राज्यनाट्य स्पर्धेतील दमदार पंच : हम पांच

नाटक: हम पांच
लेखक: संकेत तांडेल
दिग्दर्शक: गिरीश देवकते
संस्था: अस्तित्व मेकर्स, सोलापूर
Lokmat Epaper Link: LINK:

साठाव्या महाराष्ट्र राज्यनाट्य स्पर्धेची (हिरक महोत्सवी वर्ष) सुरुवात अत्यंत दमदार अशा सादरीकरणाने झाली. 

अस्तित्व मेकर्स सोलापूर या संस्थेने एक वेगळा विषय घेऊन "हम पांच" हे नाटक विनोदी अंगाने सादर केले. काळ बदलला, समाज बदलला परंतु या बदलांमधून समाजामध्ये शोषणाची नवी व्यवस्था मात्र उभी राहिली.  या व्यवस्थेचे काही दुर्लक्षित घटक आजही मूलभूत गरजांपासून आणि जगण्याच्या विवंचनेनेमध्ये आहेत. जी विवंचना इतिहासा मधून आपण वर्षानुवर्षे ऐकत आहोत तीच सल उपहासात्मक रीतीने अस्तित्व मेकर्स या संस्थेने या ठिकाणी सादर केली. असंघटित कामगार वर्ग,  त्यांचे प्रश्न मिश्कील रित्या नाट्यलेखक संकेत तांडेल यांनी आपल्या लेखणीतून उतरवले आहेत. मोलकरीण,  कामवालीबाई ही उच्चभ्रू ,उच्च मध्यम वर्ग यांच्या जगण्याचा आणि व्यवस्थेचा एक महत्त्वाचा परंतु दुर्लक्षित घटक. कामवाली म्हणून तर या समाज व्यवस्थेनं त्यांना स्वीकारलं परंतु याच व्यवस्थेने अत्यंत सोयीस्कर रित्या त्यांचं बाई पण मात्र नाकारल. यावरती नेमकेपणाने भाष्य करणारी संकेत तांडेल यांची 'हम पांच' ही नाट्यकृती. 

मुंबई मध्ये घरकाम करणाऱ्या, विविध कौटुंबिक व प्रादेशिक पार्श्वभूमी असणाऱ्या, पाच महिला अर्थात मोलकरणी. 
या सर्व महिला विविध कारणांनी माधुरीच्या मालकीनीच्या घरी एकत्र येत असतात. माधुरी(वर्षा मुसळे ) , मंजिरी (श्रद्धा केदार ), कुसुम भाभी ( राधिका साखरे), कल्याणी(वैशाली बनसोड ) आणि शांता (आवंतीका जेऊरे) अशा मैत्रिणी. यातील प्रत्येक पात्राने आपली स्वतंत्र अशी एक ओळख जपली होती आणि आपल्या भाषा शैलीतून ती विकसित देखील केली होती. 
उत्तर भारतीय संस्कृती आणि तेथील स्त्रियांबद्दल असा दृष्टीकोण कुसुम या पात्राने अत्यंत बेमालूमपणे सादर केला. आगरी भाषेचा बाज आणि स्पष्टवक्तेपणा ही शांता ची खासियत. कल्याणी ने जपलेले अस्सल मराठमोळेपण तर आपल्या विविधांगी अभिनयातून मंजिरी आपल्यासमोर येते. या सर्वांना जोडणारा दुवा आणि त्यांच्यामधील उच्च शिक्षित माधुरी.  
दुःखाचा हिशोब खरं तर कधी मांडता येत नाही परंतु ते जर व्यक्त केलं तर भार थोडा हलका होतो हेच यांच्या एकत्र येण्याचं सूत्र. प्रत्येकीच्या मनात एक हळवा कोपरा आहे आणि हा हळवा कोपरा आज हळूहळू या पटलावरती आपणासमोर उलगडत जातो.यातील प्रत्येकीची एक वेगळीच वेदना आहे आणि नाकारलेपण देखील आहे.

अभिजीत केंगार यांनी हवल्या, बॅनर्जी, स्वप्नातील पुरुष, एजंट, कल्याणीचा नवरा आणि पार्सल बॉय असे विविध पात्र आपल्या अभिनयातून अत्यंत सुरेख रित्या सादर केले. यातील "स्वप्नातील पुरुष" जास्त भाव खाऊन गेला.

