मित्र हो ! आज माझा ७५ वा वाढदिवस या निमित्ताने मागे वळून पाहताना आलेल्या अनुभवांचे , लोकांनी केलेल्या उपकारांचे गाठोडे , आपल्याशी शेअर करावे या भावनेने मी माझ्या आठवणी आपल्याशी शेअर करीत आहे .
माझी आनंदयात्रा
घरातील वडीलधाऱ्या व्यक्तींच्या सांगण्यानुसार माझा जन्म 30 एप्रिल 1950 रोजी डाळज या छोट्याशा खेड्यात झाला. परंतु माझे बालपण पूर्णपणे माझे मामा श्री हरिभाऊ मोहिते यांच्या कडे वालचंद नगर नजीक कळंब येथे गेले . आई-वडील त्यांचे प्रेम वगैरे गोष्टी मला आठवत नाही . कारण माझा व त्यांचा तसा फारसा संबंधहीआला नाही .माझेआई वडील म्हणजे माझे मामा मामी होत .त्यांनी मला कधीही कशाची कमतरता पडू दिली नाही .किंबहुना आज मी जो काही आहे तो त्यांनी माझ्यासाठी केलेल्या कष्टामुळेच !त्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती .आमच्या आजोळचे कुटुंब फारच मोठे होते . त्यामुळे घरात खूप मुले माणसे यांची वर्दळ असे .त्यामुळे एक फायदा असा व्हायचा की प्रत्येकाला नवीन पुस्तक घ्यावी लागत नसत . एकदा पुस्तकां चा एक संच खरेदी केला की तीन तीन वर्ष तो वापरावा लागे . आमच्या घरात कडक शिस्त होती .मला आठवते की संध्याकाळी जेवण्यासाठी सर्वांनी वेळेवर यायलाच हवे व सगळ्यांनी एकत्र जेवले पाहिजे असं दंडक असे .लहान मुलांची पहिली पंगत, नंतर पुरुषांची पंगत व नंतर स्त्रियांची पंगत अशी पद्धत असे . माझी मामा खूपच कडक शिस्तीचे होते त्यांना बिलकुल उशीर चालत नसे . तसेच कोणतेही काम नीटनेटके आणि करणे अपेक्षित असे . आम्ही मुलांनी अभ्यास केला नाही तर वेताच्या काठीचा प्रसाद मिळत असे . मी सर्वात लहान असल्याने व मी खरे बोलतो असा समज असल्याने मला हा प्रसाद कधी मिळाला नाही . हेच आम्हा मुलांचे इतके लाड करीत असत की , आम्हाला स्वतः गाडी जुंपून सिनेमाला, तमाशाला घेऊन जात असत . पण आम्ही कोणीही परस्पर परवानगी न घेता गेलेले त्यांना बिलकुल चालत नसे . मित्राच्या पैशाने सिनेमा पहाणे किंवा हॉटेलमध्ये जाणे त्यांना मान्य नसे . आम्हाला सिनेमाला जायचे असेल तर त्यांची परवानगी घ्यावी लागत असे . परवानगी मिळाली की पैसेही मिळत . जवळ सिनेमाचे थिएटर असल्याने माझ्यासहित सर्वांना सिनेमा पाहणेच नव्हे तर सिनेमासंबंधी साहित्य वाचनाचाही छंद होता व आहे .म्हणजे आजही मी अमिषा टाकिया सारख्याअभिनेत्रीला देखील ओळखू शकतो . आणि थ्री इडियट सारखा सिनेमा देखील आवर्जून पाहतो .
प्राथमिक शाळेतील दिवस मला चांगले आठवतात .त्याकाळी आजच्यासारख्या भव्य दिव्य अशा इमारती नव्हत्या. आमची शाळा तर गावात तीन ठिकाणी भरत असे . दर शनिवारी , ' सामुदायिक जीवन ' नावाच्या तासाला शाळा सारवण्याचे काम करावे लागे . त्यासाठी शेण गोळा करणे, नदीवरून पाणी आणणे , इथपासून कामे करायला लागत . विशेष म्हणजे आम्हा विद्यार्थ्यांचे हे अत्यंत आनंददायी व आवडते काम असे . प्राथमिक शाळेत श्री ठोंबरे गुरुजी नावाचे शिक्षक मला पाचवी, सहावी , सातवीला होते . त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते कोणालाही मारत नसत, परंतु तरीही ते कडक शिस्तीचे म्हणून प्रसिद्ध होते .एखादा
विद्यार्थी शाळेत उशिरा आला की सर्व वर्ग त्या विद्यार्थ्याला , 'एक साथ नमस्ते 'अशी सलामी देत असे . त्यामुळे तो विद्यार्थी आपोआपच शर्मिंदा होई व उशिरा यायचे टाळत असे .
प्राथमिक शाळेतून मी हायस्कूलमध्ये प्रवेश केला तेथे वेगळेच वातावरण होते. शाळेला प्रशस्त इमारत होती . अनेक शिक्षक होते येथेच खरे तर मला शिक्षणाची गोडी लागली . माझ्या सुदैवाने मला खूप चांगले शिक्षक लाभले .माझ्या शिक्षकांनी आमच्यावर खूप प्रेम केले . आमच्या मुख्याध्यापिका दातेबाई यांनी आम्हाला वाचनाची गोडी लावली . त्याकाळी किती कळत होते ते माहित नाही, परंतु 'ययाती' 'मृत्युंजय ' 'रायगडला जेव्हा जाग येते 'अशी पुस्तके आम्हाला वाचायला लावली .आणि पुढे आम्हीच वेगवेगळी पुस्तके वाचू लागलो. मी अगदी अभिमानाने सांगू इच्छितो की, माझ्याबरोबर ची मुले नंतर विविध ठिकाणी गेली .कोणी शेती करू लागले ,कोणी दुकानदार झाले ' कोणी विविध कंपनीत नोकरीस लागले परंतुआमच्या सर्वात एक समान गुण होता व आज ही आहे तो म्हणजे वाचनाचा छंद !शिक्षकांच्या प्रेरणेने व प्रयत्नाने विद्यार्थी काय करू शकतात याचे एक उत्तम उदाहरण होय . याच कालावधीत अत्यंत कडक शिस्तीचे परंतु गणित उत्तम शिकवणारे श्री रणवरे सर , संपूर्ण इतिहास तोंडपाठ असणारे श्री पाटील सर (हे पाटील सर देखील अत्यंत कडक शिस्तीचे नंतर ते मुख्याध्यापक झाले व मी त्यांच्यासोबत शिक्षक म्हणून एक वर्ष काम देखील केले त्यावेळी देखील त्यांच्या खूप धाक वाटत असे ) होते . मी शाळेत बऱ्यापैकी विद्यार्थी होतो फार बुद्धिमान वगैरे कधीच नव्हतो व आजही नाही . अभ्यासू विद्यार्थी म्हणून माझी ओळख होती तरी केवळ द्वितीय श्रेणीत एस .एस .सी परीक्षा पास झालो .
