तुम्हाला माणूस व्हायचंय ? : मोस्ट वेलकम

नाटक : मोस्ट वेलकम
लेखक: सुनील हरिश्चंद्र
दिग्दर्शक: अमोल ताटे
प्रकाश योजना: श्याम चव्हाण
नेपथ्य: किरण माने
संगीत: मनीष पवार
संस्था: कामगार कल्याण केंद्र, बदलापूर

विचारांची लढाई ही विचारांनी लढली जाते, कितीही टोकाचे मतभेद असतील तरीही, एकवेळ  विचार नाकारतो येतो पण व्यक्तीला संपवणे हे अमान्य. महापुरुषांचे हे मोठेपण आपण आचरणात आणणे गरजेचे. मंदिरात कोण जातं? हिंदू ,मशिदीत कोण जातं? मुस्लिम, चर्चमध्ये कोण जातं? ख्रिश्चन, गुरुद्वारामध्ये कोण जातं ? शीख....या सर्वांमध्ये माणूस कुठे आहे? जगातील सर्व धर्म मला संस्कार,रीतीरिवाज, नियम, जगण्याची पद्धती हे सर्व शिकवत असतील तर या सर्व बाबींसोबत धर्म मला बुद्धिप्रामाण्यवाद शिकवतो ? तर्कसंगत विचारांची सुसंगत मांडणी स्पष्ट करतो? या प्रश्नांच मूळ व त्याची उत्तर शोधण्याचा प्रवास म्हणजे हे नाटक.स्त्री ही जन्मदात्री, मानवी वंश स्त्रियांमुळे अस्तित्वात असताना, स्त्रियांचा अनन्यसाधारण महत्त्व असताना...स्त्रियांवर ती सर्वात जास्त बंधने का? या सर्व प्रश्नांचा ऊहापोह , रंगतदार चर्चा आणि वादविवाद सुनील हरिश्चंद्र यांच्या मोस्ट वेलकम या नाट्य प्रयोगांमधून केला जातो. न-नाट्य म्हणजेच नाटकातील नाटक किंवा प्रेक्षकांच्या अभिरूची सोबत अधिक जवळीक साधणारे नाटक. महेश एलकुंचवार यांचे 'युगांत', गो. पू. देशपांडे यांचे 'उद्धवस्त धर्मशाळा' या नाट्य प्रयोगमधून हा वैचारिक नाटकांचा पायंडा पडला. याच धाटणीचे  वैचारिक द्वंद्व व मूल्य संघर्षावर भाष्य करणारे हे नाटक.

गौरी लंकेश यांची जेव्हा हत्या झाली तेव्हा त्यांनी त्यांच्या मारेकऱ्यांना सन्मानाने चर्चा करण्यासाठी घरामध्ये बोलावले असते..मोस्ट वेलकम म्हटले असते तर? याच प्रसंगाला समोर ठेवून अजात (ओम जंगम) नाटक बसवत आहे. या प्रसंगापासून सुरू होते नाटकातील नाटक. अजात या नाटकाचा लेखक व दिग्दर्शक आहे. त्याच्यासोबत आहे सात ते आठ लोकांची टीम. या नाटकातील गौरी लंकेश ही भूमिका संपूर्णा (शारवी व्यवहारे)साकारत असते तर मारेकऱ्याची भूमिकेमध्ये आदर्श (मयुर लाड) असतो.
या संपूर्ण वैचारिक चर्चेमध्ये उपस्थित केलेल्या प्रश्नांनी संपूर्णा गुरफटून जाते. संहितेमधील संवाद आणि  संपूर्णावर झालेले संस्कार यामधील मूल्य संघर्ष, वादविवाद तिला अस्वस्थ करून टाकतो. या संघर्षाचे फलित हेच की संपूर्णा गौरी लंकेश ची भूमिका व्यवस्थित रित्या समजावून घेऊन साकारते. आदर्श (मयुर लाड) हा व्यावसायिक, नव्या उमेदीचा कलावंत. नुकतंच त्याला इंडस्ट्रीमध्ये नाव मिळत आहे.तरीही तो मारेकऱ्याची भूमिका करण्यास तयार होतो. पण या भूमिकेमुळे भविष्यात होणारे नुकसान सहन करण्यास आदर्श तयार असतो. अजात या प्रयोगातील मुख्य वैचारिक धागा तथा सूत्रधार. विविध भूमिका समजावून सांगत असताना, संहितेची वैचारिक पार्श्वभूमी, सूत्रधाराच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवतो. कलेला धर्म नसतो. कला आहे विश्वव्यापी, चिरंतन...चिरकाल टिकणारी. या विचारांवरती येऊन मोस्ट वेलकम हे चर्चा नाट्य अथवा न-नाट्य थांबते पण असंख्य प्रश्न, विचारांची शृंखला प्रेक्षकांच्या मनात सुरू होते.

