मरणाने केली सुटका..!! : बार्दो

नाटक : बार्दो
लेखक: शंतनू चंद्रात्रे
दिग्दर्शक: अनुप माने
प्रकाश योजना: यश नवले
नेपथ्य: अमेय भालेराव
संगीत: ओमकार घाडी
संस्था: कामगार कल्याण केंद्र, राबोडी, ठाणे

इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते |
नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते ||


स्व. सुरेश भटांची ही गझल बार्दो हा प्रयोग पाहतांना रंगमंचावरती वेगळ्या अर्थाने साकार होताना दिसली...तीच वेदना, तोच हुंदका आणि तोच हुंकार वेगळ्या स्वरूपात...!!

स्मशानाच सुद्धा  शाश्वत  आणि स्वतंत्र असं एक विश्व असतं. जीवन व मरण ही सतत बदलणारी वास्तविकता. चितेवरती जळणाऱ्या देहाची ही अवस्था किती अस्वस्थ करणारी असते? स्मशानात काम करणाऱ्या व्यक्तीची जगण्याची कोणती अशी आसक्ती बाकी असते की तो रोज देह दहनाचा व्यवहार नित्यनेमाने करत असतो. अनेक मरण गाथा,भावनांचा बाजार, तुटलेले पाश, गळून पडलेले गैरसमज आणि जीवनातील अंतिम सत्य या सर्वांना सामोरे जाताना उन्मळून पडलेली माणसं..याचे हेच खरे साक्षिदार..!!  जीवन-मरणाच्या चक्रामध्ये मरण कायमच भीतीदायक, वेदनादायी का ठरतं? या प्रश्नांची उत्तरं शोधली पाहिजेत किंवा मेलेल्या व्यक्तीला या प्रश्नांची उत्तरं विचारली पाहिजेत. मृत्यू आणि पुनर्जन्म यामध्ये जी एक अवस्था असते त्या अवस्थेत बार्दो असे म्हणतात. याच अवस्थेमध्ये जाऊन आपण मरण पावलेल्या व्यक्तीला प्रश्न विचारले तर काही अनुत्तरीत प्रश्नांची उत्तरे शोधली तर हाच विषय शंतनू चंद्रात्रे यांनी बार्दो नाट्य प्रयोगातून मांडला आहे.

राजा (साई निरावडेकर) आणि शिवा (दुर्गेश बुधकर) स्मशानामध्ये  काम करणारे मित्र आणि  व्यसनी.  शिवा स्मशानामध्ये चिता रचण्यापासून अग्नी देणे पर्यंतची सर्व कामे करत असतो. शिवाचे आजोबा वैद्य असतात. लहानपणापासून शिवा आजोबांसोबत विविध रूग्णांवर ती उपचार करत आजोबांसोबत फिरत असतो. नातू डॉक्टर व्हावा या हेतूने शिवाचे आजोबा सर्व जमापुंजी शिवा जवळ देऊन त्याला शहरात पुढील शिक्षणासाठी पाठवतात. सतरा वर्षाचा भेदरलेले युवक शहरांमधे गोंधळून जातो. यातच स्टॅन्ड वरून त्याची पैशांची बॅग चोरीला जाते. आयुष्याचे अनेक टक्के टोणपे खात तो स्मशानामध्ये काम करत असतो. शिवाची आणखी एक खासियत म्हणजे चितेवरती  जळणाऱ्या  व्यक्तीकडे  पाहून तो सांगू शकत असतो, ही व्यक्ती नक्की कोणत्या आजाराने मरण पावली. स्मशानामध्ये गणेश( साहिल परब) आपल्या वडिलांच्या अग्निसंस्कारानंतर नंतर कवटी फुटण्याची वाट पाहत आहे असतो.  तिथे येतात राजा आणि शिवा. शिवा गणेशला सांगतो की तुझे वडील फुप्फुसाच्या कॅन्सरने गेले गणेश आश्चर्यचकित होऊन त्याच्याकडे पाहतो.

शिवाकडे त्याच्या उस्ताद नाही तयार करून दिलेले एक औषध असते. औषधाचे वैशिष्ट्य हेच किती घेतल्यानंतर काही क्षणात तुम्ही बार्दो या अवस्थेत पोहोचता नुकत्याच मरण पावलेल्या कोणत्याही व्यक्तीला तुम्ही भेटू शकता व बोलू शकता. मृत व्यक्तीने परवानगी दिली की जिवंत व्यक्ती परत वास्तवामध्ये जगण्यासाठी तयार. हे औषध गणेशला देण्यात येते. काही क्षणात गणेशचे वडील त्याला भेटतात. या घटनेला वीस वर्षे पूर्ण झाली आहेत.

एक पोलीस(समीर सुमन) एका मुलीचे (अक्षता सामंत) प्रेत, एकटाच दहनासाठी घेऊन येतो. शिवा यासाठी तयार नसतो. जाधव साहेबांची परवानगी आणि मृत्यू दाखला शिवाय मी प्रेतास हातही लावणार नाही असे सांगतो. पोलीस बंदुकीचा धाक दाखवून त्यात अग्नी देण्यास प्रवृत्त करतो.

