल्या विहिरी आहेत, दरसाल उध्वस्त होणारा कुणबी आहे, तहहयात वेदनांच्या जत्रांनी ज्यांच्या भाळावर पालं ठोकलेली आहेत अशा अश्राप बायका आहेत, आणि कसलाही आशादायक भविष्यकाळ नसलेल्या माझ्यासकट जगण्यातून मुळं उखडलेली माझी पिढी आहे, याची प्रकर्षाने जाणीव होऊ लागली. काल्पनिक पानाफुलांवर – नद्याडोंगरांवर आणि काल्पनिकच सुबक ठेंगणीवर कविता लिहिणे ही आपल्या भोवतालाशी केलेली प्रतारणा ठरेल, हे हळूहळू माझ्या आत मला उमगत गेले. मला वाटलं, माझ्या सभोवतीच्या निव्वळ भुईसरपट जगण्यातला कोलाहल, त्यातले स्तर, त्यातल्या व्यथा माझ्या कवितेनं मांडायला हव्यात. आधीची मघाशी मी उद्धृत केलेली कवितेची ओळ कुणा मुलीबद्दलची भावना सांगणारी होती. नंतर कधीतरी माझ्या लक्षात आलं की जिच्या स्मरणाचं अत्तर व्हावं अशी कुणीही मुलगी आपल्या आयुष्यात तोपर्यंत कधीही प्रत्यक्ष आलेली नव्हती, त्याअर्थी आपण लिहिलेली ही कविता हा केवळ आपल्या कल्पनाशक्तीचाच पुरावा आहे.
माझ्या भोवतालात त्यावेळी कशा प्रकारच्या मुली, किंबहुना कशा अवस्थेत जगणारी एकूणच स्त्री-जात होती?
बायकांना छळणारे अनेक पुरुष माझ्या भोवतालात होते आणि तो छळ निमूट सोसत राहून आयुष्यभर मनात कणाकणाने जळत राहणा-या असंख्य स्त्रिया तिथे होत्या. या छळ करणा-यांत माझे गावकरी, माझे शेजारीपाजारी, माझ्या स्वत:च्या आणि भोवतालातल्या यच्चयावत घरांमधले बाप, चुलता, मामा वगैरे पुरुष होते आणि सोसणा-यांत घराघरातल्या आया, चुलत्या, माम्यांसकट हजारो बायका होत्या.
या बायकांच्या काळोख्या जगण्याबद्दल आणि त्यांच्या जन्माच्या भाळावर रेखलेल्या नागासारख्या जहरी पुरुषांबद्दल बोलणारी एक कविता मी नंतर कधीतरी लिहिली-
‘जन्म काळा’ असं तिचं शीर्षक आहे. –
रात्र काळी,
घागर काळी.
रान काळं,
डोह काळा.
जातं काळं,
तवा काळा.
चूल काळी,
धूर काळा.
कपाळ काळं,
गोंदण काळं.
आभाळ काळं,
माती काळी.
चोळी काळी,
ठुशी काळी.
साज काळा,
संग काळा,
सोस, बाई,
भाळावरती,
लख्ख जहरी,
नाग काळा!
- ही कविता आता वाचतो, तेव्हा मला वाटतं की आपण काही प्रमाणात का होईना ‘कवीपण’ पेलून धरण्याचा प्रयत्न केला आहे. आता मला असंही वाटतं, की आपण ‘कवी’ असतो तेव्हा आपण केवळ ‘प्रेमकवी’ असणं गरजेचं नसतं. कवितेने स्वत:च्या किंवा लोकांच्या सुखांची किंवा त्यांच्या मनोरंजनाची जबाबदारी घ्यायची फार काही आवश्यकता नाही. सुखाची कविता करायला हरकत नाहीच; इथल्या माणसांच्या दुखण्यांवर बोट ठेवून ते जगाच्या वेशीवर टांगण्याची गरज अधिक आहे. हे दुखणं आपण असं वेशीवर टांगत राहिलो तर त्यातून कुणाच्या तरी आतल्या संवेदनेला, सहवेदनेला हाकारता येणं, जागवता येणं शक्य होऊ शकतं.