मी एस .एस .सी पास झालो आणि आता खरे संकट निर्माण झाले कारण आमच्या गावात महाविद्यालय नव्हते व परगावी पाठवण्या इतकी आमच्या मामांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती .तशा परिस्थितीत मामांनी मला अकलूज येथे नुकत्याच नवीन सुरू झालेल्या महा विद्यालयात पाठवले त्याकाळी सायन्सला जायचे तर आर्टस कोर्स पेक्षा २० रुपये जास्त फी द्यावी लागे .आणि ही वीस रुपये फी परवडत नाही म्हणून देखील बरेचसे विद्यार्थी आर्ट्सला प्रवेश घेत असत .माझ्या मामांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना देखील माझी सायन्सला प्रवेश घेण्याची इच्छा पूर्ण केली . त्या काळात मला माझ्या चुलत मावशीने देखील खूपच आधार दिला ( त्याकाळीआपल्या नातेवाईकांना मदत देणे किंवा घेणे हे सर्रास होत असे . आज मात्र अशी मदत देणे ही बंद झाले आहे व मदत घेणेही कमीपणाचे वाटते . )या लोकांच्या सहकार्यामुळेच अकलूज येथे दोन वर्ष शिकू शकलो . या महाविद्यालयात त्यावेळी श्री माने नावाचे प्राध्यापक ग्रंथालय सांभाळत असत . महाविद्यालय नवीन असून देखील ग्रंथालय चांगले होते. विशेष म्हणजे इथेही मी शेक्सपियरच्या नाटकांचे मराठी अनुवाद वाचून काढले . व बऱ्याच कादंबऱ्याही वाचल्या . श्री माने सर आम्हा विद्यार्थ्यांचे वाचन प्रेम लक्षात घेऊन पुस्तके देण्यात कसूर करीत नसत . त्यामुळे मला माझा वाचनाचा छंद येथे चांगल्या प्रकारे जोपासता आला .अकलूज मध्ये केवळ Pre degree व FYBSc असे दोनच वर्षाचे वर्ग होते . पुढे कोठे जायचेअसा प्रश्न आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने निर्माण झाला .त्यावेळी श्री पाटील सर यांच्या सांगण्यावरून सातारला रयत शिक्षण संस्थेमध्ये गेलो .कारण तेथे 'कमवा शिका योजना ' ( Labour Scheme )होती .परंतु दुर्दैवाने तेथे जाताच महिनाभर आजारी पडलो व कॉलेज सोडून घरी आलो .आता पुढचे शिक्षण थांबले असेच वाटत होते कारण आता इतक्या उशिरा महाविद्यालय रुजू करून घेणार नाही याची खात्री होती . परंतु माझा एक जिवश्च कंठश्च मित्र नेताजी माने याने त्यावेळी पंढरपूर येथे एस.वाय.बी. एस.सी.ला प्रवेश घेतला होता त्यानेच माझ्यासाठी त्याच्या प्राचार्यांची परवानगी काढली व मला पंढरपूर कॉलेजमध्ये उशिरा कां होईना प्रवेश मिळाला .माझ्या मामा नंतर माझ्या आयुष्यातील आलेली व जिने माझे भविष्य उज्वल करण्यासाठी सतत मदत केली ती व्यक्ती म्हणजे माझा हा मित्र होय .अत्यंत शांत संयमी अशा या माझ्या मित्राने माझ्यावर अत्यंत निरपेक्ष भावनेने प्रेम केले . आजही आमचा स्नेह टिकून आहे . या महाविद्यालयातून मी 1971 मध्ये बी .एस्सी .होऊनबाहेरपडलो .महाविद्यालयांमध्ये गुणानुक्रमे दुसरा आलो कधी नव्हे ते माझा दुसरा नंबर आला . होता .महाविद्यालयामध्ये देखील मी अभ्यासू विद्यार्थी म्हणून प्रसिद्ध होतो . परंतु फार बुद्धिमान वगैरे होतो किंवा फार हुशार होतो असे काही नव्हते . एक मात्र खरे की महाविद्यालयात मला अभ्यासाची गोडी लागली होती . दुर्दैवाने खेळाकडे फारसे लक्ष देता आले नाही .
बी .एस्सी . अत्यंत उत्तम गुणांनी उत्तीर्ण झालो .त्याकाळी विद्यापीठ चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना एम . एससी.चे प्रवेश फॉर्म घरी पाठवत असे . मलाही प्रवेश फॉर्म मिळाला परंतु आपले ओझे आपल्या मामावर किती दिवस टाकायचे या विचाराने नोकरी करण्याचा निर्णय घेतला . त्यावेळी एम .एस्सी. होता येत नाही याचे दुःखही खूप झाले होते . परंतु वैयक्तिक सुखदुःखापेक्षा कर्तव्याचा विचार करूनच नोकरीचा निर्णय घेतला . त्याकाळी विज्ञान शिक्षक मिळत नसत त्यामुळे मी पुढे शिकणार नाही असे पंचक्रोशीत समजल्याबरोबर आसपासच्या शाळांचे मुख्याध्यापक माझ्या मामाकडे मी त्यांच्या शाळेत नोकरीस यावे यासाठी प्रयत्न करू लागले .(यात माझा मोठेपणा काहीच नव्हता तो त्या काळाचा महिमा होता कोणाही विज्ञान पदवीधराला असाच अनुभव येत असे )
सोलापूर जिल्ह्याच्या व पुणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या माळशिरस तालुक्यातील शिवपुरी येथील माध्यमिक विद्यालयात शिक्षक म्हणून मी रुजू झालो . शाळा लहान होती परंतु त्या शाळेत उत्तम शिक्षक व माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शाळेत प्रयोगशाळा व ग्रंथालय उत्तम होते. त्यामुळे शाळेच्या अध्यापना व्यतिरिक्तचा वेळदेखील अकरावी च्या विद्यार्थ्यांना घेऊन मी प्रयोगशाळेत व्यतीत करीतअसे . या शाळेत मी एकटाच बी .एस्सी . विज्ञान शिक्षक असल्याने माझ्याकडे खूप आदराने पाहिले जात असे . मात्र येथे मला आठवी ते अकरावी सर्व वर्गांना अध्यापन करावे लागत असे . त्यासाठी मला खूपच अभ्यास करावा लागे . इथे मला एका गोष्टीची जाणीव झाली की, विज्ञानातील मला काहीच कळत नाही . आणि त्यासाठी मला पुस्तकांचा नव्याने वेगळ्या दृष्टीने अभ्यास करावा लागला . माझ्या आयुष्यात या एका वर्षा इतका मी कधीही अभ्यास केला नाही . हा अभ्यास म्हणजेच आताच्या भाषेत ' अध्यापन शास्त्रीय ज्ञान ' . या शाळेतील शिक्षकांनी मला खूप प्रेम दिले खरे तर माझे खूप लाड केले असे म्हणणे योग्य ठरेल . त्यामुळे कदाचित मला त्यावर्षी वालचंद नगर येथे परचेस ऑफिसर ची नोकरी चालून आली असताना मी नाकारली व शिक्षकच व्हायचे नक्की केले. मी शिक्षक होण्यात तत्कालीन शिक्षक श्री . दळवी सर श्री गाडगोळी सर , श्री एन . बी . जोशी सर हेच कारणीभूत झाले . श्री गाडगोळी सर हे तर अत्यंत विद्वान होते व त्यांच्याकडून मी तत्त्वनिष्ठा , निर्भयता, शिकलो . तसेच श्री दळवी सरांकडून शिस्त यांनी नीटनेटकेपणा ही शिकण्यास मिळाला . मी बी.एड.ला जायचे निश्चित केल्यावर सर्व शिक्षकांनी आपल्याकडे असणारी बी .एड . साठी उपयुक्त पुस्तके मला आणून दिली आणि प्रत्येक वेळी माझ्या मनावर एक गोष्ट बिंबवली , ती म्हणजे मी अत्यंत हुशार आहे व मला बी .एड .ला प्रथम श्रेणी मिळणारच ! केवळ या शिक्षकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी मला बी.एड.मध्ये ही खूप अभ्यास करावा लागला . वास्तविक आत्तापर्यंतचे शिक्षण तालुका स्तरावरील महाविद्यालयात झाले होते आता पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी अत्यंत प्रतिथयश महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा व कॉलेज लाईफ एन्जॉय करायचे असा माझा बेत या शिक्षकांच्या अपेक्षांमुळे मला बाजूला ठेवावा लागला . उत्तम कॉलेज मध्ये प्रवेश घेतला परंतु केवळ अभ्यास आणि अभ्यास हेच ध्येय ठेवून संपूर्ण बी .एड .चे वर्ष पूर्ण केले . अपवाद फक्त सिनेमा पाहण्याचा . पुण्यात खूप उत्तम उत्तम चित्रपट पाहिले . माझे चित्रपट विषयक ज्ञान देखील खूपच अद्यावत होत गेले .