शिवाला वीस वर्षा पुर्वीच्या मुलगा व वडील दहनाची भेटीची आठवण करून देतो. शिवा कडून ते औषध घेऊन पोलीस स्वखुशीने आणि शिवाला बळजबरीने बार्दो मध्ये घेऊन पोहोचतो. याठिकाणी अगोदरच तारा पोहोचलेली असते. ती वेश्या वस्तीमध्ये काम करत असते. तारावरती पोलिसाचे एकतर्फी प्रेम असते. अव्यक्त प्रेमाबद्दल तारा प्रश्न विचारते? पोलीस व्यक्त होण्यासाठीच बार्दो मध्ये पोहचलेला असतो.  याच ठिकाणी राजा पण भेटतो. राजा शिवाला विचारतो मी कसा मेलो? पण शिवा त्याचे उत्तर देत नाही. शेवटी समोर येतं भयाण वास्तव. शिवाने औषधामधून विषप्रयोग करून राजाला संपलेले असते. हेच औषध राजाने आपल्या मुलीला दिलेले असते. राजाची मुलगी तारा. आणि पोलिस म्हणजे वीसवर्षा पूर्वीचा गणेश. तर वीस वर्षांपूर्वी बस स्टॅन्ड वरती पैसे चोरून पळालेली व्यक्ती असते राजा. यासर्वाचा सूड उगवण्यासाठी  शिवा  राजाला विष देतो.  पण राजाने ते औषध समजून ते ताराला दिलेली असते..सत्य या सर्वांसाठी कल्पनेपेक्षाही भयानक असते.

अनुप माने यांच्या दिग्दर्शनात मधून आपणासमोर उभे राहते स्मशान. स्मशानाची स्वतंत्र संस्कृती तेथील माणसं  आणि त्यांचं  स्वतंत्र भावविश्व. स्मशान निर्मितीसाठी नेपथ्य, आवश्यक तेवढेच संगीत आणि प्रकाश योजना यांचा सुरेख संगम करण्यात आला होता. बार्दो या नाट्यकृतीच्या दिग्दर्शनामध्ये बंदूकीची गोळी लागल्यानंतर उडून पडणारा दिवा,जुळणारी चिता, वडाचे झाड या सर्व बाबींचा अत्यंत बारकाईने अनुप माने यांनी विचार केलेला दिसून येतो.
शिवा हे पात्र साकारताना दुर्गेश भुतकर यांनी खूप मेहनत घेतलेली दिसून येते.शिवाचे पूर्ण भावविश्व,  मृत व्यक्तीचे मरणाचे कारण सांगणारा, मित्रावर प्रेम करणारा,चोरीला गेलेल्या पैशामुळे उध्वस्त झालेला, पोलीसा सोबत बार्दोमध्ये पोहोचलेला आणि या सर्व परिस्थितीचा बदला घेणारा शिवा विविधांगी पद्धतीने आपल्यापर्यंत प्रभावीरीत्या पोहोचतो. राजा हा देखील स्मशानाचा राजा म्हणून कसा जगला हे साई निरावडेकर यांनी आपल्या अभिनयातून दाखवून दिले.  समीर सुमन यांनी उभा केलेला पोलीस वाखाणण्याजोगा होता. एक तर्फी प्रेम,तारा बद्दलची अनाहूत ओढ व हुरहूर, मृत्यूचे कारण शोधण्यारा, उन्मळून पडणारा प्रियकर अशा विविध छटा मधून समीर सुमन आपल्यापर्यंत  पोलीस ही भूमिका पोहोचवतात. तारा ही भूमिका अक्षता सामंत हिने खूप सुरेख रित्या साकारली. पहिल्या प्रवेशातील छोटा मुलगा म्हणजेच साहिल परब याने देखील लहानपणीचा गणेश वैशिष्ट्यपूर्ण  रित्या साकारला.
यश नवले यांच्या प्रकाश योजने बार्दो या नाट्यप्रयोगास स्वतंत्र ओळख निर्माण करून दिली. धगधगणारी चिता,सुन्न करणारे रात्रीचे वातावरण, बार्दोचे स्वतंत्र विश्व ,योग्य रंगसंगतीचा वापर प्रकाश योजनेमधून प्रभावीरित्या दिसून आला.

स्मशानाचा स्वतःचं स्वतंत्र अस एक संगीत असतं..मन सुन्न करणार.  ओमकार घाडी यांनी प्रयोगामध्ये पाला पाचोळा, त्यांचा विशिष्ठ आवाज, स्मशानातील पक्षांचा आवाज, रातकिडे, झाडांमधून प्रवाही वारा आणि स्मशान शांतता देखीलबआपल्या संगीताचा अविभाज्य घटक बनवला होता. अमेय भालेराव यांनी नेपथ्यामधून अख्खे स्मशान आपल्यासमोर उभे केले होते. वडाचे मोठे झाड, भैरोबाची मूर्ती, जुनाट पायऱ्या, पारंब्या, झाडे झुडपं आणि एका कोपऱ्यामध्ये जळणारी चिता. या सर्व बाबी स्मशान आणि बार्दो दोन्ही बाबी उठवदररित्या आपल्यापर्यंत पोहोचत होत्या.

मृत्यू बरेच प्रश्न सोडवतो पण अकाली मृत्यू हा पर्याय प्रश्न उपस्थित करतो. त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला कधीच मिळत नाहीत. या प्रश्नांची उत्तरे खरंतर आपल्याला मिळायला हवीत. त्या प्रश्नांची उत्तरं  मिळवण्यासाठी काहीतरी व्यवस्था असायला हवी...ही कल्पना सत्यात उतरवून रंगमंचावर साकारणे अत्यंत अवघड बाब. ही बाब अनुभवणे ही एक सुखद अनुभव. खरंच माणसांना बार्दो या अवस्थेत जाऊन काही प्रश्नांची उत्तरे मिळाली तर मृत्यूनंतरचे एक वेगळे जग आपणास पहावयास  मिळेल व सुन्न करणारा असा हा अनुभव होता अशा काही बोलक्या प्रतिक्रिया बार्दो या प्रयोगाबद्दल प्रेक्षकांनी व्यक्त केल्या.


© प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर
9421440940

Dr Ganesh Mudegaonkar

Share