#स्पर्धा_पाहिलेला_माणूस
नाटक (2): प्रयास
लेखक : मिलिंद पेडणेकर
कारावास..!!
कैद, कारागृह, बंदीगृह आणि.......बरीचशी नावं... अर्थ एकच "तुम्ही तुमचं स्वातंत्र्य गमावून बसला आहात..!!"......परंतू प्रश्न जेंव्हा स्वतःच्या अस्तित्वाचा येतो....तुमचं अस्तिवच नाकारलं जात....तेंव्हा मात्र माणूस पेटून उठतो....प्रतिकारासाठी...निग्रहाने लढण्यासाठी..!!
आणि कैदेमध्ये आहात म्हणजे काय?
.........कधी घर, कधी ऑफिस तर कधी सार्वजनिक ठिकाणी सुध्दा तुम्ही कैदेत किंवा नजर कैदेत असताच ना...विशेषतः स्रिया..!!
हे कारागृह नेमक्या वर्मावरच बोट ठेवते..!!
प्रत्येक स्त्रीच स्वतःच म्हणून एक जग असतं आणि त्यात असतात काही स्वप्न आणि काही अपेक्षा..!!
जर प्रत्येक स्वप्न धुळीत मिसळत गेलं आणि प्रत्येक अपेक्षा फोल ठरत गेली तर ?
"स्त्री" आहे म्हणून तुमचं अस्तित्व नाकारलं गेलं तर ? तर सुरू होतो संघर्ष जगण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी. हा संघर्ष जेंव्हा एका टोकाला पोहोचतो तेंव्हा मात्र योग्य अयोग्य यातील एक पुसटशी रेषा ही पुसली जाते.
सर्व परिसीमा ओलांडून एक विशिष्ट क्षणी अगदी टोकाचा निर्णय घेतला जातो, समाजमान्य चौकटीत तो गुन्हा ठरतो आणि सुनावली जाते शिक्षा..!!
कारण एकच...."तिने" सहन करण्याऐवजी अन्यायाविरुद्ध आवाज उठवला...!!
त्याच गुन्हयाची शिक्षा भोगणाऱ्या स्त्रियांची प्रातिनिधिक संघर्षाची कहाणी म्हणजे हे नाटक..!!
कथासूत्र:
कथा आहे स्त्री कैद्यांची..!!
ज्यांनी कधी अन्यायाविरुद्ध तर कधी व्यवस्थेविरुद्ध आवाज उठवला आणि जेंव्हा असह्य झाले तेंव्हा कुठलाही परिणामाचा विचार न करता समोरच्या अन्याय करणाऱ्या व्यक्तीस संपवले.
स्त्री एखाद्या व्यक्तीला संपवण्याचा टोकाच्या निर्णयाप्रत का पोहोचते ?
याच हे वास्तवदर्शी रंगमंचीय उदाहरण...!!
अशाच काही शिक्षा भोगणाऱ्या स्त्रियांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करण्यासाठी, स्फुल्लिंग चेतवण्यासाठी येते एक तरुणी..आपल्या बहिणीच एक स्वप्न घेऊन.
याही स्त्रियांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये जगण्याचा अधिकार आहे.....तो मिळवणं...मिळवून देणे हेच या तरुणीच स्वप्न..!!
तेही 'नाट्यकृतीच्या' माध्यमातून.... तिचा हा प्रयत्न म्हणजेच...रंगमंचीय प्रवास म्हणजेच.."प्रयास".
या प्रयोगामध्ये सर्वच कलावंतानी आपापल्या भूमिकेमध्ये प्राण ओतला होता....पण प्रयोगास वेगळ्या उंचीवर 'साभिनय' घेऊन गेल्या त्या दिग्दर्शिका...!!
टोकाची विषमता,समाजमान्य बंधन, स्त्रियांबद्दल असणारी मानसिकता, खरं तर "महिला" म्हणजे आपल्या समाजातील पन्नास टक्के घटक..!!
त्यांना नाकारून जगणं म्हणजे सामाजिक असंतोषाची नांदी..!!
समाजमनाचा आरसा म्हणजे रंगमंच...रंगभूमी..!
रंगमंच वाचा फोडतो अश्याच काही दुर्लक्षित समाजघटकाच्या अन्यायाला..!!
समाजातील हा पीडित घटक खरच मुख्य प्रवाहात येईल ?
समाज याच्या अस्तित्वास मान्यता देईल ?
की हा " प्रयास " फक्त रंगमंचापुरता सीमित राहील?
होय उत्तर आपल्याला मिळून शोधावं लागेल हेच खरं.
© डॉ गणेश मुडेगावकर
Share
No comments:
Post a Comment