भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार भदंत अश्वघोष : जीवनपट
नाटक : भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार भदंत अश्वघोष
लेखक: विरेंद्र गणवीर
दिग्दर्शक: विरेंद्र गणवीर
प्रकाश योजना: किशोर बत्तासे
नेपथ्य: जुहील उके , रिशील ढोबळे
संगीत: आशिष दुर्गे
संस्था: कामगार कल्याण केंद्र, जयताळा, नागपूर
बौद्ध तत्त्वज्ञानामध्ये व जीवनशैलीमध्ये विविध विचारवंतांनी, तत्त्ववेत्त्यांनी कवी नाटककार यांनी मोलाची भर घातली. धर्म, तत्वज्ञान, निरीश्वरवाद, बुद्धदर्शन, विज्ञानवाद या विषयांवरती मूलभूत लेखन करणारे भदंत अश्वघोष. यासोबतच कवी, नाटककार, संगीत, चित्रकला ,वेदशास्त्रपारंगत अशा विविध कलांचे धनी महाकवी म्हणजेच महाकवी अश्वघोष. महाकवी अश्वघोष ते भदंत अश्वघोष हा संपूर्ण जीवन प्रवास आपणासमोर सादर होतो भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार भदंत अश्वघोष या प्रयोगांमधून.
साकेत नगरीमध्ये सुवर्णाक्षी व सेग्राग्रहम (विरेंद्र गणवीर) हे ब्राह्मण दांपत्य.अश्वघोष (श्रेयस अतकर) हा त्यांचा मुलगा. अश्वघोष हा वेदशास्त्रसंपन्न, संगीत, विणावादन पारंगत आणि कवी असे अष्टपैलू व्यक्तीमत्व. महाकवी म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पोहोचलेली असते. युनानी आक्रमणानंतर सांस्कृतिक अभिसरणाची सुरवात झाली. युनानी लोक आपल्या सैनिकांसाठी विविध नाट्यप्रयोग मनोरंजन म्हणून सादर करत. असाच एक नाट्यप्रयोग कवी अश्वघोष पाहतात. नाटक हा अभिव्यक्त होण्याचा प्रकार त्यांना भारावून टाकतो. प्रभा (सांची तेलंग) या नाट्य प्रयोगाची युनानी मुख्य अभिनेत्री.अश्वघोष आणि प्रभा त्यांच्या मैत्रीचे रूपांतर पुढे प्रेमात होते. कवी अश्वघोष प्रभाला समोर ठेवून प्राकृत भाषेमध्ये आपले पहिली नाट्यकृती उर्वशी वियोग लिहितात. ब्राह्मण कुळात जन्मलेल्या अश्वघोष यांना त्यांचे वडील यूनानी मुलीसोबत लग्न करण्यास प्रखर विरोध करतात. प्रभा आत्महत्या करते. वियोग असह्य झाल्यामुळे अश्वघोष सैरभैर होतात. याच कालावधीमध्ये हिंदू धर्म आणि बौद्ध धर्म यामधील धार्मिक चालीरीतीवरून तात्विक संघर्ष सुरू असतो. शास्त्रार्थच्या निमित्ताने कवी अश्वघोष आणि भदंत यांच्यामध्ये सुसंवाद प्रस्थापित होतो. अश्वघोष मगध देशाची राजधानी पाटलीपुत्र येथे जाऊन भदंत पार्श्व यांच्या मार्गदर्शनाखाली बौद्धधर्म स्वीकारतात. पुढील जीवन कार्य बौद्धधर्म, धम्म प्रसारासाठी समर्पित करतात. सम्राट कनिष्क पाटलीपुत्र जिंकल्यानंतर भदंत अश्वघोष यांचे शिष्यत्व पत्करतो. भदन्त अश्वघोष आपले संपूर्ण जीवन कार्य नाट्यलेखन, तथागत गौतम बुद्धांचा बौद्ध धर्माचा संदेश सर्वदूर पसरवण्यासाठी कार्यप्रवण होतात.
