आभासी व वास्तव जगण्यातील मूल्यसंघर्ष  : कळा या लागल्या जीवा



नाटक : कळा या लागल्या जीवा
लेखक: किरण पोत्रेकर
दिग्दर्शक: डॉ उमेश अत्राम
प्रकाश योजना: सौरभ कुलकर्णी
नेपथ्य: अजिंक्य जोशी
संगीत: जिगिशा देशपांडे
संस्था: कामगार कल्याण केंद्र हिंगोली, नांदेड

नव्वदीच्या दशकामध्ये आपण जागतिकीकरण स्वीकारले. यासोबत आले विविध ब्रँडस, असण्यापेक्षा दिसणं महत्वाचं हे तत्वज्ञान व मूल्य संघर्ष. यामधून उदयास आली एक नवी जमात आणि त्यांची कार्पोरेट संस्कृती. तयार झाला नवीन नवश्रीमंतांचा एक वर्ग.  झपाट्याने वाढणारे शहरीकरण त्यासोबत येणारी मोठ्ठी स्वप्न. वास्तव व आभासी जगणं यातील ओढाताण व या सोबत बाजारी, उत्सवी विकेंड कल्चर.
या सर्व नवश्रीमंतांनी पुढे जाण्याच्या शर्यतीत मागे पडण्याच्या भीतीने केलेली ससेहोलपट आणि त्याची झालेली दमछाक म्हणजे कळा या लागल्या जिवा हा नाटयप्रयोग.

सन 2000 च्या आसपास अजित दळवी यांचं चाहूल हे नाटक आलं. मकरंद आणि माधवी हे यातील मुख्य पात्र तथा पती पत्नी. केवळ पाच हजार 66 रुपयांच्या इन्क्रिमेंट साठी मकरंद माधवीस बॉसकडे एका रात्रीसाठी पाठवतो, असे या नाटकाचे कथानक.

या नाटकाची सुरुवात होते चाहूल प्रयोग पाहून आल्यानंतर. चाहूल या नाटकाची कथा हीच या नाटकाची पार्श्वभूमी. अविनाश आणि गौरी हे पती पत्नी.  निम्न मध्यम वर्ग ते उच्च मध्यम वर्ग यातील प्रवास हा केवळ दोन ते तीन वर्षांमध्ये यांनी पूर्ण केलेला. उराशी बाळगलेली सर्व स्वप्न पूर्ण करण्यासाठी, घरामध्ये सुबत्ता आणण्यासाठी घरातील प्रत्येक वस्तू कर्ज काढून व हप्त्याने खरेदी केलेली. पण या चैनी व आर्थिक गरजा पूर्ण करताना गरज आणि चैन यातील पुसटशी रेषा त्यांच्या लक्षातच येत नाही. जे मिळत नाही ते मिळवण्यासाठी , कुठल्याही पातळीवरती कॉम्प्रमाईज करून ते मिळवायचंच हा त्यांचा अट्टाहास. 

निपाणीकर हा गौरीचा बॉस आणि अविनाशच्या कंपनीचे कोटेशन संमत करणारी महत्त्वाची व्यक्ती.  कळत नकळत निपाणीकर गौरी सोबत फ्लर्ट करत असतो. गौरी जेंव्हा ही बाब अविनाश ला सांगते तेंव्हा अविनाश त्याकडे दुर्लक्ष करायला सांगतो. 55 लाखाचं कॉन्ट्रॅक्ट निपाणीकर साईन करणार असतो. काही कारणास्तव तो अविनाशला कॉन्ट्रॅक्ट संमत करण्यास नकार देतो. अविच्या पायाखालची वाळू सरकते. 