माधुरी एक पार्टी आयोजित करते आणि त्या पार्टीमध्ये हळूहळू एक एक पात्र आपल्यासमोर अंतरंग उलगडत जाते. खरं तर या पार्टीची तयारी सर्वांनीच केलेली असते परंतु याला नाट्यमय रित्या वेगळेच वळण लागते. मोलकरीण कडे पाहण्याचा समाजाचा दृष्टीकोन हाच मुळात वेगळा आहे. त्यांचं दुःख त्यांच्या वेदना त्यांना सहन करावे लागणारे अत्याचार आणि वारंवार त्यांच्याबद्दल भोगवस्तू म्हणून निर्माण केलेली प्रतिमा यावरती या पाचही महिला आपलं दुःख या ठिकाणी व्यक्त करतात. माधुरी नाईलाजाने घरमालकाच्या अत्याचारांना बळी पडते, शांताला तरुण मुलं विनाकारण त्रास देत असतात आणि याकडे शांता चा नवरा दुर्लक्ष करण्यास सांगतो, कल्यानीला दारुडा नवरा त्रास देत असतो, कुसुम अर्थात भाभी घुंगट या गोष्टी वरती फार सुंदर भाष्य करते तर तर मंजिरी चार वर्षापासून आजारी आजारी असणाऱ्या नवऱ्याची सेवा करत असते आणि तो मात्र अत्यंत संशयखोर पणे मंजिरीस त्रास देत असतो. एक एक स्त्री या ठिकाणी व्यक्त होत जाते आणि त्यांची घुसमट वर्षानुवर्षे त्यांना होत असणारा त्रास आणि कुठेतरी दुःखास व्यक्त होण्याची संधी माधुरी मुळे त्यांना प्राप्त होते. स्त्रियांना त्यांच स्त्रीत्व जपण्यात जास्त आनंद असतो आणि पुरुषांनी त्यांचं स्त्रीत्व अत्यंत निरपेक्षपणे स्वीकाराव हीच या पाचही महिलांची अपेक्षा असते. त्यांच्या या अपेक्षांचा कसा भ्रमनिरास होत जातो हे विविध पात्रांच्या माध्यमातून आपणा पर्यंत पोहोचते. स्त्रियांची पार्टी आणि त्या पार्टीचं शास्त्र या महिलांच्या माध्यमातून आपण आपण फारच रंजक रित्या पोहोचत. पोपट,वाघ आणि डुक्कर यांची कथा उपहासात्मक रित्या यात वापरण्यात आली आहे. मद्यप्राशन केल्यानंतर सुरुवातीस व्यक्तीचा पोपट, थोड्या वेळाने वाघ आणि शेवटी डुक्कर. खरंतर कुठलेही व्यसन वाईटच परंतु एखादा विचार मांडण्यासाठी या माध्यमाचा वापर केला तर ते अधिक प्रभावी ठरतं हे या ठिकाणी दिसून येत.

इतरांच्या घरांची काळजी घेत असताना आपल्या घराकडे मुलांकडे होत जाणारे दुर्लक्ष आणि वैवाहिक जीवन देखील कसे असह्य होत जात आहे या सर्व गोष्टी गिरीश देवकते यांच्या दिग्दर्शनातून आपणापर्यंत पोहोचतात. दुसऱ्या अंकामध्ये नाटकाची गती थोडीशी वाढवली असते तर प्रसंग आणि नाटक अधिक रंजक झाले असते असे वाटते.

नितेश फुलारी यांच्या प्रकाश योजनेमधून घर, त्यातील विविध जागा, पार्टी आणि  स्वप्नातील पुरुष आणि विविध प्रसंग अधिक उठावदार झाले. 
नाटकातील पात्रांच्या मानसिकतेला साजेसे संगीत पवन व्हनकडे यांचे होते. पार्टीतिल विविध प्रसंग संगीतामुळे अधिक रंगतदार झाले. शैलजा गोरे यांनी आपल्या वेशभूषे रचने मधून पात्रांची, संस्कृतीची ओळख आणि त्याला साजेशी वेशभूषा पात्रांसाठी निवडली होती. अभिजीत केंगार यांच्या वेशभूषेत वरती त्यांनी विशेष मेहनत घेतलेली दिसून आली. नेपथ्या मधून नेटकेपणाने उच्चभ्रू बंगला आणि त्यातील आवश्यक असणाऱ्या वस्तू यामधून नाट्य कृतीस पूरक नेपथ्य रचना करण्यात आली होती. रूपाली वाघमारे यांनी पात्रांना साजेशी रंगभूषा केली होती. राज्य नाट्य स्पर्धे मधील पहिलाच प्रयोग चांगला सादर झाल्यामुळे होणाऱ्या सर्वच नाटकं कडून प्रेक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. 

प्रा.डॉ. गणेश मुडेगावकर
संगमेश्वर कॉलेज, सोलापूर

Share