मला वाटतं, आसमंतातल्या सर्वस्तरीय जखमांबद्दल कवी-लेखकांनी बोलणं आवश्यक असतं. ज्या प्रकारचा काळ आपल्याभोवती वस्तीला आलेला आहे, त्याची नोंद घेणं, हे कवी म्हणून आणि आता मागच्या काही वर्षांत कथालेखक म्हणूनही मला सदैव महत्वाचं वाटत आलं आहे. अनेक अर्थांनी अतीव संक्रमणाचा असलेला हा काळ साहित्यातून वाचकांच्या पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहचला तर त्या पिढ्या ज्या ‘भुई’वर उभ्या असतील, त्या भुईची घडण त्यांच्या लक्षात येईल.
एक काळ असा होता की एकूणच साहित्यक्षेत्रात अभिजन लेखकांचा आणि अनुषंगाने अभिजन वास्तव्य करतात, त्या भू-सांस्कृतिक पर्यावरणाचाच वरचष्मा होता. म्हणजे गो. नी. दांडेकरांची ‘पडघवली’ किंवा श्री. ना. पेंडसेंची ‘तुंबाडचे खोत’ सारखी एखादी प्रसिद्ध कादंबरी वाचली तर कोकणस्थ ब्राम्हणांच्या माजघरात काय पद्धतीचं वातावरण असे किंवा ‘खोत प्रथा’ काय होती, ‘सड्यावर जाणं’ म्हणजे नेमकं कुठे जाणं किंवा वाहत्या ओहोळाला तिकडे ‘प-ह्या’ म्हणतात, हे मला माहीत व्हायचं. जगबुडीची पूजा किंवा कथित अभिजन घरांतली डोहाळजेवणाची गाणी कसली असत, तेही मला माहीत व्हायचं. पण धर्माने हिंदू असलेले मराठवाड्यातले शेतकरी सणावाराच्या दिवशी गावातल्या दर्ग्यातल्या मुसलमान पीरांना नैवेद्य का पाठवतात हे, किंवा आपल्या शेजारच्या घरातला कुणबी किंवा शेतमजूर किंवा गावगाड्यातला बलुतेदार पिढ्यानपिढ्या कशा प्रकारच्या संघर्षाला सामोरा जातो आहे, हे मला साहित्यातून समजून घ्यायचं असेल तर ते नेमकं वास्तवदर्शी स्वरुपात उपलब्धच नसे. मी सामान्य वाचक होतो, म्हणजे एका ठराविक पर्यावरणातलंच मला वाचावं लागत असे. अर्थात याला आक्षेप नाहीच. कारण त्या साहित्यातून ठळक होणारं पर्यावरण परदेशीय नव्हतं किंवा त्या पर्यावरणाशी आपण वैर मांडावं असंही काही नव्हतं. त्या संदर्भात फक्त एकच गोष्ट होती की ते फारच मर्यादित, फारच थोडक्यांच्या जगाबद्दल बोलणारं होतं. मराठी साहित्यात दीर्घकाळ प्रकट होत असलेलं ते सांस्कृतिक पर्यावरण अनेक अर्थांनी एकारलेलं होतं. कारण त्यात त्या पलीकडच्या खूप विशाल समूहाच्या जगण्याबद्दल, त्यातल्या ताणांबद्दल काहीही फारच क्वचित आलेलं असे.
