नाटक : कळा ज्या लागल्या जीवा
लेखक : प्रा. अनिल सोनार
दिग्दर्शक : सुमित फुलमामडी
संस्था : भारतीय क्रीडा शिक्षण व नाट्य मंडळ, सोलापूर

नात्यांमधील मर्मबंध उलगडणारे : कळा ज्या लागल्या जीवा
सार्वजनिक जीवनामध्ये एखादी व्यक्ती जर अधिक सक्षमपणे कार्यरत असेल तर तिच्याविषयी असूया बाळगून त्या व्यक्तीला 'व्यवस्थेमधून' बाहेर काढले जाते किंवा सर्वात मोठे शस्त्र म्हणून चारित्र्यहणन वा अफवा पसरवून त्यास नामोहरम केले जाते. आरोप खरे की खोटे याची शहानिशा समाज करतोच असे नाही. आपल्या सोयीनुसार त्या परिस्थितीचा फायदा घेऊन स्वार्थी लोक मात्र डाव साधून घेतात. पण यात जर एखादी निरपराध व्यक्ती अडकली आणि ती तुमची अत्यंत जवळची व्यक्ती असेल तर? 

केवळ समाज म्हणतो आहे म्हणून तुम्ही आपल्या माणसास नाकारणार की सत्य स्वीकारणार? आणि सत्य परिस्थिती पडताळून जर ती व्यक्ति निर्दोष सिद्ध झाली तर? तर त्या नातेसंबंधात फक्त उरते ती औपचारिकता..!! पानगळ व्हावी तसे हे मर्मबंध गळून पडतात, नात्यांमधला ओलावा संपतो आणि उरतो तो फक्त व्यवहार. जेव्हा आपण हे वास्तव स्वीकारतो तेंव्हा ती वेदना थेट काळजाला भिडते.  प्रा. अनिल सोनार यांनी नेमकेपणाने हेच 'कळा ज्या लागल्या जीवा' या संहितेमधून आपल्या पर्यंत पोहोचवलं आहे.

अप्पा (अशोक किल्लेदार) प्रथितयश नट, लेखक आणि नाट्य दिग्दर्शक. नाट्यक्षेत्रात त्यांचा दबदबा. 
नुकताच मानाचा 'नाट्यगौरव' पुरस्कार देखील जाहीर होणार असतो. अप्पा एका नवीन नाटकाच्या कामानिमित्त बाहेर पडतात आणि चार दिवस गायब होतात. यामुळे त्यांची पत्नी वसुधा (अपर्णा जोशी), मुलगी शिल्पा (विजयालक्ष्मी कोकणे), मुलगा आशय ( मिलिंद पटवर्धन) आणि अप्पाचा जिवलग मित्र ऍड. देसाई (रणधीर अभ्यंकर) हे त्यांचा शोध घेतात. अप्पांचा शोध लागतो तोही पोलिस कोठडीत आणि बलात्काराच्या आरोपासोबत. 

या आरोपामुळे अप्पांचे कुटुंबीयांना मोठा धक्का बसतो. शिल्पाच ठरलेलं लग्न अडचणीत सापडत. वसुधा आपल्या नातवाच स्वागत आनंदाने करू शकत नाही. मुलगा आशय माध्यम प्रतिनिधी असल्याने अधिकच अडचणीत सापडतो. 

अप्पा सर्वांना नक्की काय घडलं हे सांगू इच्छित असतात पण त्याचं कुणी ऐकून घेत नाही. उलट घरामध्ये त्यांना वाळीत टाकण्याचा आटोकाट प्रयत्न होतो. अप्पा नाइलाजाने पत्नी पासून घटस्फोट आणि मुलांपासून काडीमोड घेतात, यात त्यांना साथ देणारा असतो त्यांचा मित्र ऍड. देसाई. आपणच आपल्या माणसांवर अविश्वास दाखवून त्यांना टोकाचं पाऊल उचलण्यास भाग पाडतो आणि नंतर त्यांनाच दूषणं देत बसतो. असा काहीसं हे कथा सूत्र.

अप्पांची भूमिका पार पाडताना अशोक किल्लेदार यांनी त्या भूमिकेचा अगदी बारकाईने विचार केलेला दिसून येत होता. प्रथितयश अप्पा ते निर्विकार अप्पा हा प्रवास त्यांनी सुरेखरीत्या सादर केला. अपर्णा जोशी यांची सोशिक वसुधा आपणास भावते. विजयलक्ष्मी कोकणे यांनी शिल्पा ही भूमिका व्यवस्थितपणे  पार पाडली आणि मिलिंद पटवर्धन यांचा आशय लक्षात रहाणारा होता. जिवलग मित्र कितीही संकट आली तरी साथ सोडत नाही याचे उत्तम उदाहरण म्हणजे रणधीर अभ्यंकर यांचा ऍड. देसाई.या प्रयोगातील ऍड. वेदपाठक (सुनंदा शेंडगे) आणि हवालदार (किरण फडके ) यांनी देखील आपल्या भूमिका नेटकेपणाने पार पाडल्या. 

दिग्दर्शक सुमित फुलमामडी यांनी आपलया दिग्दर्शनामधून स्पर्धेमधील एक चांगला प्रयोग सादर करण्याचा प्रयत्न केला,तो यशस्वी झाला असे म्हणता येईल. नाटकाची गती कमी करणारे काही प्रसंग जर टाळता आले असते तर प्रयोग अधिक प्रभावी झाला असता असे वाटते.

उमेश बटाने यांनी प्रकाश योजनेच्या माध्यमातून अप्पा, वसुधा शिल्पा यांचे भावविश्व अधिक गडद केले, वेळ आणि त्याची रंगसंगती उत्तम रित्या साकारली. वकिलांचे स्वतंत्र ऑफिस आणि रेल्वे स्टेशन हे दोन्हीप्रसंग अधिक देखील उठावदार झाले. श्रावण ढावरे आणि सय्यद इकबाल यांची नेपथ्य रचना देखील या प्रयोगाची जमेची बाजू होती. वकील ऑफिस आणि रेल्वे स्टेशन उत्तम रित्या उभे केले गेले. 

प्रयोगामध्ये आपण जे नेपथ्य रंगमंचावर मांडतो त्यांचा वापर करणे, होणे गरजेचे असते. कपात, टीव्ही पारितोषिके या वस्तु त्यांचा परिणाम साधून गेल्या पण वापरात आल्या असत्या तर आधीच संयुक्तिक झाले असते असे वाटते.  साईनाथ ताटे यांनी संहितेच्या गरजेनुसार संगीत रचना केलेली होती. गीतांजली देशमुख यांनी अप्पा, शिल्पा आणि वसुधा या पात्रांच्या वेशभूशेवर अधिक मेहनत घेतली होती. या स्पर्धेतील आणखी एक दमदार प्रयोग सादर करण्यात आला असेच म्हणावे लागेल.

प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर
संगमेश्वर कॉलेज, सोलापूर


Share