नाटक: गाजराची पुंगी
लेखक: यशवंत देशमुख
दिग्दर्शक: प्रा.डॉ. अमजद सय्यद
संस्था: डॉ. बा.आ.म. विद्यापीठ, उप परिसर, उस्मानाबाद

गाजराची पुंगी: वाजली तर वाजली...
LOKMAT EPAPER LINK: Link

गाजराची पुंगी वाजली तर वाजली नाहीतर मोडून खाल्ली. कलाक्षेत्रात देखील तुम्हाला काही काळ आपली उमेदवारी घोषित करावी लागते, स्वतःच्या क्षमता तपासून पहाव्या लागतात यातून तावून सुलाखून जर तुम्ही यशस्वी झालात तरच कलाक्षेत्रात कलावंत म्हणून तुमचा गुणगौरव होतो अन्यथा या म्हणी सारखं होतं..!! 

दिलीप घारे सर आणि यशवंत देशमुख सर यांनी ही कलाकृती आपल्या खुमासदार शैलीने अजरामर करून ठेवली आहे. अस्सल मराठवाडी भाषा, नर्मविनोदी संवाद आणि या दोघांची अभिनयातील जुगलबंदी आजही जाणत्या प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. 

बाळ्या (ओंकार वट्टे) आणि बंड्या (विशाल रणदिवे) कलाक्षेत्र व नाट्यक्षेत्र यातील बाह्य रंगावरती भूलून याच क्षेत्रात आपल भविष्य असणार आहे हे निश्चित करतात. बाळ्या आणि बंड्या हे जिवलग मित्र.  आपल्या गावामध्ये आपल्या अभिनयाची काहीच कदर नाही ही सल त्यांच्या मनात असते. गावामध्ये चित्रपट बघून यांच्या मनामध्ये शहराबद्दल वेगळे आकर्षण निर्माण होते. 

बाळ्या आणि बंड्या या दोघांच्याही घरचे त्यांना या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी सपशेल नकार देतात. शेवटी कुणीही आपले ऐकत नाही  म्हटल्यानंतर हे दोघेही मुंबईला जाण्यासाठी तयार होतात.  'शोले'  सिनेमा, लग्न, टॅक्सीने प्रवास, गाण्यांचे सादरीकरण विविध प्रसंग आपल्या सादर झाले. मुंबईमध्ये या दोघांना जो स्ट्रगल करावा लागतो ते पाहणे अधिक रंजक होते.

लग्नासाठी उत्सुक बंड्या, अभिनयामध्ये आवड असणारा बाळ्या, मुंबईमध्ये गेल्यानंतर या दोघांची ससेहोलपट या दोघांनी या नाट्यकृती मधून सादर केली आहे. बाळ्या आणि बंड्या दोघांचेही रंगमंचावर नवखेपण जाणवत होते. दिग्दर्शक अमजद सय्यद यांना एरिया लायटिंग / प्रकाश योजना (अमजद सय्यद), नेपथ्य (राजशेखर वाघमारे) , संगीत (गणेशसिंह मरोड) या सर्व तांत्रिक बाबी अधिक प्रभावीपणे सादर करता  आल्या असत्या असे वाटते. 

दोनच पात्र विनोदी नाटकं सादर करत असतील तर टायमिंग आणि अभिनय हा मुख्य दुवा असतो. तो अधिक प्रभावीपणे सादरीकरणात येणे गरजेचे होते असे वाटते.  त्यामुळे गाजराची पुंगी काही वाजली नाही असेच म्हणावे लागेल.

प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर
संगमेश्वर कॉलेज, सोलापूर.

Share