नाटक : इंटू
लेखक व दिग्दर्शक: इम्तियाज मालदार
संस्था: गॅलेक्सी कल्चर अंड वेल्फेअर ट्रस्ट, सोलापूर

इंटू : संघर्ष अंतर्मनात आणि बाहेरही
Lokmat Epaper Link : Link.
देशसेवेसाठी आपलं सर्वस्व पणाला लावणारे आपले सैनिक प्राणाची आहूती देतानाही मागे पुढे पहात नाहीत. परंतु काही अप्रामाणिक लोकांमुळे त्यांना विनाकारण त्रास सहन करावा लागतो. कधी कधी तर त्यांना त्या व्यवस्थेविरुद्ध बंड पुकारावे लागते. हा लढा कधी यशस्वी होतो तर कधी...?

इम्तियाज मालदार यांनाही हाच विषय वास्तव आणि मनोविश्लेषण पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. आपलं मन जेंव्हा सुप्तमनांवर अधिक प्रभावी ठरते तेंव्हा चूक काय आणि बरोबर काय  याचा अभिनिवेश उरत नाही. आपल्याच कोशात ती व्यक्ती गुरफटून जाते. मग सुरू होतो जागृत मन आणि सुप्त मन यांच्यातील पाठशिवणीचा खेळ. उलगडत जातात काही रहस्य, अनेक वर्ष कोणालाही न उलगडलेली महिला तस्करीची संपूर्ण कहाणी. 

मिस्टर एम. / तो (इम्तियाज मालदार ) हा गुप्तचर संघटनेचा महत्वाचा घटक असतो. मिस्टर एक्स यांच्या कपटीपणामुळे त्याचा साथीदार मिस्टर एच मारला जातो. या संपूर्ण प्रकरणाचा शोध लावण्यासाठी मिस्टर एम. भूमिगत होतो. त्याचा शोध घेत मिस जे / ती ( श्रुतिका महिंद्रकर) वेगळ्या रूपाने येते. अभिनेत्री होण्यासाठी आलेली  नवखी मुलगी ही मिस जे पेक्षा प्रभावी ठरली.  मिस्टर एम यांना जेरबंद केल्यानंतर मिस जे ला गूढ पद्धतीने मिस्टर एम सर्व घटनाक्रम सांगतो.  मिस्टर एम. लॅपटॉप आणि विविध कोड वर्ड च्या माध्यमातून 'इंटू' चा खरा अर्थ मिस जे पर्यंत पोहोचवतो. मिस जे सर्व सत्य परिस्थिती स्वतः पाहते आणि मिशन पूर्ण होण्यासाठीचे पुरावे देखील हस्तगत करते. मानवी तस्करी व त्यांचे संपूर्ण रॅकेट जगासमोर येते.

या प्रयोगातील जमेची बाजू म्हणजे 'व्यक्तीच सुप्त मन.' मिस्टर एम यांचं असो की मिस जे यांचं. सुप्त मनाची रंगमंचावर उपस्थिती ही प्रयोगास वेगळ्या उंचीवर घेऊन गेली. यावरती सिथ्री आणि मिस्टर एच (अजितकुमार साबळे ) यांनी देखील खुप मेहनत घेतली होती हे दिसून येत होते. आराम खुर्चीमधील मिस्टर एम आणि सीथ्री यांचा सुप्त मन आणि जागृत मन हा प्रसंग या बदलांमुळे प्रभावी ठरला. 

तो आणि ती यांच्या गुरू शिष्य : अभिनयाचा प्रवास खूप रंजकपणे सादर करण्यात आला. छोटी ने (अल्व्हिया मालदार) मिस्टर एच सोबतचा प्रसंग सुरेखरीत्या सादर केला. मिस जे यांची सिथ्री ( वैष्णवी कांबळे) यांनी देखील आपली भूमिका छान पार पाडली. 

वेशभूषेवरती सुद्धा अपर्णा गव्हाणे आणि श्रद्धा हुललेनवरू यांनी विशेष मेहनत घेतली होती. तो आणि सीथ्री यांची पहिल्या अंकातील वेशभूषा खूप अभिनव पद्धतीने वापरण्यात आली होती. प्रयोग गतिमान ठेवण्यासाठी, उत्सुकता टिकून ठेवण्यासाठी आवश्यक असणारे ध्वनी संयोजन वैष्णवी कांबळे आणि अजितकुमार साबळे यांचे होते. 

सागर रामपुरे यांनी नेपथ्य रचना आणि त्यातील धक्कातंत्र यांची सांगड अभिनवपद्धतीने घातली होती. नेपथयामधील प्रत्येक वस्तूचा योग्य वापर ही यातील जमेची बाजू. 

उमा उमेश यांनी इंटू हे नाटक प्रकाश योजनेच्या माध्यमातून विविध स्तरावर कसे घडते ते अधोरेखित केले. प्रसंग आणि आशय यांना पूरक तर कधी उठावदार पद्धतीने प्रकाश योजना संयोजन केले होते. प्रयोग अधिक गूढ, रहस्यमय होण्यात याचा महत्वाचा वाटा होता. 

प्रयोग यशस्वी होण्यासाठी दिग्दर्शकाने प्रत्येक बाबीचा अत्यंत बारकाईने विचार करावा लागतो हा विचार इंटू या नाट्यकृती च्या माध्यमातून दिग्दर्शक इम्तियाज मालदार यांनी केला होता हे प्रत्येक प्रसंगांमधून दिसून येत होते. 

राज्य नाट्य स्पर्धेतील सर्वार्थाने चांगला प्रयोग इंटूच्या माध्यमातून झाला अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी नोंदवली. 

प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर
संगमेश्वर कॉलेज, सोलापूर

Share