धर्मयुद्धाच्या पटलावरील मोहरा: घटोत्कच

नाटक : घटोत्कच
लेखक: आशुतोष दिवाण
दिग्दर्शक: अभिजीत झुंजारराव
प्रकाश योजना: श्याम चव्हाण
नेपथ्य: अभिजीत झुंजारराव
संगीत: आशुतोष वाघमारे
संस्था: कामगार कल्याण केंद्र, प्रभादेवी, मुंबई

माणूस जेवढा पातळयंत्री आणि कुटील, तेवढा तो सिंहासनाच्या आधिक जवळ जातो..आणि होतो  अधिपती..!! कुटील राजनीती, धृतराष्ट्राचा राजधर्म, दुर्योधनाचे युद्ध आणि स्वकीयांना संपवण्याची घेतलेली शपथ यामधून निर्माण होणारा उन्माद तर कधी मरणाची भीती या सर्वांचा वस्तुपाठ म्हणजे घटत्कोच. महाभारतातील कोणतेही पान उलटले की सुरू होतो एका नवीन पात्राचा प्रवास. महाभारतातील  दुर्लक्षित पात्रांची  व्याकूळ करणारी वेदनांची गाथा म्हणजे घटत्कोच.
पांडवांना बहाल केलेले देवत्व क्षणभर विसरून मानवीय पातळीवरती पांडव हे कौरवापेक्षा कुटील कारस्थानामध्ये वेगळे नव्हते. इरावती कर्वे यांच्या युगांतची आठवण आपणास घटोत्कच मधून येते. तसेच घाशीराम..मधील नृत्य, संगिताची, मानवीय नेपथ्याची आठवण देखील करून देत.

आर्य व अनार्य यांच्या संकरातून जन्माला आलेला घटोत्कच. राक्षस कुळातील..हिडिंबा आणि महापराक्रमी भिमसेन यांचा मुलगा.स्वकीयांच्या मोहाचे पाश कसे गळून पडतात, युद्धनिती वेळप्रसंगी नात्यांचा कसा बळी घेते? अधिपतीचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी बलिदान म्हणून  अनेक मोहरे कामी येतात....याला अपवाद घटत्कोच कसा ठरेल? लेखक आशुतोष दिवाण  घटत्कोच मधून मांडतात वर्चस्वाच्या लढाईचा भेसूर चेहरा.. बेमालूमपणे. घटत्कोच, हिडिंबा, भीमसेन, युधिष्ठिर, अर्जून, अभिमन्यू, द्रौपदी, कर्ण, वृषाली, दुर्योधन, दुशासन, शकूनी मामा आणि राजा बळी व चंद्र आणि  रक्तवर्ण शेल्यासह श्रीकृष्ण यांच्या सानिध्यात घडतो घटत्कोचचा प्रवास.

कुरुक्षेत्रावर ती युद्ध समीप येऊन ठेपलेले आहे. कौरव सेनेसह सज्ज आहेत. पांडवांकडे पुरेसे सैन्यबळ उपलब्ध नाही. घटत्कोच पितृऋण फेडण्यासाठी कुरुक्षेत्राकडे कूच करण्याच्या तयारीत. हिडिंबा मात्र याच्या विरोधात. तारुण्यातील चूक मी स्वीकारली पण त्याची शिक्षा एवढी मोठी नको होती.भीमसेन माझ्याकडे आणि आपल्या पुत्राकडे एकदाही परत आले नाहीत अशा पिताच्या ऋणांची परतफेड करण्याची काहीही गरज नाही.हाती असलेले शाश्वत सत्य सोडून मृगजळाच्या मागे धावू नको..हा हिडिंबाचा प्रेमाचा सल्ला. पण आर्य संस्कृतीची ओढ घटत्कोचास स्वस्थ बसू देत नाही.  

दिडशे स्वारांसह कुरुक्षेत्रावर ते दाखल झाल्यानंतर युधिष्ठिर आणि पिता भीमसेन यांनी उपहासाने केलेले स्वागत, झालेला उपमर्द घटत्कोचला जिव्हारी लागतो. द्रौपदी देखिल..हिडिंबा, राक्षस कुळ यावरून घटत्कोच यास अपमानित करण्याची कुठलीही संधी सोडत नाही. 
युधिष्ठिर आणि भीम युद्धनीती, चक्रव्यूह भेदण्याचे मर्म शोधत असताना,यासाठी अभिमन्यू हा उत्तम पर्याय ठरतो. जर यात तो अयशस्वी ठरला तर होणारी अपरिमित हानी या दोघांच्या लेखी शून्य ठरते.अभिमन्यूला रणांगणावरआत्यंतिक वेदना देऊन, अनन्वित अत्याचार करून मारले जाते. त्या घटनेचा साक्षीदार असतो, अभिमन्यूचा जिवलग मित्र घटत्कोच. या युद्ध प्रसंगानंतर घटत्कोचची जीवनासक्ती संपते. युद्ध कोणासाठी उपमर्द केलेल्या  पित्या साठी की जन्माने अनार्य असूनही आर्य पांडवांसाठी? घटत्कोचान रणांगणावरती गाजवलेले शौर्य कौरवांना सळो कि पळो करून सोडतो. कपटी शकुनी, कौरव सेने प्रमुख दुर्योधन आणि दुशासन एकमताने कर्णावर ही "विनंतीवजा" जबाबदारी सोपवतात. उपकाराखाली दबलेला,अर्जुना सोबत युद्ध करण्यासाठी आसुसलेला, आपली सर्व अस्त्र केवळ अर्जुनासोबत लढण्यासाठी राखून ठेवणारा अंगराज कर्ण ही जबाबदारी स्वीकारताना विचलित होतो. जगण्याची आसक्ती कर्ण यास विचलीत करते. प्राणपणाने  लढणाऱ्या घटत्कोचास वीरमरण प्राप्त होते. पुत्र वियोगाने अर्जुन आणि भीम दोघेही व्याकूळ होतात.  क्षत्रिय धर्म पाळण्यासाठी नीतीचे राज्य प्रस्थापित करण्यासाठी युद्धामध्ये आहुती द्यावीच लागते हे वास्तव स्वीकारताना मात्र ते दोघेही उन्मळून पडतात..!! प्रश्न कायम राहतो तो पुत्रवियोगाने सैरभैर झालेल्या सुभद्रा, हिडिंबा आणि वृषाली यांचा...!! 

