नाटक : पाऊस
लेखक व दिग्दर्शक : डॉ. गणेश शिंदे
संस्था : विद्यार्थी विकास विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, उप-परिसर, उस्मानाबाद
आठवणींचा भावस्पर्शी : पाऊस
Lokmat Epaper Link: Click on it..
एक अकेली छतरी में जब |
आधे-आधे भीग रहे थे ||
आधे सूखे, आधे गीले |
सुखा तो मैं ले आयी थी ||
अशाच काहीश्या आठवणींच्या हिंदोळ्यावर काहीसं रेंगाळणारं, तरल व भावस्पर्शी प्रेमाचं नातं हळुवारपणे उलगडून दाखवणारी ' रेनकोट' ही कलाकृती. "रेनकोट" हा ऋतूपर्ण घोष दिग्दर्शीत , अजय देवगण आणि ऐश्वर्या राय अभिनित वेगळ्या धाटणीचा चित्रपट. बालपणापासून दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम. पण या प्रेमाचं रूपांतर लग्नात होत नाही. या दोघांची सहा ते सात वर्षांनंतरची भेट. तो दिवस म्हणजे पाऊस' हे नाटक. "पाऊस" हे नाटक याच चित्रपट कथेवर आधारित. "प्रेम फक्त मिळवण्यात नाही , तर समर्पणातच आहे अशी या नाट्यकृतीची बांधणी व मांडणी."
दिपू (सोहम कांबळे) आणि अश्विनी ( अक्षता किरकसे ) या दोघांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम. आई वडिलांच्या सांगण्यावरून अश्विनी दुसऱ्या मुलासोबत लग्नासाठी तयार होते. लग्नाच्या दिवशीच दिपूला माहिती होतं की अश्विनीच लग्न आहे. "आर्थिक स्थैर्य" आणि "सुरक्षितता" या दोन्ही बाबींमुळे मी त्या मुलास होकार दिला हे तिचे स्पष्टीकरण. दिपू एमपीएससीची तयारी करत असतो. दिपूकडे "आर्थिक स्थैर्य" आणि "सुरक्षितता" या दोन्ही बाबी नसल्याने तो लग्नास विरोधही करू शकत नाही.
सहा ते सात वर्षानंतर या दोघांची भेट मुंबईमध्ये होते. आपलं लग्न का होऊ शकला नाही? तू एकदा तरी मला विचारलं असतं तर? याची चर्चा, आरोप प्रत्यारोप सुरू होतात. सत्य परिस्थिती दोघेही एकमेकांपासून लपवत राहतात. सत्य बाहेर येत तेंव्हा दोघेही परिस्थिती समोर हतबल असतात. दिपूची आर्थिक परिस्थिती बिकट असते. नवीन व्यवसायासाठी मित्रांकडे मदत मागण्यासाठी तो मुंबईला आलेला असतो. लग्नाच्या दोन वर्षातच सर्व परिस्थिती बदलते. अश्विनीचा नवरा आता पूर्ण कर्जबाजारी झालेला असतो. सर्वांपासून तोंड लपवून तो गावोगावी फिरत असतो. यामुळे अश्विनीला घर मालक भाड्यासाठी खुप त्रास देत असतो.
ज्या दिवशी या दोघाची भेट होते तेंव्हा पाऊस सुरू असल्यामुळे अश्विनी दिपू चा रेनकोट घेऊन बाहेर जाते. मित्रांकडून मिळालेले पैसे आणि त्याचा हिशोब त्याची चिट्ठी रेनकोट मध्ये पाहते. अश्विनी आपले लॉकरमध्ये असणारे स्वतःचे दागिने व एक पत्र दिपूच्या गुपचूप, त्याच्या रेनकोटमध्ये ठेवून देते.
अश्विनी बाहेर गेल्यानंतर घर मालक सर्व सत्य परिस्थिती दिपूला सांगतो. मागील सहा महिन्याचे आणि पुढील तीन महिन्याचे भाडे, दिपू अश्विनीच्या परस्पर घरमालकाला देतो. त्याची पावती व एक पत्र गुपचूप घरामध्ये ठेवतो.
शेवटी दोघेही व्यक्त होतात परंतु पत्राच्या माध्यमातून. ज्या पार्श्वभूमीवरती हे घडतं, त्या दिवशी मुसळधार पाऊस सुरू असतो. पावसासोबत जुन्या आठवणी, बरचसं काही मनात साठलेलं वाहून जातं. अचानक झालेल्या भेटीचा शेवट अश्रुंचा बांध फुटून होतो. कदाचित पावसाला 'पुनर्जन्माचे प्रतीक' असे देखील म्हणतात, असंच काहीसं यासादरीकरणातुन जाणवतं.
दिपू ( सोहम कांबळे) याने आपल्या भूमिकेस योग्य तो न्याय देण्याचा प्रयत्न केला.आश्विनी ( अक्षता किरकसे ) यांचे नवखेपन काही प्रसंगामध्ये स्पष्टपणे जाणवत होते. दोनच पात्र जेंव्हा संपूर्ण नाटकाचे धुरा आपल्या खांद्यावर ती सांभाळत असतात तेव्हा आपापल्या भूमिका त्यातील बारकावे, भावना, कंगोरे अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावे लागतात.
दिग्दर्शक म्हणून डॉ. गणेश शिंदे यांनी केलेला हा प्रयत्न काही अंशी यशस्वी झाला असे म्हणावे लागेल. दोन प्रमुख पात्रांचा अभिनय अधिक प्रभावीरीत्या सादर झाला असता, तर हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी ठरला असता असे वाटते.
प्रयोगास पूरक डॉ. सय्यद अमजद यांची प्रकाश योजना, गणेश रोडगे, गणेश मरोड यांचे नेपथ्य आणि सोमनाथ भंडारे यांचे संगीत यांनी तांत्रिक बाजू व्यवस्थितरीत्या सांभाळली. नेपथ्यामध्ये मेणबत्ती चा केलेला वापर काहीसा गोंधळलेला वाटला. रंगमंचावरती प्रत्यक्ष पाऊस ही नेपथ्या मधील जमेची बाजू. 'सावरिया', 'पिया तोरा कैसा अभिमान' या गाण्यांचा वापर प्रभावी ठरला.
तरल व हळुवार प्रेमकथा, अधिक प्रभावीरीतीने सादर करता आली असती, अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी नोंदवली.
प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर
संगमेश्वर कॉलेज, सोलापूर
Share
No comments:
Post a Comment