सदाबहार प्रेमाची खुमासदार कहाणी : प्रेमा तुझा रंग कसा?

नाटक : प्रेमा तुझा रंग कसा
लेखक: प्रा. वसंत कानेटकर
दिग्दर्शक: रवींद्र ढवळे
नेपथ्य: अविनाश देशपांडे, कैलास डिडवाणी
संगीत: अमोल काबरा
संस्था: ललीत कला भवन, सिडको, नाशिक

प्रा.वसंत कानेटकर यांच्या लेखणीची भुरळ आजही प्रेक्षकांवर आजही कायम आहे याचा प्रचिती आपणास "प्रेमा तुझा रंग कसा" हा प्रयोग पाहिल्यानंतर येते. प्रा.कानेटकरांची संवाद शैली, पात्रांच्या वृत्ती व स्वभावमधून  निर्माण होणारे नर्मविनोद हे त्यांच्या नाट्यलेखनाचे वैशिष्ट्य. फार्स आणि विनोदी पद्धतीने जाणारे हे नाटक नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरते.

मानवी जीवनातील सर्वांग सुंदर भावना म्हणजे प्रेम. प्रेमाला बंधन नसते, निस्सीम प्रेम म्हणजे त्याग व उदात्त समर्पण. निस्वार्थी, निरपेक्षपणे केलेलं प्रेम हे चिरकाल टिकणारं असतं. मात्र प्रेमात जेंव्हा व्यवहार येतो तेंव्हा सुरू होते असूया आणि द्वेष. मानवी जीवनाच्या एका विशिष्ठ वळणावर व्यक्तीला केव्हा ना केव्हा प्रेम होतेच. या प्रेमाची परिणिती, त्याचा प्रवास भविष्यामध्ये कशा रीतीने होतो याचा नाट्यनुभव म्हणजे "प्रेमा तुझा रंग कसा". 

प्रा. बल्लाळ (रवींद्र ढवळे) मानसशास्त्र विषयाचे अभ्यासक. मानवी भावभावना, वृत्ती हा त्यांचा आवडीचा विषय.  प्रा. बल्लाळ व  प्रियंवदा (निशिगंधा घाणेकर) यांचा 25 वर्षांपूर्वी प्रेमविवाह झालेला आहे. घरच्यांचा विरोध पत्कारून या दोघांनी लग्न केलेले असते. यांची दोन मुलं बच्चू  (सुयोग कुलकर्णी) आणि बब्बड (भावना भालेराव).

नवीन पिढीस कायम असे वाटते की जुनी पिढी आमच प्रेम समजूनच घेत नाही.
बब्बड व बाजीराव (ऋषीकेश गोटे) यांची देखील हीच अडचण आहे. यांच्या लग्नास सर्वप्रथम विरोध होतो. नंतर त्या लग्नास मान्यता मिळते.  लग्नापूर्वीचे तरल प्रेम लग्नानंतर घटस्फोटापर्यंत येऊन थांबते. 

बच्चू तीन वेळा प्रेमभंग होऊन परत सुशीलच्या (मीरा जोशी) प्रेमात पडतो.  सुशील मात्र बच्चूवर विविध मानसशास्त्रीय प्रयोग करत असते. परंतु हे प्रयोग बच्चूस प्रेमच वाटतं.पुढे सुशील सर्जेराव सोबत लग्न करते आणि परत एकदा बच्चूचा प्रेमभंग होतो. नाटकातील या सर्व प्रेम प्रकरणांची गुंतागुंत प्रा. बल्लाळ मात्र अत्यंत रंगतदारपणे सोडवतात.

रवींद्र ढवळे यांनी आपल्या दिग्दर्शनामधून आणि प्रा. बल्लाळ या मुख्य भूमिकेमधून नाटकास वेगळी उंची प्राप्त करून दिली आहे. वाचिक अभिनयावर त्यांची पकड वाखाणण्याजोगी होती.  प्रियंवदा या भूमिकेमध्ये निशिंगधा घाणेकर यांची भूमिकेची समज खूप छान होती. भांडखोर पत्नी, शिस्तप्रिय आई यातील भेद त्यांनी सुक्षपणे मांडला होता.

महेंद्र दीक्षित यांनी रंगवलेला निळूभाऊ हा साठच्या दशकाची पुरेपुर आठवण करून देतो. काळी टोपी, काळा कोट, धोतर आणि काठी यामुळे 'निळूभाऊ' हे पात्र आधिक उठावदार झाले. त्यांची अनुनासिक बोलण्याची पद्धत आणि 'राम कृष्ण हरी' भाव खाऊन गेले.  बच्चू, सुशील, बाजीराव, बब्बड  यांनी देखील आपल्या भूमिकाना योग्य न्याय दिला. 

अमोल काबरा यांनी पार्श्वसंगीतामध्ये प्रसंगानुरूप निवडलेली गाणी रंजकता वाढवणारी होती. नेपथ्यामधे अरविंद देशपांडे आणि कैलास डीडवानी यांनी उभे केलेले सुखवस्तू घर, दिवाणखाना व गॅलरी प्रयोगास पूरक होते.

प्रेमा तुझा रंग कसा..? या प्रश्नाचे उत्तर देखील आपणास प्रा. कानिटकरांनी उभ्या केलेला पात्रामधून मिळते. प्रा. बल्लाळ व प्रियंवदा यांच्या प्रेमाची परिपूर्णता.  निळूभाऊ आपल्या पत्नीवर आजारी असून देखील तेवढेच प्रेम करतात ही त्याग वृत्ती. अवखळ, निरागस असं प्रेम आहे बाजी आणि बब्बड यांचं. एकतर्फी, वारंवार प्रेमभंग होऊन देखील व्यवहारी शहाणपण नसणारा आणि परत प्रेमात पडणारा बच्चू.  

पूर्वी जे घडले तेच आज ही घडले आणि आज पासून 25 वर्षानंतर देखील याच पद्धतीने हे प्रेमाचे रंग असेच आपणासमोर उलगडतील. यातील मुख्य पात्र असतील आपली पुढची पिढी. प्रेमाचा हा उत्कट , तरल, भावपूर्ण, विरह, त्याग, निरपेक्ष, एकतर्फी, विरक्त प्रवास वळणावळणाने जाऊन शेवटी सप्तरंगमध्ये सामावून जातो. प्रा. कानेटकर यांनी प्रेमाचे हेच विविध रंग, प्रेमाचे हळूवार नाजूक धागे अलवारपणे आपल्यासमोर उलगडून दाखवले आहेत.

सर्वच कलावंतांनी केलेला हा विनोदी आणि फार्स शैलीने जाणारा प्रयोग प्रेक्षकांना देखील सुखावून गेला. या प्रयोगास प्रेक्षकांचीही तेवढीच दाद मिळाली.

© प्रा.डॉ. गणेश मुडेगावकर
Dr. Ganesh Mudegaonkar

Share