मी जेव्हा व्यंकटेश माडगूळकर, शंकर पाटील, द.मा. मिरासदार यांचं किंवा बाबुराव बागुल, दया पवार, लक्ष्मण माने, माधव कोंडविलकर किंवा भालचंद्र नेमाडे, रंगनाथ पठारे, राजन गवस, राजन खान यांचं लेखन वाचलं, तेव्हा मला वाटलं की यातलं खूपसं आपल्याही भोवतालाबद्दलचं आहे. आपण लिहायचं असेल तर असंच काहीतरी लिहायला हवं. मग नंतर माझ्या लक्षात आलं या लेखकांनी जे लिहिलं आहे, जी माणसं चितारली आहेत, ज्या गोष्टी सांगितल्या आहेत, त्यातला काळ आता सरून गेलेला किंवा सरत चाललेला आहे. त्यांनी ‘त्यांच्या काळाबद्दल’ लिहिलं होतं. आपल्याला काही लिहायचंच असेल तर आपण ‘आपल्या काळाबद्दल’ लिहायला पाहिजे.
आपला, माझा काळ म्हणजे कोणता काळ?
मी महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच भारताने जागतिकीकरण आणि मुक्त अर्थव्यवस्थेच्या दालनात प्रवेश केला होता. चार-सहा वर्षांचा काळ गेला आणि त्याचे दृश्य परिणाम दिसायला लागले. यापूर्वी कधी नव्हत्या एवढ्या आक्रमकपणे बाजारयंत्रणा घरात घुसल्या. टीव्ही चॅनेल्समधून प्रचंड हिंसा आणि बीभत्स लैंगिक अविष्कार घराघरात घुसले. मोबाईल्सच्या निमित्ताने जग मुठीत आल्याची भावना निर्माण झाली. बंगल्यांसाठी, गाड्यांसाठी चोवीस तासांत कर्जपुरवठा होऊ लागला आणि याच बॅंका पेरणीसाठी लागणा-या दहापाच हजारांसाठीही शेतक-यांना जवळ येऊ देत नाहीत, हे चित्र ढळढळीतपणे समोर येऊ लागलं. भूमिहीनांच्या समस्यांचं स्वरूप बदललं आणि बलूतेदारांसारख्या इतर श्रमजीवींच्या रोजगाराचे पारंपारिक व्यवसाय क्रमश: मोडकळीला येत गेले. एका बाजूला हे, आणि दुस-या बाजूने याच काळात ऋतूचक्रामध्ये अत्यंत विषम स्वरूपाचे बदल झाले. ‘ग्लोबल वार्मिंग’ सारख्या कधीही न ऐकल्या-बोललेल्या गोष्टी गावाच्या वेशी ओलांडून आत आल्या. शेकड्यांच्या संख्येत दरवर्षी शेतकरी आत्महत्या घडू लागल्या. गावठी पुढा-यांनी राजकारणाचे अड्डे बनवलेल्या खाजगी शिक्षणसंस्थांमधून नीट वाचता-लिहिताही येत नसलेल्या पदवीधरांचे तांडेच्या तांडे जन्म घेऊ लागले आणि ‘पर्मनंट बेकार’ या नव्या समाजघटकाची लोकसंख्या बेफाट वाढू लागली. वाढत्या शहरीकरणाने, ढासळत्या कृषिजीवनाने आणि सर्वव्यापी होऊ घातलेल्या तांत्रिक प्रगतीने आणखीही अनेक दृश्यादृश्य ताण भोवतालात प्रकटलेले आहेत. एकीकडे जीडीपी आणि भौतिक-आर्थिक प्रगतीच्या चर्चा घडत असतानाच दुसरीकडे सामान्य माणसांच्या दैनंदिन जगण्यातली गुंतागुंत कमालीची अस्वस्थ करणारी ठरते आहे. मागच्या दोन-तीन दशकांपासून धार्मिक-जातीय विखारांचे प्रचंड टोकदार भाले आपल्या आसमंताला भोसकत असल्याचे मी पाहत आलो आहे. हे पाहताना मला वाटत आलं, की माझ्या पिढीच्या लेखकांनी हे सगळं जगासमोर मांडायचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या भोवतालातल्या व्यथांना आपल्या लिहिण्यातून वाचा फुटायला हवी. हे आणि असे बरेच काही मनात रुजत गेले आणि त्यानंतर मग मला भान आलं की आपण अधिक गंभीरपणे लेखणी झिजवायला हवी आहे.