टिळक कॉलेज ऑफ एज्युकेशन पुणे येथे बी .एड ला प्रवेश घेतला त्याकाळी महाराष्ट्रातील सर्वोत्तम महाविद्यालयांपैकी हे एक महाविद्यालय होते . अत्यंत विद्वान शिक्षक , उत्तम ग्रंथालय व अत्यंत कठोर शिस्त ही त्या महा विद्यालयाचीच ठळक वैशिष्ट्ये होती .का कोणास ठाऊक परंतु इतरांना जाचक वाटणारी तेथील शिस्त मला मात्र आवडत असे.या महाविद्यालयात प्राचार्य सौ.गीता गद्रे मॅडम श्री व .पा .देशमुख सर , श्री ताम्हणकर सर , या शिक्षकांच्या विद्वत्तेबद्दल व अध्यापन कौशल्याबद्दल मला नेहमीच आदर वाटत आला आहे .त्याच वर्षात शरद वाघ नावाचे मराठीचे शिक्षकही अत्यंत नावाजलेले शिक्षक होते . ते अत्यंत सुंदर व ओघवते व्याख्यान देत .त्या काळात ते बाहेरही व्याख्यानाला जात . परंतु दुर्दैवाने त्यांचा सहवास (विषय वेगळा असल्याने )मला खूपच कमी मिळाला .त्या काळी महाविद्यालयाच्या मी इतका प्रेमात पडलेलो होतो की माझे पुढील एम. एड., एम . फिल .पीएच.डी हे सर्व शिक्षण याच महाविद्यालयातून घेतले .
बी.एड. प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो त्याकाळी आजच्या इतक्या मोठ्या संख्येने बी .एड .ला प्रथम श्रेणीत विद्यार्थी पास होत नसत . या प्रथम श्रेणीने माझ्यात एक खूप मोठा बदल झाला , मी आता स्वतःला खरेच हुशार समजू लागलो . माझा आत्मविश्वास प्रचंड वाढला .बी .एड . नंतर पुन्हा वालचंद विद्यालय , कळंब . तालुका - इंदापूर जिल्हा पुणे . येथे मी सहशिक्षक म्हणून रुजू झालो . याच शाळेत मी शिकलो होतो त्या शाळेत मी शिक्षक म्हणून रुजू झालो या गोष्टीचा वेगळाच आनंद होता . येथे माझे त्यावेळचे आवडते शिक्षक श्री पाटील सर मुख्याध्यापक झालेले होते अत्यंत कडक शिस्त ,उत्तम अध्यापन , विषयाचा जबरदस्त व्यासंग असे हे व्यक्तिमत्व . या शाळेत देखील उत्तम प्रयोगशाळा होती तसेच श्री मोहिते , श्री बोकील, श्री नरगुंदे , श्री साळवे हे मला उत्तम सहकारी व मित्र भेटले . आमच्यापेक्षा थोडे वयाने जास्त असलेले श्री शिंदे सर व माझ्या शिक्षिका पालियाबाई यांचे मला खूपच प्रेम मिळाले . इथे आमचा विज्ञान शिक्षकांचा चांगला गट तयार झाला होता . त्यामुळे आमच्या शाळेने उत्कृष्ट विज्ञान प्रदर्शन भरवले होते . या शाळेत काम करत असतानाच एके दिवशी , 'आदर्श कॉलेज ऑफ एज्युकेशन 'पुणे यांची 'मास्टर ऑफ मेथड' पदासाठीची जाहिरात वाचण्यात आली आणि अर्ज केला .माझ्या सहकाऱ्यांना माझी निवड होईल असे वाटत नव्हते . मीही थोडा साशंक होतो कारण आपण ग्रामीण भागातील आहोत त्यामुळे पुणेरी लोक आपल्याला स्वीकारतील का अशी शंका यायची . परंतु तेथे मला बी .एससी. व बी .एड .ला मिळालेल्या प्रथम श्रेणी उपयोगी पडल्या (तसे मला तत्कालीन प्राचार्य वीरकर व बापट यांनी माझ्या निवडीचे कारण सांगितले होते )
आदर्श कॉलेज ऑफ एज्युकेशनने माझ्या आयुष्याला एक नवे वळण दिले . प्राचार्या सहित सर्व शिक्षक अत्यंत विद्वान होते . येथे नेहमी शैक्षणिक चर्चा चालत . या चर्चेचे वैशिष्ट्य असे की, सीनियर किंवा ज्युनिअर असा विचार न होता आपापले विषय व मुद्दे मांडण्याचा प्रत्येकाला समान अधिकार असे . आपले म्हणणे लोकांना पटवून देणे आवश्यक असे . खूपच शैक्षणिक वाद विवाद होत . याचा फायदा मला असा झाला की समोरची व्यक्ती कितीही मोठी असो, आपला मुद्दा समर्थपणे मांडण्याचे बळ मला येथे मिळाले . तसेच कोणत्याही मुद्द्याचा विविधांगी व चिकित्सकपणे विचार कसा करावा ही दृष्टी मला येथेच प्राप्त झाली . येथे आम्हाला ज्येष्ठ व अनुभवी असलेल्या डॉ . व .सी . देशपांडे व डॉ. सुमन करंदीकर यांचा माझ्यावर खूप प्रभाव पडला . इथेच मला अनंत जोशी , शिवणेकर हे अत्यंत जिवलग मित्र मिळाले . आम्ही तिघे एकाच वेळी आदर्श मध्ये नोकरीला लागलो व आजही आपापल्या क्षेत्रात आमच्या परीने कार्यरत आहोत . डॉ . अनंत जोशी हे य .च .म . मुक्त विद्यापीठाच्या शिक्षण शास्त्र शाखेचे संचालक म्हणून नुकतेच निवृत्त झाले तसेच डॉ . शिवणेकर देखील प्रोफेसर म्हणून निवृत्त झाले आहेत . व सध्या मुंबई मध्ये कवितेच्या क्षेत्रात त्यांनी स्वतःचा ठसा उमटविला आहे.
आदर्श कॉलेजमध्ये नोकरीला असतानाच माझे लग्न ठरले व दिनांक 28 डिसेंबर 1974 लग्न झाले . त्यामुळे आता दोघांना एकत्र नोकरी मिळेल अशा ठिकाणी नोकरी करायची असा आम्ही दोघांनी विचार केला त्याचवेळी सोलापूर कॉलेज ऑफ एज्युकेशन ची (सध्याचे कस्तुरबाई कॉलेज ऑफ एज्युकेशन )जाहिरात आली रितसर मुलाखत होऊन मी १ / ७ / १९७५ रोजी येथे रोजी झालो .पुणे सोडून सोलापूरला येण्याच्या माझ्या निर्णयाला अनेक मित्रांनी नातेवाईकांनी वेड्यात काढले आणि त्यांचे खरे ही होते . परंतु मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो .माझ्या महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य प.ब .भंडारी हे होते . सर खूपच विद्वान होते , त्या काळात त्यांचे , 'शैक्षणिक समाजशास्त्र ' हे पुस्तक खूपच प्रसिद्धी पावलेले होते .अत्यंत नम्र , सौजन्यशील व मृदू असे ते व्यक्तिमत्व होते . त्यांच्याकडे आम्ही कधी प्राचार्य म्हणून पाहिले नाही तर ते आमचे मार्गदर्शक प्रेमळ असे पितृतुल्य व्याक्तिमत्त्व होते .मला पुस्तक लिहायला त्यांनीच प्रवृत्त केले .सतत आमच्या मागे लकडा लावीत . वाचा , लिहा , संशोधन करा, विविध सेमिनार वर्कशॉपला जा कारण त्यामुळे शिक्षकाचे व्यक्तिमत्व विकसित होते असे त्यांचे ठाम मत होते . त्यामुळेच मी रिफ्रेशर कोर्सेस सक्तीचे होण्याअगोदरच दोन दिवसापासून ते एक महिन्यापर्यंतचे
पुण्यापासून अहमदाबाद ,भोपाळ, दिल्ली, मैसूर, सूरत , मुंबई या ठिकाणी जवळजवळ 28 कोर्सेस अथवा सेमिनारला उपस्थित राहिलेलो होतो . या प्राचार्यामुळेच या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक पीएच .डी . झाले तसेच बहुतेक सर्वांनी पुस्तके ही लिहिली . मी प्राचार्य झाल्यावर माझ्या शिक्षकांना याच प्रकारे घडविण्याचा प्रयत्न केला व बऱ्याच अंशी यशस्वी झालो . सरांनी मला विविध विषयांचे अध्यापन करायला भाग पाडले कोणत्याही नवीन विषय आला की, त्या विषयाची जबाबदारी प्राचार्य माझ्याकडे सोपवीत . त्यामुळे मला त्या विषयाचा मुळापासून अभ्यास करावा लागत असे . यातूनच 'शैक्षणिक तंत्रज्ञान ' 'शैक्षणिक व प्रायोगिक मानसशास्त्र 'शिक्षणातील नव प्रवाह व नव प्रवर्तने ' 'गणित अध्यापन पद्धती ' 'अध्ययन उपपत्ती व अध्यापन 'ही पुस्तके तयार झाली .
