पुरुष, स्त्री, समाज की माणूस ? : अनिमा
नाटक : अनिमा
लेखक: डॉ. संजीव शेंडे
दिग्दर्शक: देवेंद्र सावंत
प्रकाश योजना: प्रशांत सावंत
नेपथ्य: जनार्धन जंगम
संगीत: दिनेश धुरी
संस्था: कामगार कल्याण भवन, अभुद्यनगर, मुंबई
व्यक्ती स्वातंत्र्याची संकल्पना ही व्यक्तिसापेक्ष आहे. व्यक्ती स्वातंत्र्याची जेव्हा गळचेपी होते तेव्हा त्या विरुद्ध पुकारले जाते बंड , उभा केला जातो एक लढा. हे बंड कधी घरच्यांच्या विरोधात असते, कधी जातिव्यवस्थेच्या, तर कधी संपूर्ण समाजव्यवस्थेच्या विरोधात. या लढ्याची परिणीती नक्की काय असेल हे त्या व्यक्तीस देखील माहीत असते. व्यक्ती स्वातंत्र्यासाठी केलेले बंड, उभा केलेला लढा काळाच्या कसोटीवर यशस्वी की अयशस्वी म्हणून तपासला जातो. लढा जिंकणे किंवा हरणे हे दूर , पण ती व्यक्ती आणि तिने केलेला दीर्घ संघर्ष कायम स्मरणात राहतो. आपण प्रसंगानुरूप एका पुरूषांमधील स्त्री आणि एका स्त्रीमधील पुरुषार्थ समाजामध्ये वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये अनुभवतो. स्त्री पुरुष मनांचा संघर्ष पती-पत्नीच्या नात्यात आला तर? प्रत्येक पुरुषाच्या अंतरंगात खोलवर रुजलेले असते स्त्रीत्व त्यास अनिमा तत्व म्हणतात. हे अनिमा तत्व जर एखाद्या पुरुषांने स्वीकारले तर?
दिया (सोनल आजगावकर) व अध्ययन (मंगेश शेटे) सुखवस्तू दाम्पत्य. अध्ययन रोबोटिक इंजिनीअर दिया वर्किंग वूमन. काही दिवसांमध्ये दिया आई होणार असते.अध्ययन ही बातमी ऐकून खुश होतो. पण अध्ययनच्या वागण्यामध्ये कळत नकळत काही बदल दिसून येतात. विहान (आबा नाईक) हा अध्ययन चा मोठा भाऊ. या सर्व घटनांचा साक्षिदार.
दिया एके दिवशी एक सुंदर अशी बाहुली घरामध्ये घेऊन येते. इथूनच अध्ययनच्या वागण्यामध्ये फरक पडतो. अध्ययन त्या बाहुलीची खूप काळजी घेत असतो. दियाला सर्वप्रथम ही बाब नॉर्मल वाटते परंतु पुढे मात्र अध्ययन बाहुलीला बाळा प्रमाणे वागणूक देतो. अध्ययनचे हे वागणे दिया विहानजवळ बोलून दाखवते आणि उलगडते एक नवीन रहस्य.
विहान याबाबतीत बोलण्यासाठी अध्ययन कडे येतो. अध्ययन नवरंग चित्रपटातील चल जा रे हट नटखट या गाण्यावर ती नृत्य करत असतो. स्त्री आणि पुरुष या दोन्ही पात्रांची जुगलबंदी अध्ययनने नृत्यातून छान रंगवलेली असते. विहान समोरच तो स्वतःचं बाळ समजून बाहुलीची काळजी घेत असतो. याच वेळी दिया तेथे येते. दियाला हे सर्व पाहून धक्का बसतो. विहान सांगतो अध्याय लहान असल्यापासून त्याच्यामध्ये हा बदल आम्हाला जाणवत होता. आईने हळदी कुंकुवाच्या निमित्ताने अध्ययनला फ्रॉक घातला होता. अध्ययनला हे स्त्रीरूप खूप आवडते. त्यातील ही मानसिक विकृती वय वाढेल तशी वाढत जाते. पण मानसशास्त्रीय उपचारामूळे तो व्यवस्थित होतो. शिक्षण पूर्ण करतो लग्न देखील करतो. दिया प्रेग्नेंट आहे हे ऐकल्यानंतर
अध्ययन मधील स्त्री तत्व पुरुष तत्वावर मात करते त्याला स्त्री सारखच जगावसं वाटत.अनिमा तत्व अध्ययन अशा मनावरती स्वार होते.
