हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ : वास्तवातील भ्रमाचा खेळ

नाटक : हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ
लेखक: वर्धन कामत (अनुवादक)
दिग्दर्शक: अनिरुद्ध दांडेकर
प्रकाश योजना: आशिष भागवत
नेपथ्य:  तुषार कुडाळकर
संगीत: प्रवीण लायकर
संस्था: कामगार कल्याण केंद्र, सागरमाळ, कोल्हापूर


अमेरिकन नाटककार एडवर्ड एलबी यांच्या हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ हे साठच्या दशकात गाजलेले इंग्रजी नाटक. दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी, व्हर्जिनिया वूल्फ यांच्या लेखनामधून मॉडर्न तथा अस्वस्थ वर्तमान व वास्तववादी लेखनप्रकार अस्तित्वात आला. प्रशांत दळवी यांची
ध्यानीमनी ही कलाकृती  हू इज अफ्रेड ऑफ व्हर्जिनिया वूल्फ या कलाकृती पासून प्रेरित आहे असे म्हणतात. प्रेरित होऊन मराठी रंगभूमी समृद्ध करणारी नटसम्राट ही आणखी एक अजरामर कलाकृती.

प्रत्येक व्यक्तीचा एक भ्रम असतो मी खूप हुशार आहे, सुंदर आहे, असे काहीही..!! आणि हा भ्रमाचा भोपळा जर फुटला तर वास्तवात व्यक्ती सावरतो अथवा कोसळतो. वास्तव आणि प्रेम, कमतरता आणि श्रेष्ठता हा पाठशिवणीचा खेळ. या  खेळातून मनःपटलावर ओढले जाणारे ओरखडे, उणिवांचा चर्चात्मक पट आपणा समोर मांडला जातो नाट्य प्रयोगातून पाहायला मिळतो. 


जॉर्ज (अनिरुद्ध दांडेकर) इतिहासाचा प्राध्यापक मार्था (कादंबरी माळी) ही त्याची पत्नी. मार्था चे वडील विद्यापीठाच्या प्रमुख पदावर ते कार्यरत. कळत नकळत मार्था या गोष्टीचा गैरफायदा घेत असते. जॉर्ज आणि मार्था घरी येणाऱ्या प्रत्येक पाहुण्या सोबत वेगळ्या पद्धतीचे खेळ खेळत असतात. वास्तव आणि भ्रम यातील भेद केंव्हा पुसला जातो हे समजेपर्यंत बराच काळ या खेळामध्ये निघून गेलेला असतो. 
एके रात्री दोन वाजता निक (पराग फडके) आणि हनी (संजना खंजिरे) मार्थाच्या निमंत्रणावरून  वरून घरी येतात. जॉर्ज यामुळे अस्वस्थ होतो. सुरु होतो खेळ  हुमिलिएट दि होस्ट, अबाऊट माय फर्स्ट नोवेल, मूल, प्रेग्नसी आणि असण्या नसण्याचा लपंडाव. भूत आणि वर्तमान यावरती ओरखडे ओढणारे हे जीवघेणे खेळ निक आणि हनी यांना अस्वस्थ करतात. मार्था आणि जॉर्ज  एकमेकांच्या कमतरतेवरून पाहुण्यांसमोर भांडतात, यात होणारे टोकाचे मतभेद आणि कालांतराने याच भांडणाचा भाग होत जाणारे निक आणि हनी. या पाठशिवणीचा खेळामध्ये उलगडत जातात काही रहस्य, सत्य घटना आणि क्षीण होत जातात सत्याशी भिडण्याच्या क्षमता. ही पात्र वास्तवात येत असताना सावरतात की कोसळतात, भ्रम कसे दूर होतात? हे उलगडते या नाट्य प्रयोगमधून.

अनिरुद्ध दांडेकर यांनी साकारलेली जॉर्जची भूमिका,समज, टाइमिंग समर्पक होते. नाटक त्यांनी बांधून ठेवले. सहजसुंदर अभिनय आणि अभिनयाचा आविर्भाव यामध्ये कादंबरी माळी यांचा मात्र गोंधळ उडालेला दिसून आला.
पराग फडके यांनी जीवशास्त्राच्या प्राध्यापक समजून-उमजून रंगवला. हनी या भूमिकेस जास्त वाव नसल्यामुळे संजना खंजिरे यांनी साकारलेली हनी ही भूमिका नाटकास साजेशी होती. दोन ते अडीच तासांच्या कालावधीमध्ये दहा ते बारा पेग घेऊन सुद्धा पात्रांची देहबोली बदलली नव्हती ही बाब खटकणारी होती.  अनिरुद्ध दांडेकरांनी दिग्दर्शनामध्ये या बाबींवर मेहनत घेणे अपेक्षित होते.

अभिजात कलाकृती मूळ रूपातून विविध भाषांमध्ये  अनुवादित केली जाते तेव्हा तो भावानुवाद मूळ कालाकृतीस न्याय देणारा असावा असे अपेक्षित असते. अन्यथा कलाकृतीचे गहनता व आत्मा हरवून जातो. नेमकी हीच बाब या नाटकाच्या बाबतीत दिसून आली. मराठी नाटकामध्ये इंग्रजीचा वारेमाप वापर ही बाब अनुवादित करताना लक्षात घेणे गरजेचे होते. पात्रांचा सुसंवाद कमी आणि भांडणं जास्त यामध्ये पहिला अंक ठीक झाला. परंतु दुसऱ्या अंकामध्ये मात्र नाटक रंगले नाही. नाटकाचा उत्कर्षबिंदू गाठत असताना एकत्रित बसून पात्रांनी नेमके काय साधले हे प्रेक्षकांपर्यंत पोहोचले नाही.

आवश्यक त्या ठिकाणी प्रवीण लायकर यांचे संगीत आणि अशिष भागवत यांची प्रकाश योजना पूरक होती. माधुरी फाटक यांनी वेशभूषेवरती घेतलेली मेहनत दिसून येत होती.  तुषार कुडाळकर यांचे नेपथ्य मात्र अप्रतिम होते. साठच्या दशकातील काळ त्यांनी पेंटिंग , ग्रामोफोन, बुकशेल्फ या माध्यमातून व्यवस्थितरीत्या उभा केला होता. स्पर्धेतील एक चांगला प्रयोग पूर्ण होता होता राहिला याची खंत सर्व रसिक प्रेक्षकांना नक्कीच राहील.

© प्रा. डॉ. गणेश मुडेगावकर
9421440940

Dr Ganesh Mudegaonkar

Share