निपाणीकर यासाठी  चाहूल चा नाट्यप्रयोग  अविनाश आणि गौरी यांना पाहण्यास सुचवतो. त्यातील  मकरंदच्या वागण्याचे समर्थन जेव्हा अविनाश करतो तेव्हा मात्र गौरीला एका रात्रीसाठीची ऑफर निपणीकर देतो. अवि आणि गौरी लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी चर्चा केल्यानंतर दोघे मिळून निपाणीकरची ही ऑफर नाकारतात.  काहीतरी हवं असेल तर काहीतरी द्यावं लागेल अथवा काही दिल्यानंतरच काही तरी मिळेल..हा व्यवहार की व्यभिचार? याच उत्तर आपणास मिळतं. 

डॉ उमेश आत्राम यांनी आपलया दिग्दर्शनामध्ये सर्वच बाबींचा अत्यंत बारकाईने विचार केला आहे. 
सुहास देशपांडे यांनी अविनाश अत्यंत सुरेख रित्या साकारला आहे.  मध्यमवर्गीय भित्रा म्हणजे थोडक्यात स्पष्ट सांगता येत नाही आणि सहनही होत नाही, ही घालमेल पूर्ण प्रयोगात त्यांनी लीलया साकारली आहे.  स्वाती देशपांडे यांनी गौरीही भूमिका विविध कंगोरे यांसह प्रेक्षकांसमोर उभी केली आहे. भावनांची सरमिसळ, निस्सीम प्रेम करणारी, प्रसंगी जाब विचारणारी आणि आवश्यकता असेल तेथे ठाम निर्णय घेणारे गौरी दोन्हीही अंकामध्ये प्रभावीपणे साकार झाली आहे.

दोनच पात्र जेव्हा दोन अंकी नाटक करतात तेव्हा रंगमंचीयअवकाश भरून काढणे आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणे हे मोठे आव्हान असते. सुहास देशपांडे आणि स्वाती देशपांडे यांनी स्वीकारले आणि पूर्ण ही केले.

मुंबई शहराचा झगमगाट, अबस्ट्रॅक्ट पेंटिंग, ब्रूस लीची प्रतिमा, लॅपटॉप, म्युझिक सिस्टिम व सापशिडीमधील ठळक दिसणारा साप या सर्व बाबी मधून उच्चभ्रू वस्तीतील फ्लॅट सिम्बॉलिक नेपथ्यामधून उभा केला होता. यामधून नेपथ्यकाराची कल्पकता दिसून येते.

प्रकाश योजनेमध्ये मेट्रोपॉलिटन लखलखाट आणि सदैव रंग बदलणारा सरडा स्मरणात राहतो.  प्रसंगांना साजेशी रंगसंगती आणि एरिया लाइटिंग नुसार प्रकाश योजना देखील प्रयोगास साजेशी होती. अभंग, भावगीत आणि आवश्यक त्या प्रसंगाला उठाव देणारे पार्श्वसंगीत प्रयोगास भावस्पर्शी करून गेले.

शहरीकरण अचानक आलेली श्रीमंती आणि संस्कारांवर अति श्रेष्ठ झालेला व्यवहार ही वैचारिक गुंतागुंत चर्चेअंती अवि आणि गौरी काही अंशी सोडविण्यात यशस्वी होतात. 

फक्त शिक्षणानेच जर व्यक्ती सुज्ञ झाली असती तर व्यवहार हा व्यभिचार कधीच झाला नसता. मूल्य संघर्ष हा काळाचा महिमा आहे. परंतु संत साहित्यापासून आपण काही शिकणार की नाही ? संतांच जगणं हे तत्वज्ञान होत आणि आयुष्य हेच विद्यापीठ. नैतिक आणि अनैतिक मधील पुसटशी रेषा ओळखण हेच खरं शिक्षण. हाच विचार किरण पोत्रेकर आपण समोर मांडतात.

बहुसांस्कृतिक जीवनात भावना महत्वाची की व्यवहार? गरजेपुरतं मिळत असताना देखील चैन करणं आणि ते ही आभासी जगात मिरवण्यासाठी.नक्की का हा अट्टाहास? प्रश्न हाच राहतो काळ बदलला की आपणच भरकटलोय?

© प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर
9421440940

Share