लेखक: नागेंद्र मानकरी
दिग्दर्शक: प्रथमेश माणेकरी
संस्था: झंकार सांस्कृतिक मंच, सोलापूर
कर्तुत्वाचे अग्निदिव्य : एक अमृतगाथा
Lokmat Epaper Link: Click on it..
सामान्य व्यक्ती जोपर्यंत स्वतःतील असामान्यत्व सिद्ध करत नाही, तो पर्यंत त्याचा स्वीकार समाजही करत नाही. तुमचा जन्म कोणत्या जातीत, धर्मात झाला यालाही फारसा अर्थ उरत नाही. असे कर्तृत्व सिद्ध करणाऱ्या अनेक व्यक्ती आपण समाजामध्ये पाहतो. यापैकीच एक प्रातिनिधिक कहाणी आहे अमृतानाक या व्यक्तीची. नागेंद्र मानकरी लिखित अग्निदिव्य: एक अमृतगाथा या संहितेमध्ये "खालच्या जातीत जन्म झालेला, परंतु आपल्या कर्तुत्वाने यशस्वी झालेला अमृतनाक" याचा जीवनपट उलगडून दाखवला आहे.
अमृत (प्रथमेश माणेकरी) अनाथ. मामा व आत्याने सांभाळलेला. रागाच्या भरात मामा अमृतला घराबाहेर काढतात. अमृत सुभेदार मलिकचे ( अरविंद माने) प्राण वाचवतो. वजीर (सुरेंद्र मोरे) यांच्याकडे प्रामाणिक शिपाई म्हणून शिफारस करतो. तीन वर्षानंतर अमृत गावी येतो. संपूर्ण गाव ओसाड, मामा,आत्या मित्र काळूराम आणि त्याची प्रेयसी सुंदर (धनश्री राऊळ) गाव सोडून गोदाकाठी गेलेले.
अमृत परत जातो तेव्हा त्यास सुभेदार मलिक कडून इस्लाम स्वीकारण्यासाठी बळजबरी केली जाते. वजीर यातून त्याची सुटका करतात. एक दिवस बेगम साहेब शिकारीला गेलया असताना परागंदा होतात. त्यांना अमृत शोधून आणतो. बेगम साहेब आणि अमृत यांच्या बद्दल सुभेदार मलिक संशय निर्माण करतो. परंतु या शोध मोहिमेसाठी अगोदर तो आपला "पौरुषत्व" सुलतानाकडे स्वाधीन केलेले असते.
अमृतच्या या बलिदानाबद्दल त्याला सन्मानित करण्यात येते. आपल्या जातीतील लोकांना समाजामध्ये 52 अधिकारांसह सन्मानाने जगू द्यावे ही मागणी तो आपल्या समाजासाठी करतो. अमृत सुलतानाची चाकरी सोडून गोदतीरी जातो. त्याला सुंदर भेटते. दोघेही संमतीने स्वतःला गोदातीरी समर्पित करतात.
तरुण अमृत ते सरदार अमृतनाक ही स्थित्यंतरे प्रथमेश माणेकरी याने योग्य रित्या साकारली. धनश्री राऊळची सुंदरही यथोचित. मलिक नायक ही भूमिका अरविंद माने यांनी उत्तमरित्या साकारली. यासोबत काळूराम / सुलतान या भूमिका आशिष रंगदळ यांनी योगिता साकारल्या. सुरेंद्र मोरे यांचा संयमी व प्रामाणिक वजीर भावला. आत्या (रजनी राऊळ), मामा (राजेश राऊळ) भूमिका देखील प्रयोगास पूरक. अशोक कंपली यांनी आपल्या सुरेल स्वरातून सूत्रधार उत्तम रित्या उभा केला.
दुसऱ्या अंकात गती कमी झालेले नाटक शेवटी कंटाळवाणे होत गेले. दिग्दर्शक प्रथमेश मानेकरी यांनी ही बाब लक्षात घ्यायला हवी होती. तांत्रिक बाबींमध्ये सराईतपणा ब्लॅकआऊट मधील नेपथ्याची रचना या बाबींकडे दिग्दर्शकाने अधिक लक्ष देणे गरजेचे होते असे वाटते.
तारासिंह मरोड यांची नेपथ्यरचना प्रयोगास पूरक. हर्षवर्धन मानेकरी आणि देवदत्त सिद्धम या प्रकाश योजनेमध्ये सायक्लोरामाचा केलेला वापर, गोदातीर व्यवस्थित रित्या उभा केला. अंबिका मारेकरी यांनी वाद्यवृंद याचा वापर पार्श्वसंगीतासाठी योग्य रीतीने केला.
राज्य नाट्य स्पर्धेच्या शेवटी सामान्य व्यक्ती आपल्या कर्तुत्वाने विविध यशोशिखरे पादाक्रांत करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे अमृतनाक याच्या बलिदानाची कथा. या कथेने स्पर्धेचा सकारात्मक शेवट झाला अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी नोंदवली.
प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर
संगमेश्वर कॉलेज, सोलापूर
Share
No comments:
Post a Comment