नंतरच्या काळात श्री खानापुरे प्राचार्य झाले तेही अत्यंत अभ्यासू व नेटकेपणाने व्याख्यान देणारे व्यक्तिमत्व होते .त्यानंतर डॉ भिंताडे प्राचार्य झाले . मी आणि भिंताडे एकाच वेळी या महाविद्यालयात रुजू झालो होतो . आमच्या नोकरीच्या समस्या , घरगुती समस्या या सारख्याच होत्या .तसेच आम्ही राहायलाही शेजारी शेजारी होतो . त्यामुळे आमची घनिष्ठ मैत्री होती . आमचे संबंध नेहमीच मैत्रीचे राहिले .त्यांनी कधीही आम्हाला कनिष्ठ म्हणून वागवले नाही व आम्ही त्यांचा कधी अनादर होईल असे वर्तन केले नाही . वास्तविक माझ्या या महाविद्यालयातील 25 वर्षाच्या कालावधीत आम्ही नोकरी केली असे वाटलेच नाही . मी व माझे सहकारी डॉ . बोंदार्डे , डॉ . गायकवाड , डॉ. सौ कुलकर्णी , डॉ. नसीमा पठाण , डॉ. मयुरा शहा यांचा असा उत्तम संच तयार झाला होता केवळ
महाविद्यालयातील शिक्षक तज्ञ असून चालत नाही तर चांगला संघ तयार व्हावा लागतो . असा उत्तम संघ तयार झाल्यामुळेच आम्ही कस्तुरबाई कॉलेजचे नाव महाराष्ट्रात उंचावू शकलो .अर्थात आमच्या प्रयत्नाला आमचे संघनायक प्राचार्य व आमचे प्रेरणास्थान अत्यंत आदरणीय असे भाऊसाहेब गांधी यांनी नेहमीच पाठबळ दिले म्हणून आम्ही उत्तम असे कार्य करू शकलो .
कस्तुरबाई कॉलेज चे काम करीत असतानाच अचानक 1995 मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेवर जाण्याची संधी मिळाली . वास्तविक यापूर्वी साधा अभ्यास मंडळ सदस्य म्हणून मी कधी काम केलेले नसताना एकाच वेळी अभ्यास मंडळ अध्यक्ष व व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. मी शिक्षक संघटनेने पाठिंबा दिलेल्या सदस्याच्या विरुद्ध निवडून आल्यामुळे माझे नाव अधिक चर्चेत आले. वास्तविक मी ही कधी काळी संघटनेचा सदस्य होतो पण संघटनेच्या काही आततायी कृती व धोरणे यांना कंटाळून मी संघटनेतून बाहेर पडलो होतो .संघटनेने निवडणूक लढवू नये असे त्यावेळी माझे मत होते कारण त्यावेळी एकच संघटना होती त्यामुळे सर्व शिक्षक आपलेच असताना विनाकारण शिक्षकांमध्ये भेदभाव का करायचा असे माझे मत होते . परंतु संघटनेला हे मान्य नव्हते . अर्थात संघटनेचे महत्त्व व कार्य हे अत्यंत महत्वपूर्ण आहे याची जाणीव मला कायम होती व आजही आहे . मी जरी संघटनेच्या विरोधातून निवडून आलो असलो तरीही कधीही शिक्षक हिताच्या विरोधात वर्तन केले नाही .कारण शिक्षक असणे ही बाब अत्यंत पवित्र व प्रतिष्ठेची आहे असे मी मानत आलो आहे .
शिवाजी विद्यापीठातील हा पाच वर्षा चा कालावधी माझ्या आयुष्यातील उत्तम असा कालावधी होता .याच काळात माझे गुरुवर्य डॉ . देवस्थळी , माझे परममित्र डॉ .वासकर डॉ .वाघ माझे अत्यंत निकटचे सल्लागार व स्नेही यांच्या मार्गदर्शनामुळे मी व्यवस्थापन परिषदेत निवडून आलो होतो ते डी . यु .पवार माझे व्यवस्थापन परिषदेतील सर्व सहकारी विशेषत : श्री राम पवार, श्री आर .एस . पाटील ,श्री एस . एन . पवार श्री व्ही .टी. चौगुले व श्री जागीरदार यांच्याशी स्नेह दृढ झाला . विद्यापीठात विविध समित्यावर काम करण्याची संधी मिळाली विद्यापीठांनी सोपवलेले प्रत्येक काम मी अत्यंत प्रामाणिकपणे व सचोटीने केले याचे फळ म्हणजे तत्कालीन कुलगुरू धनागरे सरांचा माझ्यावर जडलेला लोभ ! धनागरे सरांच्या व्यक्तिमत्त्वाचा खूप मोठा परिणाम माझ्यावर झाला . एखाद्या गंभीर प्रसंगात डगमगून जायचे नाही, आपल्या तत्त्वाशी तडजोड करायची नाही , निर्भयपणे काम करायचे ' कोणतेही काम बेकायदेशीर करायचे नाही या गोष्टी सरांकडून शिकायला मिळाल्या . व्यवस्थापन परिषदेवर निवडून जाताना मी माझ्या मतदारांना असे लिखित वचन दिले होते की, " मी निवडून आलो तर माझ्या स्वतःच्या प्रतिष्ठेला , शिक्षकांच्या प्रतिष्ठेला , बाधा येईल असे वर्तन मी करणार नाही . किंबहुना या सर्वांच्या प्रतिष्ठेत भर पडेल असेच वर्तन करीन आणि मी अभिमानाने सांगू इच्छितो की मी हे दिलेले वचन पाळले . अर्थात हे करण्यासाठी मला माझ्या सर्व सहकाऱ्यांची साथ मिळाली हेही तितकेच खरे !विद्यापीठात खूपच संघर्षमय वातावरणात आम्ही दिवस काढले हा संघर्ष कमी करण्याचा माझ्या परीने आटोकाट प्रयत्न केला . काही प्रमाणात यशस्वीही झालो परंतु हा संघर्ष नसता तर विद्यापीठाची अधिक प्रगती झाली असती असे मला प्रामाणिकपणे वाटते .
