दांभिक पुरोगामीत्वाचा बुरखा फाडणारे: जाता नाही जात
लेखक: सिद्धार्थ तांबे
दिग्दर्शक: प्रा.डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे
(नाट्यशास्त्र विभाग, स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालय, अंबाजोगाई, जि. बीड)
जागतिकीकरणाने विविध सेवा क्षेत्रे खुली करून अर्थव्यवस्थेला प्रगतीचे नवीन पंख दिले. परंतू यातून आलेली आर्थिक विषमता, टोकाची धार्मिक अस्मिता, जातीच्या उभ्या राहतं असणाऱ्या चिरेबंदी भिंती आणि या सर्वाला अत्यंत उथळपणे खतपाणी घालणारी माध्यम समुह व समाज माध्यमे..!! समाजकारण व राजकारण यातील पुसटशी रेषा यामूळे कधीच पुसली गेली. याला शिक्षण क्षेत्र तरी अपवाद कसे असेल? शिक्षण संस्था देखील या राजकारचे अड्डे कधी बनले हे समजलेच नाही. जिथे जातीपातीचे नाव न घेता सर्वसमावेशक दृष्ट्ये शैक्षणिक नेतृत्व शिक्षणाचे पवित्र कार्य चालवत होते, तेच हळूहळू मोडीत निघाली.
राष्ट्रीय एकतेची सामाजिक मांडणी सपशेलपणे मोडीत काढून नवसमाजवाद्यांनी व स्वार्थी राजकारण्यांमुळे कसे महापुरुष वाटून झाले, जयंत्या विभागल्या गेल्या, हिंदू रक्षक, ओबीसी नेतृत्व, दलित नेर्तृत्व , आरक्षण समर्थक आणि विरोधक अशी विखारी मांडणी राजरोसपणे करण्यात येऊन जनमानसात रुजव्यात वा बिंबवण्यात आली. यास पूरक अशी सोईचा इतिहास, भूगोल आणि जातीय समिकरनाची मांडणी व सांगड घालण्यात आली. यात सर्वच राजकीय पक्षांनी अनेक मुद्दे, प्रश्न सामान्य माणसावर आजमावून पाहिले गेले. यातील हुकमी व निवडणूककामध्ये चालणारे मुद्दे, अस्मिता या केवळ राजकारणासाठी वापरण्यात आले. तर आरक्षणासारखे, भाषा, प्रांतवाद इ. न सुटणारे प्रश्न सत्ता काबीज करण्यासाठी कायम झुलवत ठेवले गेले.
[ पूर्वपीठिका: विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC, New Delhi) उच्च शिक्षणात कार्यरत असणाऱ्या शिक्षकांसाठी अकॅडेमिक स्टाफ कॉलेजची स्थापना केली. यामधून देशाला नवीन संशोधक, लेखक, प्राध्यापक मिळतील अशी आशा व्यक्त केली. यात ओरिएंन्टेशन 28 दिवस तर रिफ्रेशर 21 दिवस असे दोन कोर्स पूर्ण करणे अनिवार्य केले. याचा थेट संबंध पगार व पदोन्नतीशी जोडण्यात आला. ]
उच्चविद्याविभूषित मंडळी जेंव्हा राजकीय पक्षांची भूमिका , त्यांचे हुकमी मुद्दे मांडायला लागते तेंव्हा उडणारा वैचारिक गोंधळ,त्यांच्या तथाकथित दांभिक पुरोगामी, सेक्युलरपणाचा फाटलेला बुरखा,जातीय अस्मिता कशा टोकदार होत जातात? अकॅडेमिक स्टाफ कॉलेजला आलेलं राजकीय आखाड्याच स्वरूप हे देखील या संहितेमधून फार दमदारपणे साकारते. लेखकाने नमूद केल्याप्रमाणे ही राजकीय मांडणी एकांगी वाटते. परंतु यासर्व राजकीय मांडणीचे प्रतिनिधी जर शिक्षण क्षेत्रात कार्यरत असतील तर? हा प्रतिनिधी अर्थात प्राध्यापक मंडळी, शिक्षण क्षेत्रातील निरंतर ज्ञानवृद्धीचा एक महिन्याच्या कोर्से पूर्ण करण्यासाठी एकत्र आले तर काय होईल? याकोर्सच्या माध्यमातून निरंतर शिक्षण होते की राजकारणाचा सारीपाट उभा राहतो हे पाहणे फार रंजक ठरते.
प्रा. जोशी (डॉ.सागर कुलकर्णी) हे हिंदुत्ववादी, प्रा. शेख (श्री. विजयसिंह भाबरदोडे) हे इस्लाम समर्थक, प्रा. पगारे( विशाल मस्के) हे आंबेडकरवादी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी, प्रा. गुंडूराव (संकेत तोरंबेकर) टायगरवाल्याचें व ओबीसीचे समर्थक, प्रा. खोपकर (सुमित केजकर) आहेत अनुसूचित जातीमधले परंतु प्रा. जोशी यांच्याशी सलगी असणारे तर शरद पाटील बारामतीकर (अमित खडके) हे या सर्व घडामोडीसाठी कळीचे आणि मूर्रबी खेळाडू. प्रा. बोधिसेन कांबळे (अमोल अरगडे) हे कॉम्रेड आणि कायम समाजवादी भूमिका मांडणारे. थोडक्यात महाराष्ट्रातील संपूर्ण राजकीय परिस्थिती आणि विविध पक्षांचे विचारप्रवाह आपणास एकत्रित "जाता नाही जात" या संहितेमध्ये या प्राध्यापक मंडळींच्या माध्यमातून पाहायला मिळतात.