दिया यातून सावरायचे ठरवते.घरातील सर्व स्त्री विषयक वस्तू आश्रमास दान करून टाकते. विहान देखील अध्ययनला मानसशास्त्रीय उपचाराच्या मदतीने या मानसिक विकृती पासून दूर करण्याचा प्रयत्न करत असतो. अध्ययन मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेण्यास तयार नसतो. अध्ययनची ही विकृती वाढत जाते. दिया शेवटी कंटाळून घर सोडून जाण्यास तयार होते. अध्ययन देखील आत्महत्या करण्याची धमकी देतो. अंतिमतः या निष्कर्षाप्रत पोहोचतात की हे जग केवळ स्त्री आणि पुरुषांचे आहे, यात माणूस म्हणून जगण्याचा स्वतंत्र लढा उभारावा लागणार आहे.
मंगेश शेटे यांनी अध्ययन ही भूमिका छान साकारली. या भूमिकेतील सर्वात मोठा बदल म्हणजे स्त्री वेशातील रुपांतरण. मंगेश शेटे यांनी पुरुष आणि स्त्री त्यांच्या वागण्यातील बदल मुखवट्या सह केलेले नृत्य सुरेख रित्या साकारले.
सोनल आजगावकर यांची दिया देखील कणखर होती. प्रसंगी जाब विचारणारी होती. काही प्रसंगांमध्ये दिया घरातील पुरूषार्थ सिद्ध करणारी स्त्री आपल्यापर्यंत पोहोचते. संयमित,समजूतदार मानसशास्त्रज्ञ असा आबा नाईक यांनी साकारलेला विहान देखील छान रित्यासाकार झाला.
दिग्दर्शना मध्ये अध्ययन या भूमिकेवरती आणखी मेहनत घेणे आवश्यक होते असे वाटते. दुसऱ्या अंकामध्ये अध्ययन या पात्राचा स्त्री तत्वाकडे असणारी ओढ व रूपांतरण केवळ चर्चेतून ना रंगवता अभिनित होणे गरजेचे होते. संहितेमध्ये न लिहिलेल्या बाबी शोधून आपले कौशल्य पणाला लावणे गरजेचे होते असें वाटते.
नेपथ्यामध्ये जनार्दन जंगम यांनी मानसशास्त्रीय प्रतिमा, मुखवटे, मानवी मेंदूचे रेखाचित्र या निवडलेल्या प्रतिमाआशय सुसंगत. वडिलांनी घेतलेले बाळाचे कॅलेंडर या बाबी प्रयोगाशी एकरूप होऊन गेल्या.
वेशभूषामधील बदल सर्वच पात्रांनी सुरेखा सांभाळतो संहितेचा मूळ गाभा ओळखून दिनेश धुरी यांनी पार्श्वसंगीत यामध्ये वापरलेल्या सर्वच सुरावटी प्रयोगास आशयघन करणाऱ्या होती.
या प्रयोगात पहिल्या अंकातील गती, विविधता दुसऱ्या अंकात मंदावली. केवळ चर्चा व दोषरोप यामध्ये दुसरा अंक संपतो. त्यामूळे दुसरा अंक सादर झाला, पण उत्कंठावर्धक झाला नाही.
दोन अंकी नाटकात मध्ये पहिला अंक बऱ्याच वेळा खूप छान रीतीने पोहोचतो. खरी कसोटी दुसऱ्या अंकात असते. पहिला अंक ज्या उत्कर्ष
बिंदूवरती थांबवला आहे त्या पातळीपासून पुढे दुसरा अंक असावा लागतो. याची काळजी जर घेतली गेली नाही तर नाटक एकसुरी होऊन संपते.
वेगळा विषय, नेमकेपणाने सादरीकरण आणि स्त्री पुरुष भावनांचे आशयपूरक सादरीकरण अनिमच्या निमित्ताने पहावयास मिळाले.
प्रा डॉ गणेश मुडेगावकर
9421440940
Dr.Ganesh Mudegaonkar
Share
No comments:
Post a Comment