मुंग्यांच अस्तित्व सिद्ध करणारं : वारूळ


नाटक : वारूळ
लेखक: राजेंद्र पोळ
दिग्दर्शक: विक्रम गवांदे
प्रकाश योजना: विजय रावळ
नेपथ्य: अंकिता मुसळे
संगीत: संदीप महाजन
संस्था: कामगार कल्याण केंद्र, सिन्नर, नाशिक

वारूळ मुंग्यांच की नागाच ? वारूळ मेहनतीने तयार करतात मुंग्या. वारुळाची रचना देखील तेवढीच भक्कम. पण मुंग्याच्या अस्तित्वावर नाग जेंव्हा हल्ला करतो तेंव्हा एकजुटीने नागाचा हल्ला मुंग्या परतवून लावतात.एखादया व्यक्तीचे अस्तित्व केवळ स्वार्थासाठी नाकारलं जात तेंव्हा ती व्यक्ती अत्यंत धैर्याने आपले अस्तित्व टिकवते आणि सिद्ध देखील करते. 

राणी (स्वराली गर्गे) आणि मुंगा (विक्रम गवांदे) यांचे देखील आहे एक स्वतंत्र वारुळ. राणी वरती चार वर्षांपूर्वी अत्याचार होतो. या दुष्कर्मामुळे राणी पुरुष जातीवरचा राग व्यक्त करण्यासाठी शरीर धर्माच्या व्यवसायात उतरते.  मुंगा हा तिचा पती मुंगाची स्वतःची स्वतंत्र जीवनशैली आहे. मुंगा हा जरी सर्व वाईट व्यवसायांमध्ये गुंतलेला असला तरीदेखील अत्यंत इमानदारीने काम करत असतो.  हत्ती आणि मुंगी यांचे वैर सर्वश्रुत आहे.  राणी हत्ती म्हणजे सावज शोधते आणि मुंगाच्या मदतीने त्या हत्तीचा काटा देखील काटा काढते. डॉक्टर काल्या (सुनील दवांगे) हा त्यांचा हत्ती. डॉ काल्या आपल्या  वैद्यकीय व्यवसायाच्या जोरावर वाममार्गाने अमाप संपत्ती गोळा करू इच्छित असतो.  यासाठी आमदार काळे यांची सर्वार्थाने तो मदत करतो.  काळे हे विरोधी पक्षातील अपक्ष आमदार.  काळे यांचे गुरु थोर समाजसेवक वडकर. आमदार काळे यांच्या सांगण्यावरून वडकर उपोषणास बसतात. या उपोषणाच्या स्थळी बॉम्बस्फोट होतो आणि वडकर यांची हत्या होते. या गोष्टीचे भांडवल करून आमदार काळे थेट महसूल मंत्री होतात. परंतु राज्याचे गृहमंत्री, राणी आणि मुंगा यांच्या मदतीने आमदार काळे यांचे अस्तित्व संपवतात. डॉक्टर काल्या या सर्वाचा मास्टरमाइंड असतो. तो राणी आणि मुंगा यांना संपवण्याचा प्रयत्न करतो. राणी व मुंगा आपल्या कौशल्याने डॉक्टरला संपवतात. राणीने प्रत्येकाची एक्झिट ठरवलेली असते. शेवटी वारुळावर ते सिद्ध करतात आपले अस्तित्व.

स्वराली गर्गे यांनी रंगवलेली राणीची भूमिका वारूळ या नाटकाची जमेची बाजू.  वेश्या, धूर्त, कट-कारस्थाने रचणारी,  नाटकावर  प्रेम करणारी आणि मुंगा वरती जीव ओवाळून टाकणारी,  आपल्या बुद्धिचातुर्याने अस्तित्व सिद्ध करणारी वारुळाची राणी अश्या विविधांगी रूपामध्ये आपणास या प्रयोगातून पहावयास मिळाली. 
मुंगा या भूमिकेमध्ये विक्रम गवांदे यांनी जी विविधता दाखवली ती वाखाणण्याजोगी होती. मुंगाच्या लकबी, हसण्याची विशिष्ट पद्धत, बोलीभाषा यावरती विक्रम गवांदे यांनी विशेष मेहनत घेतलेली दिसून येते. मुंगा हा संमोहन शास्त्राचा विद्यार्थी.  अवैध धंदे सुद्धा पवित्र आणि प्रामाणिकपणे करणारा,  राणीच्या प्रत्येक कारस्थानामध्ये जीवाची पर्वा न करता साथ देणारा मुंगा भाव खाऊन जातो. डॉक्टरची भूमिका करणारे सुनील दवंगे यांनी आपल्या भूमिकेस योग्य न्याय दिला.

दिग्दर्शक म्हणून विक्रम गवांदे यांनी अनाथ मुल दहा ते अकरा वर्षांच्या मुलगा आणि तरुण मुलगा व थेट आपल्यासमोर येतो मुंगा ही स्थित्यंतरे सुरेख रित्या दाखवली.  प्रत्येक भूमिकेचा चढता आलेख त्यांनी कायम ठेवला.
फोन वरती होणारे संभाषण थोडे कमी करता आले असते तर नाटकअधिक गतिमान झाले असते.  नेपथ्यामध्ये अंकिता मुसळे  यांनी उभे केलेले डॉक्टर चे घर,  हॉस्पिटलला जोडणारा दरवाजा, गॅलरी, प्रवेशद्वार व रंगमंच व्यवस्था प्रयोगास पूरक होती. विजय रावळ यांनी प्रकाश योजनेच्या माध्यमातून पोपट मारण्याचे, फोटो काढण्याचे दृश्य, राणीचे स्वगत आणि डॉक्टर काल्‍या यांचा शेवट गडद पणे दाखवला.

संदीप महाजन यांनी पार्श्वसंगीतामध्ये टाइमिंग सुरेख रित्या सांभाळले. प्रयोगांमध्ये वीस ते पंचवीस वेळा रिंग वाजते. यासाठी चे टाइमिंग त्यांनी व्यवस्थितरीत्या सांभाळले. प्रसंगांना पूरक संगीत प्रयोगास यशस्वी करण्यासाठी महत्वाचे ठरले.  सोनाली गर्गे यांची वेशभूषा प्रत्येक पात्राची विचारसरणी आणि व्यवसाय स्पष्ट करणारी होती. राणी, मुंग्या आणि डॉक्टर यांच्या वेशभूषा त्यांच्या भूमिकेत अनुसरुन होत्या. या प्रयोगास अधिक गतिमान केल्यास प्रयोग अधिक यशस्वी झाला असता अशी प्रतिक्रिया काही प्रेक्षकांनी दिली.

प्रा.डॉ. गणेश मुडेगावकर
9421440940
Dr. Ganesh Mudegaonkar

Share