सुचण्यापासून सिद्धीपर्यंतचा प्रवास : सृजनमय सभा
नाटक : सृजनमय सभा
लेखक: रविशंकर झिंगरे
दिग्दर्शक: रविशंकर झिंगरे
प्रकाश योजना: सुधीर देऊळगावकर
नेपथ्य: रेवती पांडे, संकेत पांडे
संगीत: सौरभ कुरुंदकर, नागेश कुलकर्णी
संस्था: कामगार कल्याण केंद्र, सिडको, नांदेड
महाभारतघडण्याचे मूळ कारण मयसभेत होते. सृजनमय सभा नक्की कशी अवतरली ?
सुचविली त्याने | सुचवण्याची गोष्ट ||
अस्पष्ट ही स्पष्ट |दाखवेन ||
लेखकाला सुचते कसे? सृजनाचा प्रवास निर्मिती पासून सिद्धीपर्यंत कसा पोहोचतो? विविध भूमिका ,पात्र लेखकाभोवती कसा पिंगा घालतात
या सर्व बाबींचा उहापोह म्हणजे सृजनाचा प्रवास.
प्रत्येक व्यक्तीच्या मनाच्या जागृत मन आणि सुप्त मन या दोन अवस्था. जागृत मनामध्ये घडणाऱ्या गोष्टीला नियमांचे, समाजचे बंधन असते. सुप्त मनामध्ये कल्पना व सर्जनशीलता यांना कुठेही बंधन नसतं. या सृजनाचा हा संपूर्ण प्रवास आपणा समोर उलगडला जातो तो सृजनमय सभा या नाट्य प्रयोगांमधून. प्रा. रविशंकर झिंगरे यांच्या लेखणी मधून या भावअवस्थेचे कल्पनाचित्र आणि पात्रांचा प्रवास आपणासमोर येतो.
सोमेश (किरण पुराणीक) संशोधक आणि लेखक आहे. दरवर्षी राज्य नाट्य स्पर्धेसाठी तो एक नाटक लिहीत असतो. यावर्षी त्याला लेखनाचा कंटाळा येतो. सुधीर (त्रंबक वडसकर) हा त्याचा जिवलग मित्र. सुधीर यावर्षीच्या स्पर्धेतील नवीन कल्पना सोमेशला सांगतो. स्पर्धकांसाठी नेपथ्य अगोदरच तयार असेल, या नेपथ्याच्या आधारे आपणास कल्पनाविस्तार करून नाटक सादर करावयाचे आहे. सोमेश या सर्व प्रकारास नकार देतो. सुधीर सोमेशला मंगल कार्यालयामध्ये कोंडून ठेवतो. सुधीर या मंगल कार्यालयात अगोदरच स्पर्धेतील नेपथ्य उभे करून ठेवतो. भूतकाळातील विविध स्मृति, वर्तमानातील जग आणि भविष्यातील आवाहने यांचा सुंदर मिलाफ सोमेश घडवून आणतो आणि सुरू होतो प्रवास सृजनाचा....
स्मृती पटलावरती आजीने सांगितलेल्या गोष्टी, त्यातील चिरकाल स्मरणात असणारी अलीबाबा, मर्जिना (अर्चना चिक्षे) व कासीमची गोष्ट. भावावस्थेमधून कल्पनेत आणि कल्पनांमधून सत्यात या रीतीने मर्जिना आपल्यासमोर उभी राहते. शलाका (राधिका पिंगळकर)अर्थात सृजनशीलता वा कल्पना हे आणखी एक पात्र. लेखकाच्या प्रत्येक विचारास लेखणीमधून सदैव सोबत करणारी शलाका. अली बाबा व चाळीस चोर या मूळ कथानकापेक्षा वेगळ्या शक्यता भूत, वर्तमान व भविष्य यांच्या माध्यमातून सोमेश आपल्या लेखनामधून या पात्रांच्या सहाय्याने तपासून पाहतो. जगाशी संपर्क तोडून केवळ चार ते पाच दिवसांमध्ये भावावस्था, कल्पना व स्मृति यांच्या सुंदर मिलाफातून तयार होते एक सुंदर कलाकृती,नवीन संहिता रसिकांना आनंद देण्यासाठी सृजनमय सभा.
सोमेश या नाटकातील मुख्य पात्र तथा नाट्यलेखक. किशोर पुराणिक यांनी ही भूमिका साकारली आहे. पुराणीक यांनी लेखक त्याची भावावस्था व वास्तव यांचे सादरीकरण अभिनयाच्या माध्यमातून बेमालूमपणे सादर केले आहे. स्मृतीपटला वरून लेखणीमध्ये एक एक पात्र उतरवत असताना, प्रत्येक पात्राशी किशोर पुराणिक यांनी साधलेला संवाद आणि अलीबाबा हे पात्र देखील संस्मरणीय केले आहे. मर्जिना आणि शलाका या दोन्ही भूमिका लेखकाच्या सुप्त मनामध्ये स्थित असतात. मर्जिना ही भूमिका डॉक्टर अर्चना चिक्षे यांनी अत्यंत सुरेख रित्या पार पाडली. कासीमवर जीवापाड प्रेम करणारी मर्जीना , हुशारीने कासिमच्या मृत्यूचा बदला घेणारी मर्जिना, लेखकाच्या भावविश्वात हळूहळू साकारणारी मर्जिना हे सर्व मर्जीना या भूमिकेचे कंगोरे अर्चना चिक्षे यांनी बारकाईने साकारले आहेत. राधिका पिंगळकर यांनी साकारलेली
शलाका अर्थातच लेखकाची कल्पना वा सर्जनशीलता. संपूर्ण रंगमंच आपल्या नादमय रुंजी मधून, नृत्यातून, कल्पनाविस्तारामधून व्यापून टाकते ती शलाका. नादमय पदलालित्य, वैविध्यपूर्ण नृत्यशैली, सर्व पात्रांसोबत गेयात्मक संवाद आणि पात्रांची जडणघडण व या सर्व बाबी अत्यंत सुरेख. जिवलग मित्र,आग्रही भूमिका मांडणारा, प्रसंगी मित्रास समजून घेणारा सुधीर त्र्यंबक वडस्कर यांनी उभा केला आहे.