तत्त्वज्ञ, विचारवंत नेहमी ही बाब सांगत आले आहेत की शिक्षणामध्ये आणि न्याय व्यवस्थेमध्ये धर्म आणि जात आणली जाऊ नये. आणि जर असे घडले तर त्या व्यवस्थेचा कसा खेळखंडोबा होतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे हा प्रयोग होय. तीस दिवसांच्या या कोर्समध्ये प्रत्येक जण आपापली विचारसरणी आणि त्यानुसार त्यांची वागणूक अधोरेखित करतो. सर्वच विचारधारांचा उडालेला गोंधळ आणि राजकीय सारीपाटावरचे प्यादे केवळ बळी देण्यासाठी कसे वापरले जातात हे पाहणे फार रंजक ठरते.
नाना गुरुजी ( किरण राऊतमारे ) सनातन हिंदु संस्कृती समर्थक. त्यांचे अनुयायी त्यांचे आदेश पालन कसे करतात हे उत्तम रित्या साकारले आहे. जातिअंताच्या पोकळ गप्पा मारण्यापेक्षा आणि उगाच फुकाच्या चर्चा करण्यापेक्षा सर्वच "वाद्यांनी" आपली भूमिका सोडून "मानवतावादी भूमिका" स्वीकारणे हे महत्त्वाचे हाच या प्रयोगाचा संदेश.
प्रा. डॉ. ज्ञानेश्वर सोनवणे यांनी जाता नाही जात ही संवेदनशील संहिता आणि याचा नेटका प्रयोग याचे शिवधनुष्य अत्यंत व्यवस्थित रित्या पेलले आहे. चर्चानाट्यमध्ये विशिष्ट हा काही घडत नाही, परंतु विविध प्रतिमांचा आणि प्रतिकांचा वापर अत्यंत योग्यरीत्या प्रयोगामध्ये आपणास दिग्दर्शनाच्या माध्यमातून स्पष्ट होताना दिसून येतो.
या प्रयोगात सर्वच कलावंतांनी आपापल्या भूमिका यशस्वीरित्या पार पाडल्या आहेत. संकेत तोरंबेकर यांचा गुंडूराव, अमोल अरगडे यांचा कॉम्रेड आणि अमित खडके यांचा शरद पाटील बारामतीकर प्रेक्षकांच्या विशेष लक्षात राहतो.
पाटील आणि पगारे हे सेक्युलर व शाहू फुले आंबेडकर विचारधारेशी निगडित, जोशी -गुंडूराव आणि खोपकर हे उजवे तर प्रा. बोधीसेन कांबळे हे मार्क्सवाद यांचे एकखांबी तंबू , सर्वांना आदर्शवादाचा डोस देणारे. "मीच काय तो शहाणा" हा अविर्भाव कायम ते मिरवत असतात.
हे अत्यंत सुरेखरित्या आपल्या अभिनयाच्या माध्यमातून अमोल अरगडे यांनी प्रतिबिंबित केले आहे. प्रा.पगारे यांचा प्रा. पाटील यांनी स्वार्थासाठी केलेला वापर अत्यंत बेमालूमपणे आणि अत्यंत बारकाईने साकारण्यात आला आहे.
प्रा. जोशी , प्रा. गुंडूराव आणि नाना गुरुजींचा प्रसंग सागर कुलकर्णी व किरण राऊतमारे यांनी उत्तररित्या साकारला. प्रा. कांबळे (अमोल अरगडे) व प्रा. पगारे ( विशाल मस्के) यांच्यातील "समाजवाद विरुद्ध दलित" हा प्रसंग यांच्यातील जुगलबंदीमुळे प्रभावी ठरतो. प्रा. खोपकर यांच्या भूमिकेसाठी सुमित केसकर यांनी अधिक मेहनत घेणे गरजेचे होते असे वाटते.
या प्रयोगाची प्रकाशयोजना (अमृत महाजन व बळवंत देशपांडे) प्रयोगास पूरक होती. दीपाली देशपांडे यांची वेशभूषा आणि रंगभूषा प्रयोगास साजेशी आकाश पवार व नवल कचरे यांची प्रयोगास साजेसे संगीत निवडणे गरजेचे होते असे वाटते. संपूर्ण प्रयोगामध्ये तांत्रिकबाबी अधिक प्रभावीपणे वापरणे गरजेचे होते असे वाटते.
विद्यापीठ, महाविद्यालय किंवा शिक्षणसंस्था चालवताना जर विशिष्ट विचारांचा पगडा तिथे कार्यरत मंडळींवरती असेल तर तिथे शिक्षण कमी राजकारण जास्त होते. जो मूळ लाभार्थी आहे अर्थात विद्यार्थी कसा कायम दुर्लक्षित राहतो आणि त्याला मिळणारे शिक्षण कसे रसातळाला जाते यावरती भाष्य करणारी, सर्व जाती-धर्मातील अनुयायांना आत्मपरीक्षण करायला लावणारी ही कलाकृती होती असे मत प्रेक्षकांनी नोंदवले.
प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर
संगमेश्वर कॉलेज, सोलापूर
(दि. 27 मे 2022 रोजी सायंकाळी 8:00 वाजता योगेश्वरी महाविद्यालय, अंबाजोगाई, जि. बीड येथे सादर करण्यात आलेला प्रयोग.)
Share
खूपच समर्पक शब्दात आपण या नाटकाविषयी तसेच कलाकारांच्या अभिनयाविषयी मांडणी केली.सर आपले मनःपूर्वक आभार!
ReplyDelete