माझ्या कवितेतून आणि इतर गद्य कथात्म-लेखनातून मी या गोष्टी नोंदवण्याचा सातत्याने प्रयत्न करतो. आता, या मानसिक टप्प्यावर, स्वत:ला सुखावण्यासाठी, ‘लेखक’ हे सन्मानाचं बिरूद मिरवता यावं यासाठी, किंवा त्या अनुषंगाने मिळणारे लहानमोठे लाभ मिळवण्यासाठी लिहावं असं मला वाटत नाही. मी लिहितो, कारण हे मी लिहिलं नाही, तर मला स्वत:शी, स्वत:च्या काळाशी प्रतारणा केल्यासारखं वाटत राहील. ‘मी लेखक आहे’ असं आपण म्हणत असू तर आपल्या हाती असलेलं ‘शब्द’ हे साधन वापरून आपण जगाला अधिकाधिक ‘मानवी’ करण्याचा प्रयत्न करायला हवा. निव्वळ कल्पनेचे, निव्वळ शब्दांचे खेळ करण्यात काही अर्थ नसतो.
नुसत्या माझ्या स्वत:च्या भौतिक भोवतालातच नव्हे, तर एकूणच व्यापक सामाजिक परिप्रेक्ष्यात आपल्या चौफेर आसमंतात जे अमानवी तत्व रुजत चालल्याचं चित्र मागची काही वर्षे इथे दिसत आहे, त्यावर आपण बोलायला-लिहायला हवं, असं आज मला वाटत असतं. प्रसंगी धोका पत्करूनही ते लिहायला हवं, असंही.
घरापासून काही अंतरावर डॉ. नरेंद्र दाभोलकरांचं, घराच्या अंगणात कॉ. गोविंद पानसरेंचं आणि घरात घुसून डॉ. एम.एम. कलबुर्गींचं राजरोस रक्त सांडलं जात असेल, तर मला वाटतं, माझ्या कमी-अधिक शक्तीनुसार त्या हिंसेच्या विरोधात मी निदान बोलायला तरी पाहिजेच. आणि लेखक म्हणून हे ‘बोलणं’ मी लिहून बोलायला हवं. लेखी शब्दांवर अजूनही जबाबदारीचं नैतिक बंधन उरलेलं आहे. लेखी शब्दांवर अजूनही लोकांचा विश्वास असलेला दिसतो. शिवाय ‘लिहिणं’ ही कृती नुसत्या बोलण्यासारखी एका क्षणात वा-यावर विरून जाणारी नसते. लिहिण्याच्या कृतीला थोडंसं अधिक आयुष्य लाभतं, त्यामुळे ती कृती इतरांपर्यंत अधिक प्रभावीपणे पोहचू शकते.
मग मी कविता लिहिली-
- मग एक गोळी आली, मस्तक भेदून गेली,
मग आणखी एक गोळी आली, आणखी मस्तक भेदून गेली,
मग आणखी गोळी, आणखी मस्तक.
मग, हे कुणी केलं याचा तपास चालू झाला, होत राहिला, संपलाच नाही कधी.
मग ते म्हणाले,
अमुकतमुक बोलणारी आणखी मस्तके आली तर आमच्याकडे आणखी गोळ्या आहेत,
पुढचा नंबर अमुकतमुक यांचा.
मग, हे कोण म्हणाले याबाबत तपास चालू झाला, होत राहिला, संपला नाही कधीच.
मग, त्यांनी झाल्या नंबरावर फुली मारली, आणि,
पुढच्या नंबराभोवती लाल रंगाचं धमकीवजा वर्तुळ आखलं.
त्याचे सूचनावजा फोटोसुद्धा ‘जनहितार्थ’ जाहीर केले त्यांनी.
मग हे कुणी केलं याबाबत तपास चालू झाला, होत राहिला, प्रथेप्रमाणे तोही संपला
Share
No comments:
Post a Comment