राष्ट्रासाठी वीरमरण प्राप्त झालेल्या भारतीय सैनिकांच्या कुटुंबियांचे, अपत्यांचे जीवन आपण सुखदायी करतोय ना? हा प्रश्न आपणास अंतर्मुख करतो.

घटत्कोच ही कथा आहे, वेदनांची महागाथा आहे..!! ती गेयस्वरूपात, नृत्यामधून, अभिनय, नेपथ्य, प्रकाश योजना आणि संगीताच्या माध्यमातून आपणापर्यंत पोहोचते अत्यंत अभिनव दिगदर्शनाच्या माध्यमातून. महाभारताचा स्वतंत्र काळ निर्माण करणारे घटोत्कच एक वेगळा नाट्यानुभव देते. दिग्दर्शक अभिजीत झुंजारराव यांनी महाभारतातील काही पात्र मानवी पातळीवर ती आल्यानंतर सर्वसामान्य माणसांसारखे भावभावनांचे कसे बळी पडतात हे घटत्कोच यातही ते मुलं सर्व रंगमंचीय आयुधे वापरून आपणापर्यंत पोहोचवले आहे
घटत्कोच (राजस पंधे) यांनी ही भूमिका अक्षरशः जगली आहे. राजपुत्र, नृत्य,अपमानित, पराक्रमी आणि अभिमन्यूच्या मृत्यूनंतर भयाण वास्तवास सामोरे जाणारा घटत्कोच आपणापर्यंत प्रभावीरीत्या पोहोचतो. हिडिंबा (रुचिका खेरणार) द्रौपदी(सायली शिंदे), वृषाली(श्रेयशी वैद्य) म्हातारी(रेश्मा कदम) अशा विविध भूमिका या कलावंतांनी सुरेख रित्या अभिनित केल्या. युधिष्ठिर(हरीश भिसे), अर्जुन (श्रीकांत पलांडे) भीम(राहुल शिरसाट) शकुनि, दुर्योधन, दुशासन आणि कर्ण या भूमिकादेखील वाखाणण्याजोग्या झाल्या. जवळपास तीस कलावंतांचा संच घटत्कोच या नाट्य प्रयोगाचा रंगमंचीय अविष्कार साकार करत होते. 
श्याम चव्हाण यांनी घटत्कोच चे राज्य कौरव पांडव यांची स्वतंत्र ओळख प्रकाशयोजनेच्या माध्यमातून निर्माण केली. ऐतिहासिक पार्श्वभूमीवर घटणाऱ्या नाटकाचा आशय  प्रकाशयोजनेमुळे आधिक गडद झाला. समर प्रसंग, स्वगत, आरसा, कर्णाचे दुस्वप्न असे अनेक प्रसंग विविध रंगसंगतीमुळे परिणामकारक झाले. विविधरंगी झेंड्यांचा  आणि त्या वरती असणाऱ्या चित्र कृतींचा  अर्थ  आणि वापर  सुरेख रित्या करण्यात आला. आशुतोष वाघमारे यांचे संगीत नाटकाच्या  आशयास आधिक भावगर्भ करते.
 तृप्ती झुंजारराव यांनी वेशभूषेवरती आधिक मेहनत घेतलेली दिसून आली. आर्य, अनार्य, सैनिक इ पात्रांच्या वेशभूषा संहितेस समर्पक होत्या.
 इतिहासामध्ये सर्वसामान्य सैनिकांचे बलिदान हे स्मारकामधून उभे राहते तर थोर  योद्ध्यांचे पुतळे उभे केले जातात राजसत्ता नेहमी राजाचा इतिहास दैदिप्यमान म्हणून सर्वसामान्यांवर ती बिंबवते. सामान्य सैनिक मात्र लढतो तो पोटासाठी आणि कुटुंबाचा महाभारत हा त्यासाठीचा दाखला वर्तमानातही समकालीन मूल्यांवर ती तपासून पाहिल्यानंतर यात कोणताही फरक पडलेला दिसून येत नाही. बुरख्याआड लपलेले चेहरे व त्यांचा पर्दाफाश अशा कलाकृती वारंवार करत असतात संदर्भ कधी महाभारताचा असतो तर कधी भारतीय सैन्यातील सैनिकांच्या यशोगाथेचा वेदना तीच जे सुभद्रेची हिडीम्बाची आणि घटत्कोच याची.
प्रायोगिक रंगभूमीवर चिरकाल स्मरणात राहणारा प्रयोग  म्हणजे  घटत्कोच. सर्वच रंगकर्मींनी आवर्जून पहावी, अनुभवावी अशी कलाकृती स्पर्धेत आपणास पहावयास मिळाली अशी प्रतिक्रिया प्रेक्षकांनी नोंदवली.

© प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर
9421440940

Dr. Ganesh Mudegaonkar

Share