पालकांची मेडिकल आणि जेईईची "नीट" तयारी..!!
© प्रा.डॉ. गणेश अ. मुडेगावकर

"केवळ एक परीक्षा जर भविष्य बदलणार असेल तर आपणच त्या परीक्षेचे "भविष्य" बदलू..!!"

10 ची परीक्षा दिलेल्या अथवा पास झालेल्या प्रत्येक पालकांना पडलेले अनेक प्रश्न?
  • दहावी बोर्ड चा निकाल लागला की पुढे काय?
  • कोणती शाखा निवडायची?
  • विज्ञान शाखा निवडली तर मग विविध स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करणार?
  • त्यात अधिक गोंधळात टाकणाऱ्या असंख्य कॉलेज आणि कलासेस च्या जाहिराती.
  • काय निर्णय घेणार? यात बऱ्याचवेळा ज्या विद्यार्थ्याला यास सामोरे जायचे आहे तो मात्र तटस्थ वा दुर्लक्षित.
  • कशी करावयाची तयारी नीट आणि जे ई ई ची?
  • खरे तर यासाठी अगोदर पालकाची "नीट"आणि "जे ई ई" तयारी आवश्यक आहे.
सर्वप्रथम आपले अभिनंदन...!!
विद्यार्थ्यांनो आणि पालकांनो...!!

# दहावी निकाल अत्यंत महत्त्वाचे आकलन: 
माध्यमिक शालांत परीक्षा ( SSC) अर्थात
आपल्या हाती आलेल्या निकाल हा केवळ पाच विषयांचा आहे. म्हणजे बेस्ट ऑफ फाईव्ह.
आपल्या विद्यार्थ्याला 600 पैकी नक्की किती गुण प्राप्त झाले आहेत हे नक्की पहा. 
त्यातील प्रत्येक विषयाचे 20 गुण हे प्रात्यक्षिक / किंवा ग्रेस मार्क म्हणून बऱ्याच वेळा दिलेले असतात. त्यामुळे (600 गुण वजा 120 गुण= 480) आपली टक्केवारी ही यावरती ठरते. 

पालकहो ही टक्केवारी नक्की काढा.. आणि गुण किती आणि नक्की टक्केवारी किती तपासून पहा.
विज्ञान शाखा निवडायची असेल तर विज्ञान आणि गणित या विषयांचे नक्की गुण पहा.

◆काय आहे नीट आणि जे ई ई परीक्षा ?◆
वैद्यकीय विद्याशाखेच्या (मेडिकल) (एमबीबीएस व बी डी एस) प्रवेशासाठी "नीट" (NEET) परीक्षा, ही प्रवेश परीक्षा राष्ट्रीय स्तरावर घेतली जाते. या साठी बायोलॉजी ग्रुप निवडावा लागतो. तर अभियांत्रिकी विद्याशाखेच्या (इंजिनियरिंग)  प्रवेशासाठी तथा भारतातील नामांकित आय आय टी कॉलेज मध्ये प्रवेश घेण्यासाठी आणि महाराष्ट्रातील काही नामांकित महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्यासाठी गरजेची असणारी राष्ट्रीय पातळीवर असणारी परीक्षा म्हणजे आय आय टी- जे ई ई प्रवेश परीक्षा.
या सोबतच महाराष्ट्र शासन राज्य स्तरावर दोन्ही अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी "राज्य स्तरीय प्रवेश परीक्षा" (MH-CET) घेते.
कालानुरूप परिक्षा पद्धतीमध्ये अमुलाग्र बदल होत गेले परंतू आपण मात्र या पासून अनभिज्ञ. खरेतर याची काळजी 3 ते 4 वर्ष अगोदर पासून घेणे गरजेचे ठरते कारण परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय पातळीवर स्पर्धा करावी लागते.

◆पूर्वतयारी◆
या परीक्षांच्या तयारीसाठी खरेतर इयत्ता 8 वी पासूनच सुरुवात केली पाहिजे. म्हणजेच पूर्वतयारी साठी किमान 3 वर्ष (इयत्ता 8,9 & 10) आणि मुख्य तयारीसाठी 11वी व 12वी. केवळ 2 वर्षातच तयारी करावयाची असेल तर विद्यार्थ्यांना खुपच परिश्रम  घ्यावे लागतात.