मला विविध विद्यापीठामध्ये काम करण्याची संधी मिळाली . पुणे विद्यापीठांमध्ये अभ्यास मंडळ सदस्य , उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बीयूटीआर सदस्य, अमरावती विद्यापीठात अभ्यास मंडळ सदस्य ' य .च .म . मुक्त विद्यापीठात अकॅडमी कौन्सिल सदस्य ' एसएनडीटी विद्यापीठात अभ्यास मंडळ सदस्य, या सर्व ठिकाणच्या अनुभवावरून माझ्या एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे सर्व विद्यापीठांमध्ये निर्णय घेण्याची प्रक्रिया थोड्याफार प्रमाणात सारखीच आहे आणि ती खूप वेळ खाऊ आहे . विद्यापीठाला पाठविलेल्या कोणत्याही पत्रावर किमान पाच सहा सह्या होतातच .तसेच बहुतांशी विद्यापीठांमध्ये संपूर्ण कारभार कुलगुरूंच्या हातात एकवटले ला आहे . या कायद्यात राहून देखील सत्तेचे विकेंद्रीकरण शक्य आहे व ते आवश्यकही आहे प्रत्येक निर्णय जर कुलगुरूच घेणार असतील तर पीएच .डी .धारक प्रथमवर्ग श्रेणीचे अधिकारी कशाला हवेत ? व विविध तज्ञांची मंडळे तरी कशाला हवीत ? यामुळे निर्णय प्रक्रियेला वेळ लागतो तसेच प्रत्येक अधिकारी आपली जबाबदारी कुलगुरूवर सोपवून रिकामा होतो . आणि कुलगुरूंवर देखील अत्यंत ताण येतो .महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठात (मुक्त विद्यापीठासह )विविध स्तरावरील परीक्षासाठी परीक्षक म्हणून काम करण्याची संधी मिळाली येथे एक प्रकर्षाने गोष्ट लक्षात आली ती म्हणजे कोणत्याही विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या दर्जामध्ये लक्षणीय फरक नाही .अगदी पी एच.डी.पातळीवर देखील !
सन 2004 मध्ये सोलापूर विद्यापीठाची स्थापना झाली श्री ईरेश स्वामी यांची प्रथम कुलगुरू नियुक्ती झाली. स्वामी सर व मी पूर्वीचे स्नेही असल्याने स्वामी सरांनी मला BCUD संचालक पदी येण्याची विनंती केली परंतु मी माझ्या काही वैयक्तिक अडचणीमुळे ती स्वीकारू शकलो नाही . नंतर काही तात्विक मतभेद होऊन मी अधिष्ठातापदही सोडले , तरी आमचा स्नेह कायम राहिला . नंतर रसायनशास्त्रात अत्यंत पारंगत असलेले डॉ .बाबासाहेब बंडगर कुलगुरू म्हणून विद्यापीठाला लाभले याही विद्यापीठात अधिष्ठाता, व्यवस्थापन परिषदेत सदस्य म्हणून काम करण्याची अल्पकाळ संधी मिळाली . या कालावधीत पीएच .डी . नियमावली, स्थानिक चौकशी समितीसाठी आचारसंहिता , विद्यापीठाच्या शिक्षक प्राचार्य समित्यांसाठी आचारसंहिता, बी .एडच्या प्राचार्यासाठी मार्गदर्शक सूचना अशा काही ठळक गोष्टी करण्याचा प्रयत्न केला .बी .एड . महाविद्यालयांचा दर्जा घसरू नये यासाठी सतत प्रयत्नशील राहिलो . यासाठी कुलगुरूंचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले . विद्यापीठाचा विकास वेगाने सुरू आहे अल्पावधीत देखण्या वास्तू उभ्या राहिलेल्या आहेत ' राहत आहेत पाचशे एकराचा विकास होणे आहे . त्या तुलनेने संशोधन व पदव्युत्तर शिक्षणाच्या विकासाकडे किंचित दुर्लक्ष होत आहे असे माझे मत आहे . कदाचित ते चुकीची असू शकेल . सातत्याने शिक्षकांना (प्राध्यापकांना )वेगवेगळ्या प्रकारची प्रशिक्षणे तसेच कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक आहे असे वाटते हळूहळू हे होऊ लागेल अशी आशा आहे विद्यापीठाचा शिक्षणशास्त्र विभाग नव्याने सुरू व्हावा व तो अनुदानित व्हावा तसेच आणखी काही अनुदानित विभाग सुरू व्हावेत अशी इच्छा आहे .असो या ठिकाणी मला अगदी कर्मचाऱ्यांपासून ते कुलगुरू पर्यंत सर्वांनी प्रेम दिले आदराची वागणूक दिली त्यामुळे माझा येथील प्रवास आनंददायी झाला .
एक नोव्हेंबर 2000 ला मी दयानंद शिक्षणशास्त्र महाविद्यालयात प्राचार्य म्हणून रुजू झालो .प्राचार्य कुलकर्णी सरांच्या मुलाखतीच्या वेळी मी कुलगुरू प्रतिनिधी म्हणून आलेलो असताना तत्कालीन स्थानिक सचिव देवराज गुप्ता यांच्यासोबत माझी बराच वेळ औपचारिक चर्चा झाली आणि का कोणास ठाऊक त्यांनी मला अचानक प्राचार्य पदाची ऑफर दिली . वास्तविक यापूर्वी येथे मी प्राचार्य पदासाठी मुलाखत दिली होती त्यावेळी देखील ऐनवेळी मला नाकारले गेले होते त्यामुळे पुन्हा येथे मी अर्ज करण्याचा प्रश्नच नव्हता . परंतु गुप्ता साहेबांची भारदस्त व आश्वासक विनंती मी अव्हेरू शकलो नाही .इथेही प्राचार्य म्हणून काम करताना खूप आनंदानेच काम केले .मी खूप कष्ट केले, तपश्चर्या केली वगैरे काही नाही . अगदी सहजपणे माझ्या सहकाऱ्यांशी प्रेमळ वर्तन ठेवून एक संघ बांधण्याचा प्रयत्न केला सुदैवाने चांगले सहकारी मिळाले त्यांना अध्ययन अध्यापनासाठी प्रेरित केले. आज जवळजवळ सर्वजण Ph .D .झालेले आहेत आठ पैकी चार शिक्षकांनी यूजीसी चे संशोधन प्रकल्प हाती घेतलेले आहेत .श्री पठाण यांनी दोन-तीन ग्रंथ प्रकाशित केलेले आहेत . तसेच डॉ . बामणे पती पत्नी व डॉ . शिंदे व डॉ . किडगावकर हे पुस्तक प्रकाशित करीत आहेत .श्रीमती भोजे यांना यूजीसी चे संशोधन अनुदान प्राप्त झाले असून त्यांनी Ph.D प्रबंध सादर केलेला आहे .महाविद्यालयाला प्रयोगशाळा बांधण्यासाठी पाच लाखांचे अनुदान मंजूर झालेले आहे ' तसेच मुलींच्या वसतिगृहासाठी 25 लाखांचे अनुदान प्राप्त झालेले आहे .
महाविद्यालयाला स्वतंत्र इमारत नाही आहे ती अपुरी आहे ही खंत आमचे सध्याचे स्थानिक सचिव श्री सतीश जी कपूर यांच्याकडे व्यक्त केली .त्यांनी लवकरच अत्यंत अद्यावत अशी स्वतंत्र इमारत बांधून देण्याचे आश्वासन दिले आहे . त्यामुळे मी तृप्त आहे समाधानी आहे .आमचे स्थानिक सचिव कपूर साहेब अत्यंत विद्वान अभ्यासू व उत्साही आहेत तरुणांना लाजवील असा त्यांच्या कामाचा झपाटा आहे त्यामुळे आमच्या बी .एड .च्या स्वतंत्र बिल्डिंगचे स्वप्न लवकरच पूर्ण होईल याची मला पूर्ण खात्री आहे .त्यामुळे मी अत्यंत तृप्त होऊन आनंदाने निवृत्त होत आहे .
