भारतीय सैन्याच्या संयमाची परिसीमा : किस्तबहार  

नाटक : किस्त बहार
लेखक: सलीम शेख
दिग्दर्शक: सलीम शेख
प्रकाश योजना: मिथुन मित्रा
नेपथ्य: सौरभ दास
संगीत: हेमंत डिके
संस्था: कामगार कल्याण केंद्र, बेझनबाग, नागपूर

काश्मीर हे भारताचे नंदनवन. भारतीय स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर देखील कश्मीर धुमसतो आहे. काश्मीरमधील  धार्मिक संघर्ष  आज देखील थांबलेला नाही.भारत सरकारने सुरक्षेस्तव काश्मीर आणि काश्मीर खोरे भारतीय सैन्यदल आणि सैनिकांच्या मदतीने शांत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. असामाजिक तत्वांनी आजही तिथे तरुणांचे डोके भडकवण्याचे काम थांबवलेले नाही. त्यामुळे काश्मिरी नागरिक हा दहशतवाद्यांच्या बंदुकीच्या धाकाने, भितिने ग्रासून गेला आहे.  काश्मीर हे राज्य आज  उभे आहे ते भारतीय सैनिकांच्या संयमावर, सहनशीलतेवर. भारतीय सैन्यावर होणारी दगडफेक ही अमानुष बाब वारंवार काश्मिरच्या खोऱ्यामध्ये घडताना दिसते. पण यामुळे काश्मीरचे लोक काश्‍मिरी लोकांच्या विरोधात लढत आहेत, आपलेच नुकसान करून घेत आहेत हे त्यांच्या लक्षात येत नाही.  सैन्यावरती दगडफेक करत असताना आपल्याच हल्ल्याने जर आपलीच बहिण दगडफेकीची बळी पडली तर?  कश्मीरी पंडितांना त्यांच्याच घरांमधून कसे बेघर करण्यात आले? कलम 370 रद्द झाल्यानंतर काश्मीरमधील परिस्थिती व भारतीय सैन्याचे अतुलनीय शौर्य यावर भाष्य करणारे सलीम शेख यांचे हे नाटक.

भट (सलीम शेख) व संध्या (संयुक्ता थोरात) कुटुंबियांची मुलगी आशु (आयेशा) दगडफेकीमध्ये जखमी होते.डोळ्यांमधून रक्तस्त्राव होत असतो. या दगडफेकीस जबाबदार त्यांचाच मुलगा संजित (आदेश जामनिक)असतो. गिलानी यांच्या भडकावण्यावरून तो जिहादी झालेला असतो. संजीतचे वडील त्याला भारतीयत्व व आपला धर्म योग्य रित्या समजावून सांगतात आणि शेवटच्या क्षणी तो दहशतवादी न होता, काश्मीरसाठी शांती प्रस्थापित करण्यासाठी मदत करतो. या मत परिवर्तनाचे कारण असते भारतीय सैन्य. कर्फ्यू चालू असताना देखील भारतीय सैनिक रशीद प्रयत्नांची पराकाष्ठा करून आशु चे प्राण वाचवतो. 

भट यांच्या घरासमोर नेहमी पहारा देणारा सैनिक रशीद (सचिन गिरी) हा मूळचा काश्मिरी नागरिक. काश्मिरी पोलिस म्हणून कार्यरत असणारा राशीदचा मोठा भाऊ ईद साजरी करण्यासाठी आलेला असतो. दहशतवादी त्याची झोपेतच गोळ्या घालून हत्या करतात. तरीदेखील रशीद भारतीय सैन्यामध्ये दाखल होऊन काश्मीर खोऱ्यातील सर्वांचेच मन वळवण्याचा प्रयत्न करत असतो. राशीदला यासाठी त्याची होणारी पत्नी नूरची(भाग्यश्री देठे) साथ सोडावी लागते. सैन्यात भरती झाल्यामुळे राशिद काश्मिरी तरुणांसाठी अधिक जोमाने काम करू लागतो. गिलानी (परिक्षित हलसोले) हा काश्मीरमधील हुरियत नेता. दहशतवाद्यांना आपल्या घरामध्ये आश्रय देऊन त्यांना भारतीय सैन्यापासून वाचत असतो. तो तरुण-तरुणींची माथी भडकवतो आणि "हमे चाहिये आजादीच्या..!!"  नावाखाली पाकिस्तानी एजंट म्हणून काम करत असतो. भारतीय सैन्य शेवटी या सर्वाचा पर्दाफाश करते.

सलीम शेख यांनी लेखक आणि दिग्दर्शक म्हणून या प्रयोगासाठी वेशभूषेवर विशेष मेहनत घेतलेली दिसून येते. तसेच सलीम शेख यांनी भट ही भूमिका छान साकारली. संयुक्ता थोरात यांची संध्या ही भूमिका लक्षणीय होती. यासोबतच परीक्षित हरसुले यांनी  गिलानी व खान हे दोन्ही पात्र छान रंगवली होती. या प्रयोगात वीस कलावंत रंगमंचावर विविध भूमिका साकारत होती. सर्वांनीच आपापल्या भूमिकांना न्याय दिला.

नेपथ्यामध्ये उभे केलेले बर्फाचे डोंगर छान तयार करण्यात आले होते. बर्फ पडतानाचे प्रसंग नेपथ्यामधून उठावदार झाले. रंगमंचाची विभागणी तीन मुख्य भागांमध्ये करून, विविध प्रसंगांची उभारणी सौरभ दास यांच्या नेपथ्यामुळेच सुलभ झाली. हेमंत डिके यांची पार्श्वसंगीत प्रयोगात साजेसे होते. चित्रपटातील संगीताचा प्रभाव त्यांच्यावरती जाणवत होता. काही ठिकाणी त्यांनी पार्श्वसंगीताचा आवाज कमी ठेवणे गरजेचे होते असे वाटते. या प्रयोगामध्ये भाव खाऊन गेली की वेशभूषा संपूर्ण पात्रांनी काश्मीर आपल्या डोळ्यासमोर वेशभूषेच्या माध्यमातून उभा केला.

सलीम शेख यांनी लेखनामध्ये ब्लॅक आऊटची संख्या कमी करून, आवश्यक तेवढे ब्लॅकआउट घेऊन एकसंघपणे प्रयोग सादर केला असता तर तो अधिक प्रभावी झाला असता असे वाटते. पंचेविसपेक्षा अधिक ब्लॅक आऊट प्रयोगाचा आलेख व गती कमी करत होते. प्रत्येक पात्राचे उपकथानक आणि भूतकाळातील घटना देखील काही अंशी कमी करून, मुख्य भूमिकांवर लक्ष केंद्रित केले असते तर संहिता अधिक प्रभावीपणे प्रेक्षकांपर्यंत पोहोचली असती असे वाटते.  लेखनातील जमेची बाजू म्हणजे भारतीय सैन्य त्यांचे शौर्य, काश्‍मीर खोऱ्यामध्ये वेळोवेळी ते दाखवत असलेला संयम सलीम शेख यांच्या लेखणीतून अत्यंत प्रभावीरित्या आपणापर्यंत पोहोचतो. काश्‍मीर खोऱ्यामध्ये भारतीय सैनिकांच्या संयमाची परिसिमा कोणत्या पातळीपर्यंत आहे हे दाखवणारे नाटक आपण पाहिले ही भावना प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात होती. 

© प्रा.डॉ.गणेश मुडेगावकर
9421440940

Dr. Ganesh Mudegaonkar

Share