अजात अर्थात ओम जंगम या नाटकाचा सूत्रधार. ओम जंगम याने आपल्या सूत्रधार,लेखक,दिगदर्शक या भूमिका तसेच नाटकाची संपूर्ण पार्श्वभूमी विविधांगी स्वरूपात प्रेक्षकांसमोर मांडली. शार्वी व्यवहारे यांनी साकारलेली संपूर्णा ही भूमिका मूल्य संघर्ष, वैचारिक मतभेद आणि संहितेमधील मूळ भूमिका समजावून घेऊन पात्र साकार करण्याची अभ्यासू वृत्ती छानच. नृत्याचा प्रसंग हा त्यांच्या भूमिकेतील उत्कर्ष बिंदू ठरला. मयुर लाड यांचा आदर्श देखील छान रंगला होता. इतर सहा पात्रांनी देखील आपल्याला ज्या भूमिका दिल्या होत्या त्या व्यवस्थित रीत्या पार पाडल्या.

अमोल ताटे यांचे दिग्दर्शन चर्चा नाटयास साजेसे होते. किरण माने यांनी तालमीचा हॉल लेव्हल च्या माध्यमातून उभा केला होता. तीन-चतुर्थांश रंगमंचाचा भाग या हॉलने व्यापला होता आणि एक चतुर्थांश भागांमध्ये सर्व पात्र वावरत होती. त्यामुळे नेपथ्यामध्ये अधिक सुटसुटीतपणा पाहिजे होता असे वाटते.  श्याम चव्हाण यांनी या प्रयोगास साजेशी प्रकाश योजना केली. संहिता चर्चा प्रधान असल्यामुळे प्रकाश योजनेला मर्यादा होत्या. तरीदेखील नृत्य प्रसंग आणि शेवट प्रकाश योजनेमुळे अधिक गडद झाला.मनीष पवार यांचे संगीत संहितेसाठी पूरक होते.

मोस्ट वेलकम या चर्चानाट्यामध्ये धर्मचिकित्सा, समाज नियमन, अस्वस्थ वर्तमान यावरती परखड, रंगतदार चर्चा होते. ही चर्चा अभिवाचनामधून पण पोहोचवता येते. या प्रयोगमधून केवळ वाचिक अभिनय प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो आहे असाच काहीसा प्रत्यय आपणांस येतो. रंगतदार वाद निर्माण करून, चर्वितचर्वण करून  बुद्धिप्रामाण्यवादावरती प्रत्येक मूल्य तपासून पहायचे आणि वैचारिक संघर्ष निर्माण करत राहायचा, पण नाटक म्हणून काहीच घडणार नसेल तर प्रयोग काहीअंशी संथ होतो. प्रायोगिक रंगभूमीवर असे प्रयोग खूप वेळा केले जातात.  संवाद चटपटीत होतात पण घडत काहींच नाही. त्यामुळे मोस्ट वेलकम या प्रयोगामध्ये नाट्यमय घडामोडी, घटना, प्रसंगानुरूप पात्रांचा वापर दिसावा असे अपेक्षित होते. 

रंगमंचावरती सुरेख नेपथ्यरचना, प्रकाशयोजना आणि मुख्य म्हणजे दोन किंवा तीन पात्र एकाच प्रसंगाची विविध पद्धतीने तालीम करणार असतील,तर ते काहीवेळानंतर प्रेक्षकांसाठी असह्य होते. संपूर्ण प्रयोगामध्ये उरलेल्या सहा पात्रांचा वापर नाट्यमयरित्या झाला असता, तर प्रयोग अधिक प्रभावी झाला असता अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये रंगली होती.


© प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर
9421440940

Dr. Ganesh Mudegaonkar

Share