माझ्या या सर्व प्रवासात घरात घडणाऱ्या घडामोडींची दखल घेणे हे मी माझे कर्तव्य समजतो. एक जुलै 1975 पासून खऱ्या अर्थाने आमचा संसार सुरू झाला. अक्षरशः दीड खोलीत आम्ही संसार सुरू केला . सासऱ्याने लग्नाच्या वेळी दिलेली केवळ एक गादी व अत्यावश्यक भांडीकुंडी घेऊन सुरुवात केली . सुरुवातीला मी डॉ . भिंताडे दक्षिण कसब्या पासून कॉलेजला चालत जात असू . सहा महिन्यांनी आम्ही दोघांनी सेकंड हॅन्ड सायकली घेतल्या (भिंताडे सरांना वसुमती कुलकर्णी यांची लेडीज सायकल मिळाली होती )
आम्ही पतिपत्नी दोघे नोकरी करीत असलो तरी घरात मी थोरला असल्याने घर ची जबाबदारी माझ्यावर होती . आई-वडिलांना दरमहा पैसे पाठवायला लागत असत . माझे दोन भाऊ व मिसेसचा भाऊ , नंतर मामाचा मुलगा, आमच्याकडे शिकायला होते, त्यामुळे आर्थिक चणचण असायची मात्र केवळ सौभाग्यवतीच्या साथीमुळे या चणचणीचे संघर्षात कधीही रूपांतर झाले नाही . 1976 च्या दिवाळीचा एक प्रसंग आठवतो . आम्ही दिवाळी सोलापूरला घरी साजरी करायची ठरवली , त्याप्रमाणे सर्व सामान खरेदी केले व नंतर वडिलांचे पत्र आले की, दिवाळीला तुम्ही इकडे या .घरी जायचे म्हणजे मोकळ्या हाताने जाता येत नव्हते . जाणे येण्याचे भाडे, तसेच दिवाळीसाठी पुन्हा वेगळे असे पैसे द्यावे लागणार होते . माझ्याकडे अगदी काहीही पैसे नव्हते आता काय करायचे . घरातून कसेबसे एसटी भाड्यापुरते पैसे तयार झाले पण तेवढ्याने काम भागणार नव्हते . त्यामुळे आमचे मित्र श्री सावनजी यांनी पन्नास रुपये उसने दिले आणि त्यामुळे आम्ही आमच्या घरच्या सोबत दिवाळी साजरी करू शकलो . सावंजीचा मी त्यासाठी कायम ऋणीआहे .
त्यावेळी माझा एम .एड .,चा अभ्यास चालू होता त्यासाठी पुण्याला जावे लागे . त्यासाठी खर्चही होत असे . हळू हळू संसार वाढू लागला 21 फेब्रुवारी 1976 ला आशुतोष तर 21 जुलै 1978 ला अभिजीत चा जन्म झाला . याच काळात मी गणित अध्यापन पद्धतीचे पुस्तक लिहिले परंतु पुस्तक प्रकाशित करायचे म्हणजे काय याचे ज्ञान नव्हते त्यामुळे ते प्रकाशित व्हायला 1986 साल उजडावे लागले . दरम्यानच्या काळात 1980 साली आम्ही सन्मति गृह निर्माण संस्थेमध्ये घरासाठी एक प्लॉट बुक केला त्यासाठी डॉक्टर बोंदार्डे यांची खूपच मदत झाली .त्यासाठी दहा हजार पाचशे रुपये भरायचे होते त्यावेळी सौभाग्य वतीच्या गळयातील गंठण , बांगडया ,
सर्व मोडून हे पैसे उभे केले . माझे काही नातेवाईक मला पैसे देण्या इतकेश्रीमंत होते त्यांची द्यायची इच्छाही होती परंतु नातेवाईकांकडून पैसे उसने घ्यायचे नाही या भावनेने मी ते टाळले . त्या काळातही खूपच आर्थिक चणचण जाणवू लागली त्यामुळे 1980 साली पुण्याला Ph.D साठी केलेले रजिस्ट्रेशन रद्द करावे लागले. पुढे मग मी एम . फिल . साठी पुण्याला प्रवेश घेतला व कालांतराने १९९२ मध्ये पीएच .डी . पूर्ण केले . परंतु या संपूर्ण प्रवासात सौ च्या शिक्षणाकडे पूर्ण दुर्लक्ष झाले . ती , लग्न झाले त्यावेळी एम.ए.बी.एड . होती ती तिथेच थांबली होती त्याबद्दल तिने कधीही कुरकुर केली नाही .या कालखंडामध्ये मी झपाट्याने पुस्तके लिहीत गेलो . दहा दहा , बारा बारा , तास मी एकटाकी लिहीत असे माझ्या सहकाऱ्यांना याचे विशेष कौतुक वाटे . मी डॉ . भिंताडे , डॉ . बोंदार्डे , डॉ . अहिरे डॉ .गायकवाड यांनी पीएच .डी करताना कधीही महत्वाच्या कामातून सूट घेतली नाही . हेअभिमानाने सांगावसे वाटते
1995 मध्ये माझी दोन्ही मुले एक एम . एस्सी . ला तर एक मेडिकलला कोल्हापूर येथे शिक्षणासाठी गेली . मी मी ही याच वर्षी व्यवस्थापन परिषदेत गेलेलो असल्याने मलाही वारंवार कोल्हापूर जावे लागे . त्यामुळे सौ . आशा एकटीच घरी असे . याचवेळी तिने एम.एड .एम .फिल. पीएच .डी या पदव्या मिळविल्या . हे करीत असताना मी प्रत्यक्ष तिला कोणतीच मदत केली नाही कारण मदतीमुळे व्यक्ती पंगू बनते असा माझा विश्वास आहे . मी माझ्या पुस्तक लेखनाचच्या वेळी देखील कधीही तिची मदत घेतली नाही तसा आमचा अलिखित करारच होता .ज्यावेळी ती एम .एड करू लागली त्याचवेळी तिने माझी पुस्तके वाचली आहेत तिला पुढे शिक्षकासाठीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला . हे सर्व करीत असताना आम्ही दोघांनी मुलांच्या शिक्षणाकडे कधीही दुर्लक्ष होऊ दिले नाही .मी 1995 मध्ये एम .पी .एस .सी मधून शासकीय महाविद्यालयासाठी प्राचार्य म्हणून निवडला गेलो होतो . परंतु शासकीय सेवेची मानसिकता माझ्याकडे नव्हती . तसेच कुटुंबाकडे दुर्लक्ष होईल ही भीती होती म्हणून मी ते टाळले .अनेकांनी माझा हा निर्णय वेडगळपणाचा ठरविला पण मला मात्र कधी तसे वाटले नाही .
सन 2003 मध्ये दोन्ही मुलांचे विवाह झाले .एक मुलगा चि . आशुतोष निकोलस पिरॅमल मध्ये ठाणे येथे सायंटिस्ट त्याची पत्नी प्राजक्ता एका जूनियर कॉलेज मध्ये शिक्षिका तर दुसरा मुलगा डॉ . अभिजीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठात मेडिकल ऑफिसर व त्याची पत्नी सौ.अर्चना एम .डी. ( आयुर्वेद )येथेच प्रॅक्टिस करीत आहे . सौ . प्राजक्ताला एक मुलगा अर्चित तर अर्चनाला एक मुलगी चि . आदिती व एक मुलगा चि. अर्णव आहे म्हणजेच मला दोन नातू व एक नात असा परिवार आहे .मला मुलगी नसण्याची खंत होती परंतु माझ्या सुनांनी ही उणीव भरून काढली आहे
याबरोबरच माझ्या गावाकडे माझा भाऊ तानाजी त्याला दोन मुली व दोन मुले आहेत . अत्यंत कष्टाळू व धाडसी व प्रामाणिक म्हणून तोही आपल्या गावात ओळखला जातो . तसेच वालचंदनगर जवळील कळंब येथे माझा माझे मामा-मामी हयात नाहीत परंतु त्यांची मुले सुना नातवंडे असा भरगच्च परिवार आहे .माझ्या आनंददायी प्रवासाचे हेही सर्वच जण केवळ साक्षीदार नसून भागीदार आहेत . त्यांच्यामुळेच माझा हा प्रवास आनंददायी झाला आहे असे मी मानतो . ही माझीच मंडळी असल्याने त्यांचे आभार न मानता त्यांच्या ऋणात राहू इच्छितो .