लेखक व दिग्दर्शक प्रा रविशंकर झिंगरे यांनी आपल्या दिग्दर्शनामधून प्रयोगाच्या सर्वच पातळ्यांवरती अत्यंत तपशीलवारपणे काम केलेले आहे हे दिसून येते. पात्रांची योग्य निवड, स्मृती पटलावरील मर्जिना, कल्पना आणि वास्तव यासोबत असणारे शलाका. या सर्वांना आपल्या लेखनामधून प्रयोगामध्ये सुरेखरित्या रूपांतरित केले आहे. या नाटकातील सर्व पात्र दिग्दर्शकाने आपल्या वैशिष्ठपूर्ण दिग्दर्शनामधून आपणासमोर उभी केली आहेत.
रेवती आणि संकेत पांडे यांनी नेपथ्या मध्ये प्रथमदर्शनी मंगल कार्यालय, नंतर राजमहाल नेमकेपणाने आणि विचारपूर्वक उभा केला होता.
महिरपी खिडकी, दोन रांजण, पायर्यांचा सुरेख वापर आणि व्यासपीठावर विराजमान ग्रंथ व मोरपीस धारण केलेली लेखणी. यामधून संहितेस अपेक्षित असणारे लेखन व लेखक प्रतिरूप नेपथ्यामधून उभे राहिले.
नाटक दोन पातळ्यांवर, दोन भावावस्थेत घडतं. म्हणून रंगमंचाचे दोन भाग केले होते. वास्तवातील भाग समोर आणि मागच्या बाजूला अर्थात सुप्त मनात. सुप्त मनामध्ये लेखकाची सर्व पात्र हळू हळू साकारत असतात हे साकारणे नेपथ्यामुळे अधिक उठावदार झाले.
सुधीर देऊळगावकर यांची प्रकाशयोजना प्रयोगास वेगळ्या उंचीवर घेऊन गेली. या प्रयोगातील प्रकाशयोजना प्रत्येक पात्राची भावावस्था दर्शवणारी होती. वास्तव जग दाखवत असताना वापरलेली रंगसंगती आणि सृजनाचा प्रवास नृत्य, नाट्य, शिल्प, कविता सादरीकरण या विविध भावावस्था, मनाची जडणघडण, लेखकाचे भावविश्व या सर्वच बाबींसाठी विविधांगी आणि विविधरंगी प्रकाश योजना संहितेस व प्रयोगास आधिक भावपूर्ण करणारी होती.
वास्तवाचं भान असणारे दैनंदिन जीवनातील संगीत, अलीबाबा,मर्जिना व कासिम यांच्यासाठी अफगाणी प्रदेशातील संगीत यांचा सुरेख संगम सौरभ करुळकर आणि नागेश कुलकर्णी यांच्या पार्श्वसंगीतामध्ये दिसून आला. वेशभूषेवरती उपेंद्र दुधगावकर यांनी विशेष मेहनत घेतलेली दिसून आली. अफगान प्रदेशातील स्त्री, पुरुष त्यांचा पेहराव सुरेख निवडला होता. शलाका साठी शुभ्र सलवार आणि केशरी ओढणी. या ओढणीचा वापर संपूर्ण प्रयोगात अत्यंत वैविध्य पूर्ण रित्या करण्यात आला.
प्रायोगिक रंगभूमीवर फार कमी वेळा प्रयोग करून पाहिले जातात.लेखकाने लेखनाचा प्रवास लेखणीच्या माध्यमातून संहितेतील लेखकाकडून पूर्ण करून घेतला आहे. नाविन्यपूर्ण संहिता लिहून सादर करणे हे तर एक शिवधनुष्यच. या टीम ने हे शिवधनुष्य लिलया पेललं आहे. प्रा रविशंकर झिंगरे यांच्या टीमने साकारलेला सृजनमय सभा हा प्रयोग दीर्घकाळ स्मरणात राहील. या नाटकातील प्रत्येक बाबीवरती लेखक, दिग्दर्शकाने तसेच अभिनेता व अभिनेत्री तांत्रिक बाजू सांभाळणाऱ्या सर्वानीच भरपूर मेहनत घेतली आहे हे दिसून येत होते. स्पर्धेतील एक दमदार प्रयोग आपणास सृजनमय सभा या प्रयोगाच्या माध्यमातून आपणास पहावयास मिळाला.
© प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर
9421440940
Dr. Ganesh Mudegaonkar
Share
No comments:
Post a Comment