◆विद्यार्थ्याची इच्छा/आवड◆
या सर्व प्रक्रियेमध्ये स्वयंप्रेरीत विद्यार्थी असणे गरजेचे असते.अथवा केवळ पालकांनी लादलेल्या अपेक्षेच्या ओझ्याखाली विदयार्थी दबून जातो.
यासोबतच आणखी एक चिंतेची बाब म्हणजे दहावीच्या गुणांचा फुगवटा. या गुणांमधून विद्यार्थी आणि पालक बाहेरच येत नाहीत.

◆पालकांचे ज्ञान/अज्ञान◆
पालकांना अचानकच 11 वी मध्ये पाल्याने प्रवेश घेतला की मुलगा "डॉक्टर" किंवा "इंजिनियर" झाल्याचे स्वप्न पडू लागते. पण याची पूर्वतयारी 5 वर्षांपूर्वी करावी लागते याची पुसटशी कल्पनाही पालकांना नसते. यालाही काही अपवाद असतातच.
सर्वच विद्यार्थी व पालक एक विशिष्ठ विद्या शाखेला प्रवेश घेत आहेत, मग मी पण माझ्या पाल्याचा प्रवेश याच शाखेला घेणार. परंतु त्या शाखेची पूर्ण माहिती, उपलब्ध असणाऱ्या संधी आणि माझ्या पाल्याची इच्छा यांचा एकत्रित विचार करणे या ठिकाणी गरजेचे ठरते. अन्यथा केवळ प्रवाहसोबत गेल्यामुळे भविष्यात संकटांना सामोरे जावे लागते.

◆अभ्यासक्रम भेदभाव◆
या दोन्ही प्रवेश परीक्षा राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणार असल्या कारणाने (NCERT) एन. सी.ई. आर.टी.अभ्यासक्रम अभ्यासने गरजेचे असते. परंतु आपण प्रवेश घेतो राज्य स्तरावरील (HSC) अभ्यासक्रमासाठी आणि तयारी मात्र राष्ट्रीय पातळीवर परीक्षेची.त्यामुळे यादोन्ही मधील दरी कमी करून अधिकाधीक एन. सी.ई. आर.टी. अभ्यासक्रम अभ्यासने गरजेचे ठरते.

◆निवड कॉलेजची, क्लासची◆
विविध शहरांमध्ये या प्रवेश परीक्षांच्या तयारीसाठी असणाऱ्या कलाससेसचे अक्षरशः पीक आले आहे. बरं यामध्ये मार्केटिंग जास्त आणि शिकवणे कमी.
मुळातच "ही मंडळी म्हणजे स्वप्न विकायला बसलेली मंडळी..!!"
आणि "ते स्वप्न विकत घेण्यासाठी वाट्टेल ती किंमत मोजायला तयार असणारे पालक...!!"
त्यात आणखी एक कल्पना वा समज महाराष्ट्रातील एकजात शिक्षक या परीक्षेच्या अध्यापनासाठी "नालायक" आणि आंध्रप्रदेश,केरळ, कर्नाटक , राजस्थान( कोटा) हेच लोक काय ते लोक विद्वान.
परंतू यामध्ये आपल्या पाल्याची मातृभाषा, विद्यार्थ्यांनी इयत्ता 10 वी पर्यंत निवडलेले माध्यम व  अभ्यासक्रम , तसेच राज्य अभ्यासक्रम आणि राष्ट्रीय पातळीवर अभ्यासक्रमामधील तफावत यांचा एकत्रित विचार केला जात नाही हे दुर्देव.

◆दोन वर्षांचे नियोजन◆
पूर्व तयारी नसेल तर या दोन वर्षाचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करणे गरजेचे असते. यासाठी अध्ययन, अध्यापन, विविध प्रकारच्या परीक्षा आणि स्वयं अध्ययन याकडे लक्ष देणे आवश्यक ठरते. अन्यथा केवळ कॉलेज, क्लास आणि परीक्षा या मधेच विदयार्थी 2 वर्ष गुंतून पडलेला असतो. यामधून वेळकाढून स्वयं अध्ययनाकडे लक्षच देता येत नाही त्यामुळे स्वयं अध्ययनाकडे अधीकाधिक लक्ष द्यावे लागते.