मला या ठिकाणापर्यंत पोहोचवणारे माझ्या घरच्या मंडळींचा , शेजाऱ्यांचा सहकाऱ्यांचा जसा वाटा आहे तसाच मोठा वाटा माझे प्रकाशक कै . गो .के . जोगळेकर यांचाही आहे .त्यांनी माझी पुस्तके प्रकाशित केली व ती पुस्तके संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचवली त्यामुळेच मला मान मिळाला व प्रतिष्ठा प्राप्त झाली. अर्थात यासाठी सर्वात महत्त्वाचे आभार वाचक वर्गाचे , वाचकांनी व विद्यार्थ्यांनी मला भरभरून प्रेम दिले अशाच प्रेमाची यापुढेही अपेक्षा ठेवतो व अल्पविराम घेतो .
उत्तरायण
मी विहित वयोमानाप्रमाणे साठ वर्षे पूर्ण करून 30 एप्रिल 2010 यावर्षी दयानंद शिक्षण महाविद्यालयातून सेवानिवृत्त झालो त्यावेळी माझे विद्यार्थी स्नेही व कुटुंबीय मंडळी यांनी माझ्या सेवानिवृत्ती निमित्त मोठ्या कार्यक्रम आयोजित केला होता . त्या कार्यक्रमास दोन कुलगुरू व माझे आदरणीय स्नेही डॉक्टर वसंतराव देशपांडे यांची प्रमुख उपस्थिती होती .
सेवानिवृत्तीनंतर लगेचच मी एस .व्ही . सी.एस. या संस्थेच्या बी .एड . कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून रुजू झालो . तत्कालीन कार्यकारी अधिकारी श्री कुंभार सरांच्या आग्रहाखातर मी तेथे रुजू झालो होतो . त्या एक वर्षाच्या काळात त्या महाविद्यालयात मला खूपच तरुण सहकाऱ्यांची साथ लाभली या एकमेव विना महाविद्यालयात त्यावेळी सर्व शिक्षक सेट /नेट अथवा Ph.D धारक होते अगदी ग्रंथपाल देखील सेट पास झालेल्या होत्या .या सर्व मंडळी सोबत मीही तरुण झालो होतो व मोठ्या उत्साहात काम सुरू केले होते परंतु नंतर संस्थेच्या धोरणाप्रमाणे त्यांच्याच जातीचा उमेदवार मिळाल्यामुळे मला ती संस्था सोडावी लागली . आज त्या महाविद्यालयाची अवस्था पाहिल्यावर खूप वाईट वाटते . शिक्षण बाह्य निकष लावून शिक्षण संस्था चालवल्यावर काय परिणाम होतो याचे हे एक उदाहरण होय . नंतर मी तत्कालीन सोलापूर विद्यापीठांमध्ये शिक्षण शास्त्र संकुलाचा संचालक व प्राध्यापक म्हणून दोन वर्ष काम पाहिले या दोन वर्षात मला तत्कालीन कुलगुरू डॉ . बाबासाहेब बंडगर यांनी खूपच आदराची वागणूक दिली .
मी माझ्या विभागाला जे, जे मागितले ते ,ते सर्व काही कुलगुरूंनी उपलब्ध करून दिले . त्याकाळी प्रत्येक स्टाफला स्वतंत्र संगणक ,प्रत्येकाला इंटरनेट कनेक्शन दिले . दोन वर्षात दोन राज्यस्तरीय परिषदा घेतल्या . यासाठी लागणारा निधी व अन्य सहकार्य माननीय कुलगुरू तसेच तत्कालीन बीसीयूडी संचालक डॉ . शेंडगे सर यांनी दिले .त्या दोन वर्षात विद्यापीठातील सर्वच कर्मचाऱ्यांकडून मला खूप आदराची वागणूक दिली गेली नंतर नूतन कुलगुरूंनी शिक्षण शास्त्र संकुल बंद करण्याचा निर्णय घेतला व माझी तेथील सेवा समाप्त झाली. या दोन वर्षातील माझ्या सेवेचा काळ देखील अत्यंत उत्तम असा गेला . माझी ही सेवा संपते ना संपते तोच मला ', काका साठे यांच्याकडून त्यांच्या महाविद्यालयाच्या प्राचार्य पदासाठी बोलावणे आले . केवळ त्यांची अडचण ओळखून मी केवळ एक वर्ष तेथे काम केले. या एक वर्षात काकांनी कधीही माझ्या कामात हस्तक्षेप केला नाही इतकेच नव्हे तर त्यांनी मला अत्यंत सन्मानाची वागणूक दिली .परंतु माझ्या मूळच्या थोड्या अतिरेकी शिस्तबद्ध वृत्तीमुळे मला विनाअनुदान महाविद्यालयातील काम करणे कठीण वाटू लागले आणि म्हणून मी त्या सेवेतून स्वतःहून बाहेर पडलो .
सन 2014 पासून माझा SCERTया संस्थेची जवळून संबंध आला त्याकाळी डी .एड . अभ्यासक्रम तयार करण्यासाठी 70 -80 लोकांची एक समिती स्थापन केली होती व त्या समितीवर आठ जणांची एक सुकाणू समिती नेमली होती . त्या सुकाणू समितीमध्ये मी एक सदस्य म्हणून काम करीत होतो .त्या समितीने तयार केलेला अभ्यासक्रम शासनाने कोणतेही कारण न देता स्वीकारला नाही . हा अभ्यास क्रम तयार करण्यासाठी या ७०-८० लोकांनी दीड ते दोन वर्षे काम केले होते . आमच्या समितीच्या अध्यक्षा डॉ.नेहा बेलसरे , तत्कालीन शिक्षण संचालक , जरग साहेब डॉ. शकुंतला काळे, डॉ. सुमन करंदीकर या अशा अत्यंत विद्वानांनी तयार करवून घेतलेला अभ्यास क्रम शासनाने का स्वीकारला नाही हे आज पर्यंत मला समजले नाही .त्यानंतर त्याच अभ्यासक्रमासाठी डॉ .देशमुख सरांच्या अध्यक्षतेखाली नवीन समिती नेमली गेली . त्या समितीमध्ये देखील माझी नेमणूक झाली होती . या नवीन समितीने पुन्हा नवीन अभ्यासक्रम तयार केला तोच सध्या अमलात आहे .
हे होत असतानाच शाळांच्या गुणवत्तेची तपासणी करण्यासाठी म्हणून 'शाळा सिद्धि योजना 'आली ही योजना राबविण्यासाठी महाराष्ट्रातील अनेक तज्ञांना प्रशिक्षण देण्यात आले, त्यामध्ये मी ही एक होतो .ही योजना अत्यंत चांगल्या पद्धतीने सुरू झाली. आम्ही काही तज्ञांनी शाळांचे मूल्यांकन करण्यासाठी प्रशिक्षण वर्ग आयोजित केले व काही शाळांचे मूल्यांकन देखील केले . पुढे त्या योजनेचे काय झाले हे माहित नाही . याच दरम्यान मला बालभारतीच्या गणित अभ्यास मंडळामध्ये काम करण्याची संधी मिळाली . परंतु प्राची साठे नावाच्या विदुषीशी न पटल्यामुळे तेथे काम करता आले नाही .
या काळात माझे पुस्तके लिहिण्याचे काम चालूच होते . डी .एडचा अभ्यासक्रम बदलल्यामुळे डी .एड साठी माझे मित्र डॉ. तुपे यांच्या समवेत , ' अभ्यासक्रम अध्ययन अध्यापन शास्त्र व मूल्यमापन ' डॉ.
