संवेदनशील मन की भावनाशून्य शवपेटी : कॉफीन
नाटक : कॉफीन
लेखक: चैतन्य सरदेशपांडे
दिग्दर्शक: धनश्री गायकवाड
प्रकाश योजना: सौरभ अढाऊ
नेपथ्य: प्रतीक सरय्या
संगीत: नरेन्द्र वारे
संस्था: कामगार कल्याण केंद्र, राधानगर, अमरावती.
आपली यशस्वी माणसांची व्याख्या काय? व्यक्तीला उत्तम इंग्रजी बोलता यायला हवं, विदेश दौरे अन्यथा मुलगा, मुलगी, जावई यापैकी एकतरी व्यक्ती परदेशात स्थायिक हवीच. असे नसेल तर तुमच्या सारखे कर्मदरिद्री तुम्हीच..!! इंग्रजी संभाषण काही काळामध्ये आपला अस्मितेचा प्रश्न असेल. इंग्रजी माध्यम की इंग्रजी संभाषण याचा गुंता अजूनही सुटला नाही. सर्वच भाषांचे अर्धवट ज्ञान नक्की कोणत्या दिशेने जाणार? अशा अनेक प्रश्नांनी मध्यमवर्ग पछाडलेला आहे. असं म्हणतात संस्कृतीच्या ऱ्हासाची सुरूवात भाषेच्या मरणाने होते. येणाऱ्या पिढीला आपण मातृभाषा पारंगत, संस्कारक्षम बनवले नाही तर काळ माफ करणार नाही जन्माला येतील भावनाशून्य मनुष्यप्राणी.... शवपेटी अर्थात कॉफिन..!! येणारी पिढी हे अधिक संवेदनशील आणि सर्वार्थाने प्रगत घडवायची असेल तर प्रचलित समाजव्यवस्थेतील पाश्चिमात्य संस्कृतीचे माजलेले स्तोम कमी केल्याशिवाय मूल्याधिष्ठित प्रगती होणार नाही असे भाष्य चैतन्य सरदेशपांडे हा तरुण लेखक कॉफिनच्या माध्यमातून करताना दिसतो.
ग्रामीण पार्श्वभूमीवर घडणारे कॉफीन हे नाटक. एका दांपत्यास जन्माला येते कॉफिन. कॉफीनच्या जन्मानंतर आई मरण पावते. कॉफीनचा बाप(अभिजीत देशमुख) आणि आजी (प्रांजल डाखोडे) त्याचा सांभाळ करतात. या दोघांचे एकच स्वप्न, कॉफिन फाडफाड इंग्रजी बोलणार, फॉरेनला जाणार आणि भरपूर पैसे कमावणार. कॉफिन मात्र भावनाशून्य...लाकडी शवपेटी..पण वाढ मात्र चालू असते. कॉफीन चा शाळेत जायचा प्रयत्न देखील फसतो.कुणाशी मैत्रीपण होत नाही. नासाचे लोक पण कॉफीनचा अभ्यास करण्यासाठी येतात. बापाचा नकार आणि आजीचा होकार या भांडणांमध्ये आजी मरण पावते. भावनाशून्य कॉफीनला याचा काही फरक पडत नाही. बापाला मात्र हे जिव्हारी लागते. कॉफीनला ते घराबाहेर काढतो.
ऑंटी व त्यांचा मुलगा (प्राची डोके) कॉफिनचे शेजारी. लहानपणापासून आपल्या मुलासाठी पोहण्याच्या स्पर्धेतील ऑलिम्पिकचे ध्येय. पण कॉफीनला आपले गुपित सांगून ऑंटी चा मुलगा मरतो. कॉफीनने मला का नाही सांगितले म्हणून ती कॉफीनला जाब विचारायला येते. कॉफिन कुठलीही भावना व्यक्त करत नाही. त्याचा मित्र गेल्यानंतरही शांतचनासतो. शेवटी त्याच कॉफीनमध्ये बापाचा शेवट होतो.
बाप (अभिजीत देशमुख) आजी (प्रांजल डाखोरे) आणि आण्टी (प्राची ढोके) या भूमिका प्रयोगात उत्तम साकार झाल्या. इतर सर्व पात्रांनी प्रयोगास उत्तम साथ दिली. सौरभ आढाव यांची प्रकाश योजना प्रयोगास पूरकच म्हणावी लागेल. संगीतामध्ये नरेंद्र वारे यांचा काहीसा गोंधळ उडालेला दिसतो. प्रतीक सरय्या यांनी नेपथ्यामधून दगडी भिंती आणि प्रयोगाचा बाज समजून घेऊन रंगमंच व्यापला होता.
कल्पना कितीही सुंदर असली तरी ती तेवढ्याच ताकदिने संहितेच्या आणि दिग्दर्शनाच्या माध्यमातून उभी राहणे अपेक्षित असते. धनश्री गायकवाड यांनी याचा आधिक विचार करणे आवश्यक होते असे वाटते.
शिक्षणाचे माध्यम मराठी वा इंग्रजी फरक पडत नाही. फरक पडतो तो कोणत्या मूल्यांवर आणि संस्कारामध्ये त्या पिढीची जडण-घडण झाली आहे. जागतिकीकरणाच्या स्पर्धेमध्ये स्वकर्तुत्वाने जो आपल्या क्षमता सिद्ध करतो तो कॉफीन न राहता संवेदनशील समाजाचा मूलभूत घटक बनतो. कामगार कल्याण नाट्यस्पर्धेमध्ये अंतिम फेरीला साजेसे अनेक प्रयोग झाले. यास्पर्धेमध्ये शेवटचा प्रयोग चांगला होणे अपेक्षित होते, अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी नोंदवली.
© प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर
9421440940
Dr Ganesh Mudegaonakar
Share
No comments:
Post a Comment