नाटक : तुझ्यात जीव रंगला
लेखक: केदार देसाई
दिग्दर्शक: केदार देसाई
प्रकाश योजना: केतन वाघ
नेपथ्य: चंदन दळवी
संगीत: शंकर तेजम
संस्था: कामगार कल्याण केंद्र, सावंतवाडी
बदलत्या जीवन शैलीमध्ये प्रसार माध्यमांचे महत्त्व खूपच वाढले. काळ बदलला प्रसार माध्यमं बदलली. टी.व्ही. उच्चभ्रू दिवाणखान्याची शान झाला. किचनमध्ये झालेला त्याचा शिरकाव, थेट बेडरूम पर्यंत येऊन पोहोचला तो ही कॅमेऱ्यासहित. टी.व्ही.च गारुड सर्वच वयोगटातील व्यक्तींवर दिसून येत. मध्यमवर्ग आणि निम्न मध्यमवर्ग यांच्या अभिरुचीचा व भावविश्वाचा तर टी. व्ही. अविभाज्य घटक झाला. प्राइम टाइमच हे गणित धूर्त विक्रेत्यांनी ओळखलं. माध्यमांनी आभासी स्वप्न विकायला सुरुवात केली. सत्य आणि आभासमयसत्य यातील भेद रियालिटी शोच्या माध्यमातून संपवून टाकला. सर्वसामान्य कुटूंब आणि सुज्ञ व्यक्तींनी यासाठी किंमत चुकवली नातेसंबंधांची. प्रत्येक नातं स्वार्थी, सर्व स्त्री जात कुटील व कारस्थानी. स्वत्व गमावलेले पुरुष. अनैतिक संबंध आणि त्यांचे उदात्तीकरण. हीन दर्जाची अभिरुची विकसित करून वास्तव, अभिजात कलाकृती आणि कसदार साहित्याची गळचेपी सुरू झाली. केवळ पैसा आणि टी.आर.पी. वरती सगळी गणितं येऊन थांबली. या परिस्थीतीचा तिरपा छेद घेणारी आणि आपला जीव रंगवून ठेवणारी तुझ्यात जीव रंगला ही नाट्य कृती.
मीच माझी स्वामिनी या मालिकेमधील राधिका म्हणजेच वास्तवातील प्रिया (अस्मिता खटखटे) सोज्वळ, सुसंस्कृत, उद्योजक आणि बरेच काही असे अष्टपैलू आभासी व्यक्तीमत्व. याच मालिकेमध्ये आभास आणि शशांक या दोघांसोबत राधिका लग्न करणार का? ही उत्सुकता ताणलेली. मोहन हा राधिकाचा मालिकेमधील नवरा. तरीही राधिका बॉस आणि सहकारी यांच्या मोहपाशामध्ये गुंतलेली. राधिकाच्या जीवनामध्ये घडणारी प्रत्येक गोष्ट सीमा ( दीपाली जाधव) साठी अनुकरणीय. विविध सण, घराचं फर्निचर, पडदे, साड्या, मेकअप व केशरचना या सर्वांवरती फक्त राधिका चा प्रभाव. या थूकरट मालिकांचा किती खोलवर परिणाम जनमानसावर झालेला असतो ते आपणास सीमामुळे उमजते. राधिकाच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सीमाच्या आयुष्यात घडत असते किंवा ती घडवून आणत असते. सीमा आणि संजय यांचा 19 वर्षांचा संसार. संजय सीमाच्या या राधिकाच्या आहारी जाण्याणे कंटाळलेले असतो. संजय हे सर्व असह्य होऊन अभिनेत्री राधिका म्हणजेच प्रिया पंडितच्या फ्लॅट वरती तिला जाब विचारण्यासाठी जातो. प्रिया आपले या भूमिकेबद्दल स्पष्टीकरण देते. मालिकेमध्ये पुढे काय घडणार? या शेवटावरती माझा संसार अवलंबून आहे. शशांक , आभास, मोहन नक्की कोण? मला सांगा शेवट सांगा असा आग्रह संजय प्रियाजवळ धरतो. बंदुकीच्या दहशतीमुळे प्रिया दिग्दर्शक आणि लेखक यांना फोन करते. दोघेही मालिकेचा शेवट सांगण्यास असमर्थता दर्शवितात. संजय चा राग अनावर होतो. संजय प्रियाला संपवण्याचा प्रयत्न करतो.