अश्विन बोंदार्डे यांच्या समवेत, ' ज्ञान व अभ्यासक्रम ' 'बालकाचा विकास व स्व ची ओळख ' डॉ . येवले व डॉ . तुषार साळुंखे यांच्यासमवेत , 'शिक्षणातील नवीन विचार प्रवाह 'ही पुस्तके लिहिली तसेच 'शाळांमधील व्यवसाय मार्गदर्शन व समुपदेशन ' हे डी .एडच्या विद्यार्थ्यांसाठी मी स्वतः स्वतंत्र रित्या पुस्तक लिहिले .
पुढे करोना काळ आला सर्व व्यवहार ठप्प झाले . आता काय करायचे असा प्रश्न निर्माण झाला आणि मग ऑनलाईन चे युग सुरू झाले . त्या काळात ऑनलाईन व्याख्याने द्यायला सुरुवात केली . अमरावती विद्यापीठ , एसएनडीटी विद्यापीठ , य . च . म . मुक्त विद्यापीठ , विविध महाविद्यालये , शिक्षण संस्था ,यांच्यासाठी विविध विषयावर व्याख्याने सुरू केली . तसेच राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 च्या प्रसारासाठी विविध ठिकाणी व विविध स्तरावर ऑनलाइन व ऑफलाइन व्याख्याने सुरू केली .तरीही
वेळ शिल्लक राहत असे म्हणून मग पुन्हा सेटच्या पहिल्या अनिवार्य पेपर साठी, 'अध्यापन व संशोधन अभयोग्यता 'हा ग्रंथ डॉ . शिंदे डॉक्टर डॉ.किडगावकर यांच्या साह्याने प्रकाशित केला . तसेच यूट्यूब चैनल सुरू करून मी त्यावर सेट /नेट साठी व्याख्यानाचे व्हिडिओ प्रसारित केले .महाराष्ट्रातील विविध तज्ञांच्या सहकार्याने , ' शैक्षणिक संशोधन 'हा ग्रंथ प्रकाशित केला .
पुन्हा SCERTमध्ये राष्ट्रीय शिक्षण 2020 च्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने विविध अभ्यासक्रम समित्या , शालेय गुणवत्ता मूल्यांकन व आश्वासन आराखडा , 'शिक्षक क्षमता समृद्धी प्रशिक्षण कार्यक्रम एक व दोन 'यामध्ये योगदान देण्याची संधी मिळाली. 'राज्य स्तरीय नवोपक्रमांचे मूल्यांकन ' अशा विविध स्वरूपाचे काम करीत राहिलो .या दरम्यान डॉ . श्रीमती नेहा बेलसरे डॉ . कमलादेवी आवटे ,डॉ श्रीमती अनुराधा ओक , वाकडे सर ,डॉ . दत्तात्रय थिटे, डॉ . सातपुते ,डॉ . बोरुडे, मॅडम डॉ . सोनवणे डॉ . सांगोलकर तसेच आमचे माजी विद्यार्थी डॉ विकास गरड या लोकांचा जवळून परिचय झाला या लोकांनी मला नेहमीच अत्यंत स्नेहाची व आदराची वागणूक दिली . कदाचित त्यामुळेच मी सतत SCERTच्या कामात रमलो .व आजही या लोकांच्या स्नेहा खातर व शिक्षणाच्या प्रेमाखातर मी SCERT मध्ये काम करायला उत्सुक असतो.
या दरम्यान मी सध्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या प्राचार्य ताकवले संशोधन केंद्राच्या कामात माझ्या परीने सहकार्य करीत आहे . तसेच शरद पवार इन्स्पायर फेलोशिप उपक्रमासाठी गेल्या तीन वर्षापासून फेलोजना प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे . हे करीत असताना आदरणीय पवार साहेब , सुप्रियाताई , दत्ताजी बाळसराफ , डॉ . सूर्यवंशी , योगेश जी कुदळे ' व डॉ . वैशाली देहाडराय मॅडम या विद्वानांचा जवळून सहवास लाभतो आहे . गेली दहा वर्षे मी लोकमंगल साठी शिक्षकरत्न पुरस्कार समितीमध्ये काम करीत आहे . यादरम्यान आदरणीय सुभाष बापूंची काम करण्याची पद्धती अनुभवा यास मिळत आहे . त्यांनी आमच्या कामात कोणताही हस्तक्षेप न केल्यामुळेच समाजातील या पुरस्काराची विश्वासार्हता आम्ही उंचावून व टिकवून ठेवली आहे . यापुढेही हे कार्य असेच चालू राहील . अलीकडे पुन्हा विश्वकोशाचे काम जोमाने सुरू होत आहे . त्यामध्ये मार्गदर्शन करण्याची संधी मिळत आहे . तसेच विश्वकोशातील नोंदीचे समीक्षण करीत आहे.
सेवानिवृत्तीनंतर कौटुंबिक पातळीवर देखील अनेक बदल घडत गेले . मी प्रथम माझ्या गावाकडे भावाच्या घराच्या नूतनीकरणाचे काम करून घेतले व पुतणी चि . पल्लवीला बी एस्सी झाल्यानंतर बी . एड .करायला लावले . ती आता विवाहित असून तिही एका शाळेत शिक्षिका म्हणून करीत आहे . माझे दोन्ही पुतणे चि . रोहन व चि . रोहित दोघेही उच्च शिक्षण घेऊन नोकरीच लागले आहेत दुसरी एक पुतणी चि . माधवी ही देखील एम .एस्सी . बीएड झाली असून ती आता विवाहित आहे . त्यामुळे माझ्या भावाच्या खांद्यावरील ओझे कमी झाले आहे . हे कमी होण्यासाठी माझ्या परीने मी प्रयत्न केला आहे .
माझी मुले , सुना अत्यंत सुस्थितीत असून नातवंडे देखील उत्तमरीत्या शिक्षण घेत आहेत . माझा नातू चि . अर्चित हा इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे तर माझी नात चि . आदिती ही एमबीबीएस च्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे . आणि माझा सर्वात छोटा नातू व माझा टेक्नॉलॉजीतील गुरु चिरंजीव अर्णव सध्या इयत्ता दहावीत शिकत आहे . आम्हा उभयतांचे संपूर्ण भारत भ्रमण पूर्ण झाले असून युरोपातील आठ नऊ राष्ट्रे, सिंगापूर बँकाक ,पटाया, नेपाळ, श्रीलंका , मालदीव , भूतान ,या राष्ट्रांचा दौरा करून झालेला आहे . सध्या मी शिक्षणातील ' नव संकल्पना व नवप्रवाह ' हा ग्रंथ माझे स्नेही डॉ. अनिल पाटील डॉ.केशव मोरे डॉ . युवराज पवार , डॉ . नागनाथ येवले यांच्या सहकार्याने लिहून पूर्ण केला आहे व त्याचे प्रकाशन दिनांक 4 मे 2025 या दिवशी होत आहे .पुढे चार वर्षे मुदतीचा बी.एड ( ITEP ) कोर्ससाठी आवश्यक असणाऱ्या ग्रंथांच्या लेखनाची तयारी चालू आहे लवकरच त्यापैकी काही ग्रंथ या वर्षात प्रकाशित होतील अशी आशा आहे . या सर्व प्रवासात माझी सौ . डॉ आशालता जगताप , माझे सर्व कुटुंबीय , तसेच माझे विद्यार्थी डॉ . अशोक एकलदेवी , डॉ . नागनाथ येवले, डॉ . बुधाराम डॉ . मुडेगावकर डॉ. चाबुकस्वार ,डॉ शिंदे के.जे . शशिकांत शिंदे ,डॉ श्रीमती भोजे ,डॉ . सदाशिव भोसले 'डॉ. नामदेव भोसले हे सर्वजण सहप्रवासी आहेत यांच्या साथीने असाच आनंददायी प्रवास पुढेही चालू राहील अशी आशा आहे .
डॉ. ह .ना . जगताप
Mob ९८२२ ६१५४६४
e-mail - hnjagtap@rediffmail.com
१२ ब , सन्मतिनगर, विजापूर रोड, सोलापूर ४१३००४
Share
No comments:
Post a Comment