◆पाल्याकडून अवास्तव अपेक्षा◆
बऱ्याचवेळा पालक आपल्या पाल्याची तूलना इतर विद्यार्थ्यांसोबत करतात, यामधून कळतं नकळत एक जीवघेणी स्पर्धा सुरू होते. यातच पालक देखील आपल्या अपेक्षांचे ओझे विद्यार्थ्यांवर लादू लागतात. "आम्ही किती कष्ट करून हे कमावले आहे, तुम्हाला काहीही कमी पडू दिले नाही" त्यामुळे तुम्ही आता "रिझल्ट" दिलाच पाहिजे.

◆तारुण्यात पदार्पण: समुदेशन ◆
मुला- मुलींच्या आयुष्यातील हा "वादळी अशांततेचा काळ..!!"म्हणजेच "तारुण्यात पदार्पण." यामध्ये त्यांचे काही प्रश्न कायम त्याना सतावत असतात...
जास्त झोप का येते आहे?
भिन्नलिंगी आकर्षण का वाढते आहे?
मित्र मैत्रिणीमध्ये तासनतास "नको" ती चर्चा का रंगते आहे?
अचानक होणाऱ्या शारीरिक बदलांना सामोरे कसे जावे? या आणि अशा असंख्य बाबी. ब्रायचे वेळा यामध्ये "पुरुष"/मुलांची खुप घुसमट होताना जाणवते.
यातच 11वी आणि 12 वी..आयुष्याचा "टर्निंग पॉईंट". यात गरजेचे असते ते आपल्या पाल्याला समजावून घेणे, मार्गदर्शन करणे आणि गरजेचे असेल तर आवश्यक ठरते ते"मार्गदर्शन व समुपदेशन".

◆एच एस सी (12वी) बोर्ड कडे अक्षम्य दुर्लक्ष◆
केवळ स्पर्धा परीक्षेची तयारी, वस्तुनिष्ठ प्रश्नांची तयारी आणि लेखी परीक्षेकडे होणारे दुर्लक्ष. यातच नियमित कॉलेज, प्रात्यक्षिक, टुशन्स आणि धावपळ. या सर्वांमध्ये कायम दुर्लक्षित राहते ती '12 बोर्ड परीक्षा.' यांचा समतोल राखताना खरी ससेहोलपट होते ती विद्यार्थ्यांची.

◆केवळ वस्तुनिष्ठ परीक्षा केंद्रित◆
इयत्ता 8 वी पासूनच जर सर्वच विषयांच्या संकल्पना स्पष्ट असतील,एन. सी.ई. आर.टी. अभ्यासक्रमनुसार तयारी केली असेल, केवळ पाठांतरावर भर नसेल, विशेषतः विज्ञान आणि गणिताच्या सर्व संकल्पना स्पष्ट असतील तर लेखी आणि वस्तुनिष्ठ असा भेद करण्याची वेळ येणार नाही. परंतु "मार्केट" मध्ये गवगवा आहे तो केवळ "एम सि क्यू" ची तयारी आणि सराव.
खरेतर लेखी/लिखित संकल्पना स्पष्ट असतील आणि त्यांचे वाचन, मनन योग्य झाले असेल, सराव झाला असेल तर लेखी आणि वस्तुनिष्ठ प्रश्न यातील भेदच दूर होईल. त्यामूळे दोन्ही प्रश्न प्रकाराची एकत्रित तयारी करता येईल.

■काय करता येईल? यशाची पंच सूत्री■
◆एन. सी.ई. आर.टी.अभ्यासक्रम अभ्यासने
◆संकल्पनाधिष्टीत अध्यापनाकडे लक्ष.
◆ताणतणाव व्यवस्थापन.
◆प्रत्येक पायरीवर प्रगतीचे विश्लेषण आवश्यक.
◆वेळोवेळी आवश्यक तेथे पुनर्नियोजन व स्वयं मूल्यमापन

होय हीच खरी उज्वल भविष्याची सुरुवात...या तयारीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!
जय हिंद..!!

Share