गोंधळात गोंधळ : रातमतरा

नाटक : रातमतरा
लेखक: भगवान हिरे
दिग्दर्शक: सुनील पाटेकर
प्रकाश योजना: प्रशांत सावंत
नेपथ्य: महेश दळवी
संगीत: रुपेश दुदम
संस्था: ललित कला भवन, चिंचपोकळी, मुंबई.

अनोळखी व्यक्ती, अनोळखी ठिकाणी, अचानक भेटल्यानंतर ज्या विविध गमतीजमती होतात त्या आपणास भगवान हिरे लिखित रातमतरा या नाट्य प्रयोगामधून पहायला मिळतात. लेखक भगवान हिरे यांनी संहिता लेखन व सादर होत असताना त्यांना नक्की काय सांगायचे आहे?  हे स्पष्ट होत नाही. त्यामुळे या प्रयोगामध्ये ही संहिता सादर करणारे कलावंत आपण प्रयोग सादर केला या भावनेने फक्त सुखावून जातात प्रेक्षकांचा मात्र गोंधळ उडतो की नक्की काय सुरू आहे? रातमतरा म्हणजे गोंधळ, बिलामत, संकट. रातमतरा हा शब्द दोन्ही बाजुंनी वाचला तरी उच्चार एकसारखा येतो.

तीन अनोळखी मित्र ( समेश रुद्रवार, सागर चारी , जय गायकवाड) रात्री एका आडवळणाच्या गावात बस स्टैंड वरती भेटतात. एकमेकांवर दोषारोप करतात. खुनाचा प्रयत्न करतात. अचानक नाचायला लागतात आणि शेवटी म्हणतात हा सर्व टाईमपास होता. यातच बस येथे निघून जाते. इथे पहिला अंक समाप्त. यानंतर तेथे तात्या ही व्यक्ती त्यांना आपल्या शेतात घेऊन जाते. पाहुणचार  म्हणून मद्यपान व जेवण. मद्यपान करून स्वप्न पाहण्यास उद्युक्त करते. स्वप्नातील गोष्टी स्वप्नवतच राहतात पण त्यांचा अर्थबोध नक्की काय हे प्रश्नांकित राहते. वास्तवात तात्या देखील या तिघांना सोबत टाईमपास करत असतो. कारण त्यांची मुले त्याना सोडून गेलेली असतात. हे सर्व सादर होत असताना पण बऱ्याच गमतीजमती घडतात.  असो.

समेश रुद्रवर याने साकारलेली प्रवासी एक ही भूमिका योग्यरीत्या साकारली. सागर चारी , जय गायकवाड आणि सुनील पाटेकर यांनी आपापल्या भूमिका मद्यपान करून आणि  विविध गाण्यांवर नृत्य करून अभिनयाची हौस भागवली असे म्हणता येईल.

महेश दळवी  यांनी नेपथ्या मध्ये पहिल्या अंकात बस स्टॅन्ड आणि दुसऱ्या अंकामध्ये झोपडी उभी केली होती. रुपेश दुदम आणि संदीप परब यांनी धडाकेबाज गाणी दणकेबाज वाजवली. प्रयोगात संगीत जोरदार वाजत होते. मस्तपैकी नाचावे वाटली कि झिंग झिंग झिंगाट पासून कुठेही गाणे अभिनेत्यांसाठी उपलब्ध असे. प्रकाश सावंत व संतोष शितप यांच्या प्रकाश योजनेमध्ये सुरुवातीपासून शेवटपर्यंत सुरू असणारे 3 लाल रंगांचे स्पॉट्स सतत का सुरू होते? हा प्रश्नच कायम राहतो. लेखकाला, दिग्दर्शकाला आणि कलावंतांना नक्की या प्रयोगामधून नक्की काय अभिप्रेत होते हे शेवटपर्यंत समजत नाही.

अंतिम फेरीमध्ये जेव्हा असे काही प्रयोग तेव्हा दोन प्रश्न पडतात.  एखाद्या चांगल्या संहितेची गळचेपी करून यांना याठिकाणी संधी तर मिळाली नाही?  हौस भागवणे ही पातळी सोडून आपण नाट्य चळवळ अधिक समृद्ध करण्यासाठी आपलं योगदान कधी देणार?   जर आपला संघ अंतिम फेरीमध्ये आपलं नाटक सादर करणार आहे म्हटल्यानंतर, प्रयोग म्हणून आवश्यक असणाऱ्या सर्व बाबींवरती खूप काळजीपूर्वक काम करावे लागते असे वाटते.  अन्यथा प्रेक्षकांच्या प्रयोगगणिक वाढलेल्या अपेक्षा पूर्ण होताना दिसत नाहीत. अन्यथा प्रेक्षकांच्या प्रतिक्रियानुसार रातमतरा हा नाट्यप्रयोग खूप छान टाईमपास होता.

प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर
9421440940

Dr. Ganesh Mudegaonkar

Share