प्रिया हुशारीने आपली सुटका करून घेते. याचवेळी अनावधानाने पत्ता शोधत सीमा प्रियाच्या फ्लॅट वरती येते. सीमा राधिकाला म्हणजेच प्रियाला पाहून हुरळून जाते, खुश होते. परंतु समोर येते विदारक सत्य. प्रिया पंडितचं वास्तवातील जगणं, तिचं वागणं हे राधिका या भूमिकेशी पूर्ण विसंगत असतं. सीमाच्या मनातील राधिकाच्या प्रतिमेस तडा जातो. सीमाचे राधिकाबद्दल असणारे सर्व पाश गळून पडतात. प्रियाने मात्र हे सर्व आपल्या मोबाईलमध्ये चित्रित केलेले असते . यातून सुरू होतो प्रियाचा नवीन मालिकेतील प्रवास नायिका ते खलनायिका..म्हणून...!!
सुसंस्कृत माणूस जेव्हा विचारपूर्वक शस्त्र हातामध्ये घेतो तेव्हा व्यवस्थेने सावध होणे गरजेचे असते. बहुसांस्कृतिक, अतिउत्सवी व सांस्कृतिक आक्रमणामुळे नवीन पिढी गोंधळून गेली आहे. मोबाईला रेंज नसणे, इंटरनेट डेटा संपणे आणि केबलची लाईट जाणे यामुळेच आजची पिढी गुदमरते. वास्तव प्रसंगांच्या माध्यमातून लेखक केदार देसाई यांनी तुझ्यात जीव रंगला हा प्रयोग आपल्या कसदार संहितेमधून यशस्वीरित्या रसिकपर्यंत पोहोचवला.
सुसंस्कृत संजय हे पात्र केदार देसाई यांनी सुरेख रित्या रंगवले. प्रसंगी वेंधळा, प्रेमळ आणि मालिका विश्वावरती सूड उगवण्यासाठी उद्युक्त झालेला संजय प्रेक्षकांपर्यंत व्यवस्थित रित्या पोहोचतो. प्रिया पंडित तथा राधिका, कमी वेळात अधिक यश मिळवणारी अभिनेत्री आणि विविध पैलूं अस्मिता खटखटे यांनी प्रिया पंडित छान रंगवली. दीपाली जाधव यांनी सीमा ची भूमिका मात्र अक्षरशः जगली होती. मालिकेमध्ये गुरफटलेली, रिपीट टेलिकास्ट पाहणारी, राधिकाच्या प्रतिमेमध्ये स्वत्व शोधणारी, आभास आणि सत्य यात गोंधळून गेलेली सीमा प्रयोगामधे भाव खाऊन गेली. कपडे घडी घालण्याचा प्रसंग, टीव्हीसमोर बसून खाण्याचा प्रसंग, गिफ्ट देण्याचा प्रसंग यामधून दिग्दर्शक आणि कलावंत यांची केमिस्ट्री छान रित्या दिसून आली.
केवळ पडद्यांच्या व लेव्हलच्या आधारे रंगमंचाचे दोन भाग करून सीमा चे घर आणि प्रिया पंडित चा फ्लॅट आपणासमोर उभा राहतो. प्रियाच्या फ्लॅट मध्ये असणारे राधिका या भूमिकेचे तैलचित्र हा चंदन दळवी यांच्या नेपथ्याचा गाभा होता. नेपथ्यामध्ये आणखी विविधता दाखवता आली असती असे वाटते. विविध मालिकांची टायटल सॉंग, जाहिराती, प्रसंगांची उत्कंठा वाढवणारे शंकर तेजम यांचे संगीत प्रयोगासाठी पूरक होते. आवश्यक त्या ठिकाणी वेशभूषेमधे केलेला बदल हा प्रयोगास साजेसा होता.
चटपटीत संवाद, रंगतदार सादरीकरण, कलावंतांची भूमिकांची समज आणि अस्वस्थ वर्तमान यावरती तिरकस पद्धतीने केदार देसाई यांनी ओढलेला हा ओरखडा आपणास समाजव्यवस्थेची घुसमट दाखवतो. चोवीस तासच्या नावाखाली अखंड मनोरंजनाचा रतीब घालणारी आणि तद्दन बाजारी प्रसार माध्यमांचा तिरपा छेद लेखकाने घेतला आहे. तुझ्यात जीव रंगला या संहितेच्या माध्यमातून स्पर्धेमध्ये आणखी एक कसदार संहिता, उत्तम सादरीकरण आणि दमदार प्रयोग प्रेक्षकांना पाहायला मिळाल्याचे समाधान व्यक्त होत होते.
© प्रा.डॉ.गणेश मुडेगावकर
9421440940
Dr.Ganesh Mudegaonkar
Share
No comments:
Post a Comment