लेखक आणि दिग्दर्शक वीरेंद्र गणवीर यांनी भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार भदंत अश्वघोष या नाटकाच्या लेखनामध्ये आणि दिग्दर्शनामध्ये आपले नैपुण्य दाखवून दिले आहे. दिग्दर्शक म्हणून त्यांनी नेपथ्य, प्रकाश योजना, वेशभूषा, रंगभूषा या सर्व बाजूमधून दोन हजार वर्षांपूर्वीचा कालावधी या प्रयोगाच्या माध्यमातून उभा केला होता.
श्रेयस अतकर यांनी महाकवी, वेदशास्त्र पारंगत, आज्ञाधारक, विरहामध्ये सैरभैर झालेला आणि शेवटी शांत व संयमी भदंत अश्वघोष या विविध रूपांमधील अश्वघोष ही भूमिका सूरेख रित्या सादर केली. सांची तेलंग यांनी साकारलेली प्रभा ही भूमिका प्रभावी रीत्या सादर झाली. या भूमिकेसाठी आवश्यक असणारी भाषेची समज, दोन देशातील संस्कृतीमधील फरक आपल्या अभिनयातून साकार केला वीरेंद्र गणवीर यांनी सेग्राग्रहम अर्थात अश्वघोष यांच्या वडिलांची भुमिका यशस्वीरित्या पार पाडली.या नाटकांमध्ये सौम्य, धर्मसेन, कनिष्क, भदंत पार्श्व यासह एकूण अठरा पात्रे रंगमंचावर ती वावरत होती. यातील प्रत्येक पात्राने आपल्या भूमिकेस योग्य न्याय दिला.
ऐतिहासिक नाटक करत असताना नेपथ्या मध्ये खूप काळजीपूर्वक रंगमंचीय रचना करावी लागते. जुहील उके व रिशील ढोबळे यांनी या नाटकांमध्ये देखील लेव्हल्सचा विविध पातळ्यांवरती वापर, विविध रंगांच्या मस्किंग आणि दोन चौकटींच्या माध्यमातून उभे केलेले अश्वघोष यांचे घर, प्रभाचे निवासस्थान, सरयू नदीचे पात्र, सुरेखरित्या जमून आले होते. पडद्यांचा, एकतारीचा आणि विविध वस्तूंचा केलेला योग्य वापर आणि संपूर्ण रंगमंच व्यापून नदी प्रवाह ओलांडून जाणारे अश्वघोष आणि प्रभात हा प्रसंग नाटकातील सर्वोच्च बिंदू ठरला.
किशोर बत्तासे यांनी केली प्रकाश योजना या प्रयोगास साजेशी होती.
दोन हजार वर्षांपूर्वीचा काळ आणि अस्तित्वात असणारे वाद्य यांचा समन्वय या संगीतामुळे जुळून आला होता.आशिष दुर्गे यांनी पार्श्वसंगीतावरती विशेष मेहनत घेतलेली दिसून आली. संपूर्ण प्रयोगामध्ये भारतीय शास्त्रीय संगीताचा, तालवाद्यांचा योग्य वापर केला होता. तत्कालीन काळ उभा करण्यासाठी, केशरचना, वेशभूषा हा घटक देखील महत्त्वाचा होता. वेशभूषेवरती सुद्धा अत्यंत तपशीलवारपणे दिग्दर्शकाने मेहनत घेतलेली दिसून आली.
कवी अश्वघोष ते भदंत अश्वघोष, त्यांनी लिहिलेली विविध साहित्य संपदा आज देखील संपूर्ण भारतवर्षास प्रेरणादायी आहे. नेमकी हीच अनुभूती भारतीय रंगभूमीचे आद्य नाटककार भदंत अश्वघोष या नाट्य प्रयोगांमधून आपणास मिळते.
© प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर
9421440940
Dr. Ganesh Mudegaonkar
Share
No comments:
Post a Comment